Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पाला खाणारी माणसे 2

असे बोलत आम्ही चाललो होतो. आणि लहान लहान झोपड्या दिसू लागल्या. एका झोपडीजवळ आम्ही आलो. झोपडीचे दोन भाग होते. एका भागात बक-या बांधलेल्या होत्या. दुस-या भागात माणसे राहत. एकीकडे बक-यांची पोरे, दुसरीकडे आदिवासींची मुले. निजायला शिंदीची चटई. कपडे फारसे दिसलेच नाहीत. मातीची मडकी हीच इस्टेट. एक तरुण तेथे तापाने आजारी होता. मी त्याच्या अंगाला हात लावला. ताप पुष्कळ असावा. ना पांघरुण ना औषध. ना फळ, ना दूध. त्या झोप़डीत निराशा, दारिद्र्य, दैन्य यांचेच राज्य होते.

तेथे एक म्हातारी होती. अस्थिचर्ममय केवळ ती होती. लहानशी चिंधी नेसून होती. तिच्यासमोर एक पाटी होती. पाटीत चिरलेला पाला होता.

“कशाला हा पाला ?” मी विचारले.

“हा शिजवतो नि खातो” ती म्हणाली.

“नुसताच पाला? त्यात डाळ, तांदूळ, कण्या, काही तरी मिसळीत असाल.”

“नाही रे दादा. आम्हाला कुठले डाळ-तांदूळ ? आमची का शेतीवाडी आहे ? थोडी शेती खंडाने करतो. ते भात किती दिवस पुरणार ? मजुरी मिळाली तर करावी आणि हा पाला खावा. शेळ्याबक-या पालाच नाही का खात ? आम्ही तशीच. पाला थोडाफार मिळतो हीच देवाची कृपा. उद्या पालांही घेऊ नका म्हणून जमीनदार म्हणायचा. मग तर हवा खाऊनच राहावे लागेल.”

त्या म्हातारीचे ते शब्द बंदुकीच्या गोळीप्रमाणे हृदयात घुसत गेले. मी खाली मान घातली. क्षणभर तेथे उभा राहून दुस-या झोपडीकडे मी निघालो.

तेथेही तसेच दृश्य. तेथे दोन मायबहिणी कसले तरी कंद विळीवर निशीत होत्या. कसले होते ते कंद ? ती रताळी नव्हती, तो बीट नव्हता. ते बटाटे नव्हते, कांदे नव्हते.  ती कणगरे नन्हती, ते करींदे नव्हते. कसले होते ते कंद ?

“कसले हे कंद ?” मी विचारले.

“रानातून आणले.”