Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तन्नौट माता मंदिर


भारतीय सेना ही जगातील सर्वात सक्षम ५ सेनांपैकी एक आहे. परंतु भारतीय सेनेकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या जगातील कोणत्याही देशाच्या सेनेकडे नाहीत, आणि ज्यांच्या बळावर भारतीय सेना नेहमी जिंकत राहते. या गोष्टींमधील एक गोष्ट म्हणजे  तंनौट मातेचा आशीर्वाद. जेसलमेर पासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंदिरात विराजमान असलेल्या तंनौट मातेने १९६५ च्या लढाईत पाकिस्तान सेनेचे ३००० पेक्षा जास्त गोळे निरुपयोगी करून भारतीय सेनेला वाचवले होते. असे म्हटले जाते की त्यावेळी या मंदिराच्या परिसरात पाकिस्तानने जितके बॉम्बगोळे डागले त्यापैकी एकही फुटला नाही आणि आपल्या देशाच्या सेनेचे कोणतेही नुकसान झाले नाही.असे देखील म्हटले जाते की इसवी सन ८४७ मध्ये भाटी राजपूत राजा तनू राव याने तंनौट ला आपली राजधानी बनवले होते. त्याच वेळी या मंदिराचा पाया घातला गेला होता आणि मातेच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली होती. बदलत्या काळाबरोबर भाटी राजांची राजधानी तंनौट वरून जेसलमेरला गेली, परंतु मंदिर त्याच जागेवर राहिले. सध्या मंदिर बी.एस.एफ. आणि आर्मी च्या जवानांकडून संयुक्त स्वरूपाने संचालित केले जाते. तंनौट मातेला देवी हिंगलाज हिचा अवतार मानले जाते. एक गोष्ट आवर्जून उल्लेख करण्यासारखी आहे, ती म्हणजे हिंगलाज देवीचे मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तान इथे आहे.

१९६५ मध्ये सेनेच्या जवानांना वाचवण्याचे वचन दिले होते
बी.एस.एफ. जवानांच्या सांगण्याप्रमाणे १९६५ मध्ये पाकिस्तानी सैन्याने जेसलमेरवर हल्ला केला होता. त्या वेळेस तंनौट मातेने काही जवानांना स्वप्नात दर्शन दिले आणि वचन दिले की मी तुमचे रक्षण करेन. इकडे पाकिस्तानी सैन्याने किशनगढ आणि साढेवाला वर कबजा करून तंनौट ला दोन्ही बाजूनी घेरले आणि मोठ्या प्रमाणात बाम्बार्डिंग केले. बी.एस.एफ. च्या सांगण्याप्रमाणे पाक सैन्याने जवळ जवळ ३००० तोफगोळ्यांचा मारा केला. परंतु मातेच्या आशीर्वादाने बरेचसे गोळे फुटलेच नाहीत, आणि काही मोकळ्या जागेत जाऊन फुटले, ज्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. त्याचवेळी भारतीय सेनेची ताजी कुमक तिथे येऊन पोचली आणि पाकिस्तानी सैन्याला तिथून पळ काढावा लागला. या लढाईत पाक सैन्याचे बरेच सैनिक मारले गेले.

१९७१ मध्ये देखील मातेने भारतीय सेनेच्या जवानांचे रक्षण केले
४ डिसेंबर १९७१ च्या रात्री पाक सैन्याने आपले रणगाडे घेऊन भारताच्या लोंगेवाला चौकीवर हल्ला केला. त्यावेळी तिथे बी.एस.एफ. आणि पंजाब रेजिमेंटची एक एक तुकडी तैनात होती. परंतु तन्नौट मातेच्या आशीर्वादाने या दोन तुकड्यांनी पाक सैन्याच्या सर आक्रमणकारी रणगाड्यांचा खात्मा केला. त्यातच सकाळ झाल्याझाल्या भारतीय वायुसेनेने देखील प्रतिहल्ला चढवला, आणि त्यामुळे पाक सैन्याचे केवळ काही सैनिकाच जिवंतपणे पळून जाऊ शकले, तर या लढाईत भारतीय सेनेचा केवळ एक जवान शहीद झाला. लोंगेवाला युद्ध हे या प्रकारचे जगातील एकमेव असे युद्ध आहे, ज्यामध्ये आक्रमण करणाऱ्या सेनेचाच एकतर्फी खात्मा झाला. नंतर भारतीय सेनेने या ठिकाणी विजय स्तंभाची स्थापना केली.

तन्नौट मातेच्या मंदिराने या लढाईत सुरक्षा रक्षक जवानांचे अक्षरशः कवच बनून त्यांचे रक्षण केले. लढाई नंतर सुरक्षा रक्षकांनी मंदिराची जबाबदारी पूर्णपणे आपल्या हातात घेतली. या मंदिरात एक संग्रहालय देखील आहे, ज्यामध्ये ते तोफगोळे ठेवण्यात आलेले आहेत. मंदिरात पुजारी देखील सैनिकच आहेत. दररोज सकाळ - संध्याकाळ इथे आरती होते, आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर २४ तास एक शिपाई तैनात असतो. भारतातील एक महत्त्वपूर्ण तीर्थ स्थान आणि चार धामांपैकी एक असलेल्या द्वारकाधीश मंदिराची देखील थोडीफार अशीच कहाणी आहे. या मंदिरावर ७ सप्टेंबर १९६५ ला पाकिस्तानच्या नौसेनेने जोरदार बाम्बार्डिंग केले होते. या मिशनला पाकिस्तानने 'मिशन द्वारका' असे नाव दिले होते. पाकिस्तानी रेडीओवर एका बातमीपत्रात पाकिस्तानी नौसैनिकांनी सांगितले, "मिशन द्वारका यशस्वी झाले आहे. आम्ही द्वारकेचा विनाश केला आहे. आम्ही केवळ काही मिनिटांच्या आतच मंदिरावर १५६ बॉम्ब फेकून मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे."
प्रत्यक्षात हा त्यांचा गोड गैरसमज होता. पाक नौसेनेने डागलेले बरेचसे गोळे हे द्वारकाधीश मंदिरापर्यंत पोचले देखील नाहीत. ते समुद्रात पडून निरुपयोगी झाले होते. परंतु काही गोळ्यांनी मंदिराच्या एका हिश्शाची पडझड झाली होती, त्या हिश्शाचा पुढे पुनरुद्धार करण्यात आला.