Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अभिचार किंवा कृत्याप्रतिहरणकर्मे

शत्रू, राक्षस आणि कृत्या म्हणजे चेटूक यांचा प्रतिबंध करण्यासाठी हे मंत्र आहेत. अभिचार आणि यातुविद्या या मंत्रांतून दिसते. या मंत्रांच्या भाषेतूनही निष्टुरपणा व्यक्त होतो. या मंत्रांना ‘अंगिरस्’ असे म्हटले जाते. या मंत्रांतील काहींचा संबंध इतर वर्गांतील विषयांशीही पोहोचतो. उदा., राक्षसांविरूद्ध असलेले मंत्र. भैषज्यसूक्तांतही राक्षसांविरूद्ध मंत्रयोजना आहेच. 

‘यातुधान’ म्हणजे राक्षस, ‘किमीदिन्’ म्हणजे दुष्ट पिशाचांचा एक प्रकार यांच्याविरुद्ध अग्नी आणि इंद्र यांना आवाहन केले आहे . राक्षसांविरुद्ध शिशाचा उपयोग सांगितला आहे . येथेही ताइतांचा उपयोग सांगितला आहेच. उदा., अश्वत्थ आणि खदिर यांसारख्या वृक्षांच्या लाकडापासून तयार केलेले ताईत. 

वज्र नावाच्या आयुधाचाही वापर दिसतो.  दोन मंत्र थोडे दुर्बोध आहेत . शत्रूला मूत्रावरोधाची व्याधी व्हावी या दृष्टीने त्याच्या मूत्राशयावर परिणाम घडवून आणणारे हे मंत्र दिसतात. यांपैकी दुसरा मंत्र मात्र मुळात एक वैद्यकीय उपाय म्हणून असावा. 

या विभागात येणारे वरूणसूक्त  मात्र उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. त्यात वरुणाचे सर्वसाक्षित्व दाखविले आहे आणि असत्यवाद्यांना शासन कर अशी त्यास प्रार्थना केली आहे. 

पवित्र कर्मांत अडथळे आणणाऱ्या शत्रूविरुद्ध केलेली मंत्ररचनाही आहे  तसेच शत्रूच्या यज्ञात अर्पण केलेल्या आहुतीचा नाश करण्यासाठी मृत्यू आणि निऋती यांस आवाहन आहे. 

चेटूक करणाऱ्यांचा प्रतिकार करण्यासाठीही मंत्र आहेत. उदा.,. ‘चेटक्यांचा नाश होवो. चेटक्याचे चेटूक त्याचे त्यालाच बाधो’ असे आवाहन या प्रकारच्या मंत्रांतून अनेक वेळा केलेले आढळते.