Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शनीमंदिर - शिंगणापूर, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील एक छोटेसे गाव शिंगणापूर आपल्या शनी मंदिरासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. इथल्या शनीच्या मंदिराबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. या गावाचे लोक आपल्या घराला कधीही कुलूप लावत नाहीत. एवढेच कशाला, या गावातील एकही घराला दरवाजाच नाहीये. सर्व काही शनीदेवाच्या भरवशावर सोडून दिलेले आहे. गावातील लोक सांगतात की तिथे आजपर्यंत कधीही चोरी झालेली नाही. आता पाहूया शिंगणापूर इथल्या या शनी मंदिराची कहाणी..पुराच्या पाण्यात मिळाली होती शनिदेवाची मूर्ती
असे म्हटले जाते की एकदा शिंगणापूर गावात मोठा पूर आला होता. पुराच्या पाण्यात सर्व काही बुडून जात होते. त्याच वेळी लोकांनी त्या भयानक पुराच्या लोंढ्यात एक मोठी शिळा तरंगताना पहिली. जेव्हा पाण्याची पातळी थोडी कमी झाली तेव्हा एका माणसाने ती शिळा एका झाडावर असलेली पहिली. अशा प्रकारचा अद्भुत दगड त्याने आज पर्यंत कधीही पहिला नव्हता. त्याने लालसेने ती शिळा खाली उतरवली. त्यने ती फोडण्यासाठी म्हणून टोकदार वस्तूने त्यावर घाव घातला, तर त्या दगडामधून रक्त वाहू लागले.
हे पाहून तो प्रचंड घाबरून गेला आणि त्याने ताबडतोब गावातल्या लोकांना ही गोष्ट सांगितली. सार्वजण त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोचले आणि ती शिळा पाहून आश्चर्यचकित झाले. परंतु या दगडाचे काय करायचे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. रात्री एका गावकऱ्याच्या स्वप्नात स्वतः शनिदेव आले आणि त्यांनी त्या शिळेची स्थापना करण्याचा आदेश दिला. पुढच्या दिवशी गावातील माणसांनी त्या स्वप्नाला सत्य मानून त्या शिळेची स्थापना केली. तेव्हापासून ती मूर्ती म्हणजेच ती शिळा बिन मंदिराची त्या ठिकाणी विराजमान आहे.


कोणत्याही छत्र - घुमटाशिवाय स्थापित आहे शानिदेवांची मूर्ती

शनिदेवाच्या या मंदिराची खासियत अशी की इथली शानिदेवांची मूर्ती ही कोणत्याही छत्र किंवा घुमटाशिवाय, मोकळ्या आकाशाखाली, एका संगमरवराच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. इथे दिसणारी शनिदेवाची मूर्ती साधारण ५ फूट ९ इंच उंच आणि ६ इंच रुंद आहे, जी ऊन, थंडी, वारा, पाऊस या सर्वांमध्ये दिवसरात्र उघड्यावर असते. दररोज शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाने अभिषेक केला जातो.

मंदिरात पुजारी नाही
शनी शिंगणापूर च्या बाबतीत अशी गोष्ट प्रचलित आहे की इथे "देव आहे" पण मंदिर नाही, घर आहे परंतु दरवाजा नाही, वृक्ष आहेत पण सावली नाही, भीती आहे परंतु शत्रू नाहीत. इथे शनी अमावस्या आणि शनी जयंती च्या दिवशी भरणाऱ्या जत्रांमध्ये जवळपास १० लाख लोक येतात आणि दररोज इथे जवळ जवळ १३००० लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात. मंदिरात नेमलेला असा कोणताही पुजारी नाहीये. भक्तगण प्रवेश करून शनी देवाचे दर्शन घेऊन सरळ मंदिराबाहेर निघून जातात. मंदिरात येणारे भाविक आपल्या इच्छेनुसार इथे तेलाचा अभिषेक देखील करतात.


मागे वळून बघू नये असा पायंडा

गावात असे मानले जाते की जो कोणी भक्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातो, त्याने केवळ समोर बघतच जावे. त्याला पाठीमागून कोणत्याही प्रकारचा आवाज आला तरी त्याने मागे वळून पाहू नये. शनिदेवाच्या पायावर माथा टेकून सरळ सरळ, मागे वळून न पाहता बाहेर यावे.

शनी जयंतीच्या दिवशी मूर्ती दिसते निळ्या रंगाची
शिंगणापुरात शनी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवाची मूर्ती निळ्या रंगाची दिसते. ५ दिवस यज्ञ आणि ७ दिवस भजन - कीर्तन - प्रवचन असा कार्यक्रम भर उन्हात साजरा केला जातो.