Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कलिंगडाच्या साली 2

ते झाडूवाले कलिंगडांच्या सालीची घाण गोळा करीत होते. स्वस्तिक सिनेमाजवळची ती जागा. रात्रभर फोडी भरभर खाऊन साली फेकलेल्या आणि त्या साली नीट कोण खातो ?  सारीच घाई. पटपट वरचा लाल भाग खाऊन, कुरतडून साली फेकलेल्या होत्या. गोळा केलेल्या त्या फोडींजवळ, त्या कच-याजवळ ती पाहा दोन-चार मुले धावत आली. काय पाहिजे त्यांना ? त्या सालींकडे ती पाहत आहेत. त्यांचा का काही खेळ आहे ? परंतु ती पाहा, एक फोड एका मुलाने उचलली. ते अर्धवट उरलेले लाल लाल तो भराभर खाऊ लागला. आणि ती सारी मुले घसरली. ज्या फोडीला थोडेअधिक लाल शिल्लक असेल तिच्यासाठी झोंबाझोंबी, मारामारी. त्या साली लवकर कच-याच्या मोटारीत फेकल्या जातील म्हणून मुलांना घाई. एकीकडे खात असता दुस-या फोडींवर त्यांचे डोळे आशेने खिळलेले असत. त्या फोडी भराभर खाण्यासाठी त्यांचे दात शिवशिवले जणू असत.

मी ते दृश्य पाहत होतो. त्या मुलांना ताजी फोड कोण देणार ? आणि एक दिवस कोणी देईल. रोज कोण देणार ? सकाळ केव्हा होते आणि फार गर्दी ठायीठायी दिसू लागण्यापूर्वी त्या फोडी जाऊन केव्हा खातो असे त्या मुलांना होत असेल. काय ही दशा ! परंतु देशभर अशी दृश्ये ठायीठायी दिसत असतील. आंब्यांच्या साली, कोयी रस्त्यावर टाकलेल्या चूंफताना मी मुलांना पाहिले आहे. उकिरड्यावर टाकलेले अन्नाचे तुकडे गोळा करुन ते खाताना किती तरी जणांना मी पाहिले आहे. ही मुले का त्याला अपवाद होती !

माझे पाय पुढे जाईनात. घाणीतल्या त्या साली. मी का त्या मुलांना स्वच्छतेवर प्रवचन देऊ ? असे खाऊ नये. घाणीतील त्या साली आजूबाजूला थुंकलेले, झाडूने गोळा केलेल्या नका खाऊ. असे का त्यांना सांगू ? मी त्यांना स्वच्छता शिकवू जाणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याप्रमाणे झाले असते. 

उन्हाळ्याचे दिवस ! दिवसभर ती मुले कलिंगडाच्या फो़डींकडे आशाळभूत नजरेने बघत असतील. हजारो लोक खाताहेत. आणि आपणाला ? ती गरिब मुले होती. कुठे होते त्यांचे आईबाप, कुठली ती राहणारी ? ना त्यांना शिक्षण, ना संस्कार. कधी कुठे मजुरी करतात, आणा अर्धाआणा मिळवितात. अधिक मागतील तर थप्पड खातात. मी त्यांच्याकडे बघत होतो. अंगावर चिंध्या केस वाढलेले. कुठला साबण, कुठून तेल ? कुठे स्नान, कुठे भोजन ?

एका मुंबईत अशी हजारो मुले आहेत म्हणतात. जी कुठे तरी राहतात, कुठे तरी पडतात. मानवतेची ही विटंबना कशी थांबायची ?

मी माझ्या मित्राकडे जाणे विसरलो. मी विचारमग्न होतो. तसाच चौपाटीकडे वळलो नि समुद्राच्या किनारी जाऊन बसलो. समुद्र उचंबळत होता. माझे लक्ष त्याच्याक़डे होते. माझ्या मनातही शत विचार उसळले होते. एकाएकी लोकमान्यांच्या पुतळ्याकडे लक्ष गेले. स्वराज्यासाठी तो महापुरुष झगडला. कुठे आहे ते स्वराज्य ? सर्वांचे संसार सुखी करणारे स्वराज्य ? ज्या स्वराज्यात अशा मुलाबाळांसाठी बालगृहे असतील, जेथे त्यांची जीवने फुलविली जातील, जेथे त्यांचा स्वाभिमान जागा होईल, अशी स्थिती कधी येईल ? असे स्वराज्य आणणे म्हणजे समाजवाद आणणे. समाजवादाची, सर्वांच्या विकासाची दृष्टी आल्याशिवाय समाजाचा कायापालट व्हायचा नाही ! मी लोकमान्यांच्या पुतळ्याला प्रणाम केला. ते स्वराज्य लवकर येवो, असे मनात म्हणून निघून गेलो.