Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मंडूक शिवमंदिर, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील खीरी येथे शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर सीतापूर रोडवर असलेल्या ओयल कसबा इथे प्राचीन शिवालय बनलेले आहे जे मेंढक किंवा मंडूक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतवर्षातील एकमात्र तांत्रिक विद्येच्या मंडूक तंत्रावर आधारित असलेल्या या मंदिराची निर्मिती १८६० च्या जवळपास ओयाल स्टेट चा राजा बख्श सिंह याने केली होती.मंदिराच्या निर्माण प्रक्रियेत सर्वात आधी एक महाकाय अशी बेडकाची आकृती तयार करण्यात आली. त्यानंतर याच बेडकाच्या पाठीवर साधारण चार मजले एवढ्या उंचीवर भगवान शंकरांचे नर्मदेश्वर शिवलिंग अष्टकोनी कमळाच्या आत स्थापन केलेले आहे. इथे वरतीच शिव दरबाराच्या बाहेर एक विहीर देखील आहे. भक्तगण याच विहिरीतून पाणी भरून एवढ्या उंचावरील शिवलिंगावर अर्पण करू शकतात जे बेडकाच्या तोंडातून बाहेर येते.

या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे की इथले स्थापना झालेले शिवलिंग दिवसभरात तीन रंग बदलते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी शिवलिंगाचे हे बदललेले रंग पाहता येतात. याच मंदिराच्या कळसावर एक २२ किलो वजनाचे सोन्यापासून बनवलेले चक्र स्थापित आहे, जे सूर्याच्या दिशेनुसार फिरत राहायचे आणि त्याची सावली मंदिराच्या अंगणात पडायची ज्यावरून लोक वेळेचा अंदाज लावत असत. आता हे चक्र अर्धे तुटलेल्या अवस्थेत आहे. तसे पहिले तर संपूर्ण वर्षभरच या मंदिरात भक्तांचा ओघ लागलेला असतो, परंतु श्रावण महिन्यात मात्र इथे कित्येक पटींनी अधिक शिवभक्त हजेरी लावतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दूर दूर वरून भक्त आणि पर्यटक इथे येऊन भगवान शंकराची कृपादृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.