Get it on Google Play
Download on the App Store

महादेवशाल मंदिर, गोईलकेरा, झारखण्ड


तुम्ही कधी अशा मंदिराबद्दल ऐकले आहे का की जिथे मोडक्या शिवलिंगाची पूजा केली जाते? कारण हिंदू धर्मातील मान्यतेनुसार तुटलेल्या किंवा मोडलेल्या मूर्ती या पूजा स्थानापासून हटवल्या जातात, त्यांची पूजा करणे अशुभ मानले जाते. परंतु इथल्या शंकराच्या पिंडीचे महत्त्व विशेष आहे.

प्रचलित समजुतींच्या अनुसार झारखंड मधल्या गोईलकेरा येथील महादेवशाल धाम नावाचे हे मंदिर देशातील जागृत देवास्थानांपैकी एक मानले जाते. असे म्हटले जाते की ब्रिटीश राजवटीच्या काळात इथे रेल्वे लाईन चे काम चालू असताना एका इंग्लिश इंजिनियरने इथल्या मंदिरातील शिवलिंग उखडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. तो ते उखडून टाकू शकला नाही, परंतु त्याने ते मोडून ठेवले. याची किंमत त्याला आपल्या मृत्युच्या रूपाने चुकती करावी लागली. या मृत इंजिनियर रॉबर्ट हेनरीला देखील पश्चिम रेल्वे केबिन जवळ दफन करण्यात आले. त्याची कबर आजही तेथे आहे.



कहाणी
ब्रिटीश राजवटीच्या काळात रॉबर्ट हेनरी नावाचा एक ब्रिटीश इंजिनियर गोइलकेरा मधल्या बड़ैला गावात रेल्वे लाईन टाकण्याचे काम करत होता. खोदकाम चालू असतानाच कामावरील मजुरांना इथे शिवलिंग आढळून आले. त्यामुळे मजुरांनी खोदकाम त्वरित थांबवले. मजुरांनी काम थांबवल्यामुळे चिडलेल्या रॉबर्टने फावडे घेऊन शिवलिंगावर घाव घातले ज्यामुळे ते शिवलिंग तुटले.

घटनेनंतर रॉबर्ट हेनरी आपल्या निवासस्थानाकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरून गेलेल्या इंग्रजांनी त्या रेल्वे लाईन चा मार्गाच बदलून टाकला. पुढे तिथे राहत असलेल्या ग्रामस्थांनी या तुटलेल्या शिवलिंगाला देवशाल धाम नाव देऊन त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. शिवलिंगाच्या तुटलेल्या दुसऱ्या तुकड्याची मंदिरापासून जवळ जवळ २ किलोमीटर अंतरावरील रतनपूर पहाडीवर असलेल्या पाउडी मातेच्या मंदिरात स्थापना करून तिथे त्याचे पूजन सुरु केले. असे म्हटले जाते की या दोन्ही ठिकाणी जी इच्छा मागितली जाते, ती पूर्ण होते.