Get it on Google Play
Download on the App Store

श्री बैजनाथ महादेव मंदिर, मध्यप्रदेश


मध्यप्रदेशात आगर मालवा नगरात श्री बैजनाथ महादेवाचे एक असे ऐतिहासिक मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार तत्कालीन इग्लिश सेनेच्या एका अधिकाऱ्याने केला होता. मध्य प्रदेश च्या नव्याने संघटीत झालेल्या आणि ५१ व्या जिल्ह्याच्या रुपात गेल्या वर्षी अस्तित्वात आलेल्या मालवा च्या इतिहासात असा उल्लेख आहे की बैजनाथ महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार कर्नल मार्टिन याने १८८३ साली १५००० रुपयांच्या वर्गणीतून केला होता. या संदर्भातील शिलालेख देखील मंदिराच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेला आहे. उत्तर आणि दक्षित भारतीय कलात्मक शिल्पांनी निर्मित या बैजनाथ महादेवाला चमत्कारी देव असे मानले जाते. या गोष्टीचे जिवंत उदाहरण म्हणजे १३० वर्षांपूर्वी जेव्हा अफगाणिस्तान इथे पठाणी सैन्याच्या वेढ्यात सापडलेल्या कर्नल मार्टिन याच्या प्राणांचे रक्षण स्वतः भगवान शंकरांनी केले आणि तो सुखरूप घरी परत येऊ शकला.



इतिहासात नोंद आहे की १८७९ साली इंग्रजांनी अफगाणिस्तान वर आक्रमण केले होते. या युद्धाचे संचालन आगरमालवा च्या ब्रिटीश छावणीतील लेफ्टनंट कर्नल मार्टिन याच्यावर सोपवण्यात आले होते. युद्धावर गेल्यानंतर मार्टिन युद्ध आणि स्वतःचे कुशल याबाबत नियमितपणे आपल्या पत्नीला आगरमालवा इथे निरोप पोचवत असे. या दरम्यान एक वेळ अशी आली की मार्टिन याचे निरोप येणे बंद झाले. त्याच्या पत्नीच्या मनात नाना शंका कुशंका येऊ लागल्या. एक दिवस ती घोड्यावरून रपेट करण्यासाठी बाहेर पडली असता श्री बैजनाथ महादेवाच्या मंदिरातून ऐकू येणारा शांखनाद आणि मंत्रांच्या आवाजाने ती आकर्षित झाली आणि मंदिरात गेली. तिथे मंदिरात पूजापाठ करणाऱ्या पुजारी आणि पंडितांशी तिने चर्चा केली आणि शिवापूजनाचे महत्त्व जाणून घेतले. पुजाऱ्यांनी सांगितले की भगवान शंकर अंतर्ज्ञानी आणि भोलेभंडारी आहेत. ते आपल्या भक्तांची संकटे त्वरित दूर करतात. पुजाऱ्यांनी लेडी मार्टिनला विचारले की मुली तू फार चिंतेत दिसते आहेस, काय झाले आहे? लेडी मार्टिन ने सांगितले की माझे पती युद्धावर गेले आहेत आणि कित्येक दिवसांपासून त्यांची काहीच खबरबात आली नाहीये, म्हणून मी चिंतेत आहे; एवढे बोलून तिला रडू कोसळले. मग पुजाऱ्यांच्या सांगण्यावरून लेडी मार्टिन ने तिथे लघु रुद्र अनुष्ठानाला प्रारंभ केला आणि भगवान शंकराकडे प्रार्थना केली आणि नवस बोलला की जर माझे पती युद्ध जिंकून परत आले तर मी या मंदिरावर कळस बांधीन. लघु रुद्र पूर्ण होण्याच्या वेळीच एक संदेशवाहक धावत पळत शिवमंदिरात आला. त्याने एक लिफाफा लेडी मार्टिनला दिला. लेडी मार्टिन ने घाबरत घाबरतच लिफाफा उघडून आतील संदेश वाचायला सुरुवात केली. त्या संदेशात तिच्या पतीने लिहिले होते, "आम्ही युद्धात व्यस्त होतो, तुम्हाला नियमित संदेश देखील पाठवत होतो. परंतु अचानक आम्हाला पठाणी सैन्याने वेढा घातला. ब्रिटीश सैन्य मोठ्या प्रमाणावर मारले जाऊ लागले. आम्ही इतक्या बिकट परिस्थितीत अडकलो होतो की नुसतं जीव वाचापून पळून जाणदेखील कठीण झालं होतं. इतक्यात आम्ही पहिले की युद्धभूमीवर लांब जटा असलेले एक योगी आले, त्यांच्या हातात तीन टोके असलेले एक हत्यार होते (त्रिशूळ), त्यांना पाहताच पठाणी सैन्य पळून गेले आणि आमच्या पराभवाची चिन्हे अचानक विजयात बदलली."

पत्रात लिहिले होते की हे सर्व केवळ त्या त्रिशूळधारी योगीमुलेच शक्य झाले. मग ते म्हणाले की घाबरू नका, मी भगवान शंकर आहे. तुमच्या पत्नीने केलेल्या पूजेमुळे प्रसन्न होऊन इथे तुमचे रक्षण करण्यासाठी आलो आहे. पत्र वाचणाऱ्या लेडी मार्टिन ने भगवान शंकराच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवून त्यांना धन्यवाद दिले, आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काही दिवसांनंतर जेव्हा कर्नल मार्टिन आगर मालवा इथल्या ब्रिटीश छावणीत परत आला, आणि त्याने आपल्या पत्नीला सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या, तेव्हा लेडी मार्टिन ने आपल्या पूजेची इत्यंभूत कहाणी कर्नल ला सांगितली. आणि आपल्या पत्नीच्या संकल्पानुसार सन १८८३ मध्ये कर्नल मार्टिन ने १५००० रुपये वर्गणी काढून श्री बैजनाथ महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. आगर मालवा च्या उत्तर दिशेला जयपूर मार्गावर बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या बैजनाथ महादेवाच्या या ऐतिहासिक मंदिरातील शिवलिंग राजा नल याच्या काळातील आहे असे मानले जाते. आधी हे मंदिर म्हणजे एक मठ होता. तांत्रिक आणि अघोरी इथे पूजापाठ करायचे, साधना करायचे. मंदिराचा गाभारा ११ x ११ फुटांचा चौकोन आहे तर मध्यावर आग्नेय पाषाणाचे शिवलिंग प्रस्थापित आहे. मंदिराचे शिखर चुनखडकापासून बनवलेले आहे, ज्याच्या आतील आणि बाहेरील बाजूस ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या दर्शनीय मूर्ती कोरलेल्या आहेत. जवळपास ५० फूट उंचीच्या या मंदिराच्या शिखरावर उंच सुवर्ण कलश आहे. मंदिराच्या पुढील भागात भव्य सभामंडप आहे आणि या मंडपात ३ फूट लांब आणि २ फूट उंच नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या पाठीमागे साधारण ११५ फूट लांब आणि ३८ फूट रुंद कमळ कुंड आहे, जिथे उमलणाऱ्या कमळ फुलांमुळे हे स्थान आणखी रमणीय दिसते. महाशिवरात्री च्या व्यतिरिक्त इथे कार्तिक आणि चैत्र महिन्यात भव्य शिव जत्रा आयोजित होते आणि दूरदूरवरून भाविक या चमत्कारी श्री बैजनाथ महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी इथे येतात.