Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

रामकृष्णा 1

सायंकाळी वेळ होती. महालक्ष्मी स्टेशनात मी होतो. गाड्या भरुन येत होत्या. जागा मिळेना घुसायला, दार धरुन उभे राहायला मला धैर्य होत नव्हते. जेव्हा मोकळी जागा मिळेल तेव्हाच गाडीत बसेन असे ठरवून मी एका बाकावर बसलो होतो. इतक्यात पंधरा-सोळा वर्षांचा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याच्या अंगावर चिंध्या होत्या. त्याची ती उंच देहयष्टी कृश दिसत होती. त्याच्या डोळ्यांत करुणा होती. त्याचे ते ओठ थरथरत होते. मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो माझ्याक़डे बघत होता. तो माझ्या डोळ्यांत सहानुभूती शोधीत होता. मी त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकता शोधीत होतो.

“दादा...” त्याने शब्द उच्चारला.

“काय पाहिजे तुला ? का डोळ्यांत अश्रू ?”

“मी बेकार आहे. मुंबईत पोटाला मिळावे म्हणून मी आलो. चार दिवस झाले. मी उपाशी आहे. चार आणे द्या. थोडे खाईन.”

“तू कुठला कोण ?”

“मी दूरचा आहे. धामणी माझे गाव. घरी आईबाप आहेत. लहान भावंडे आहेत. परंतु खायला नाही. ना धंदा, ना मालकीची जमीन. नेहमी ‘मुंबईला जा, पोटाला मिळव. उरले तर घरी आम्हाला पाठव !’ असे बाप म्हणायचा. अखेर गाव सोडले नि मी येथे आलो. येथे ना ओळख ना देख. भटकत असतो.”

त्याला बोलवेना. मी चार आणे काढून त्याला दिले.

“अहो, फसवतात हे लोक.” शेजारी उभा असलेला एक गृहस्थ म्हणाला.

“फसवू दे. मोठमोठे कारखानदार फसवीत आहेत. व्यापारी फसवीत आहेत. बडी बडी माणसे फसवीत आहेत. या मुलाने चार आण्यासाठी फसवले तर फसवले.” मी म्हटले.

“अहो, दान सत्पात्री करावे, शास्त्र सांगते.” ते गृहस्थ धर्म सांगू लागले.

त्या मुलाचे डोळे त्या गृहस्थाला उत्तर देत होते. मला खलिल जिब्रानचे शब्द आठवले. ‘ईश्वराने आयुष्याची थोर देणगी द्यायला ज्याला पात्र ठरविले तो तुझ्या दोन दिडक्या घ्यायला पात्र नाही का ? या जगात ज्याचा उपयोग नसेल, त्याला ती विश्वशक्ती येथे राखील तरी कशाला ?’