Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

आयुष्यकर्मे

आयुर्वर्धनाचा प्रश्न विविध व्याधींच्या प्रतिकाराशी निगडित असल्यामुळे हे मंत्र भैषज्यसूक्तांपासून काटेकोरपणे वेगळे करता येत नाहीत. उदा., एकोणिसाव्या कांडातील ४४ वे सूक्त आयुर्वर्धनासाठी असले, तरी त्यात काही रोगांची यादी आलेली असून त्यांपासून मुक्तता व्हावी म्हणून आंजन या विशिष्ट औषधीला आवाहन केले आहे. हे आयुष्यमंत्र उपनयन, गोदान इ. गृह्यसंस्कारांच्या वेळी म्हटले जातात.

मृत्यूच्या १०० किंवा १०१ प्रकारांपासून संरक्षण मिळण्यासाठी केलेल्या प्रार्थना येथे आढळतात. या सर्व मंत्रांत अग्नीचे महत्त्व प्रकर्षाने आढळते. अग्नी जिवंतपणाचे प्रतीक आहेच. जीवनसंरक्षक ताइतांनाही येथे स्थान आहे. सोन्याचा ताईत, मेखला, शंखमणी यांचे उल्लेख आहेत.