Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 27

११. धर्म व राष्ट्रीय अभ्युदय

धर्मामुळे राष्ट्रे दुबळी होतात. धर्मामुळेच हिंदुस्थाचा -हास झाला व  धर्म वगैरेचे बंड नसल्यामुळे जपानचा अभ्युदय झाला. असे जे आमच्या देशातील काही अविचारी लोक भरमसाट बडबडतात, त्याचा कितीही कडक शब्दात निषेध केला तरी तो कमीच होणार आहे. 

परंतु सत्य खरे काय आहे त ज्याने त्याने आपल्या स्वभावानुसार वृत्यनुसार पाहावे. असल्या गोष्टीत चर्चा अगदी निरूपयोगी असते. जशी दृष्टी तशी सृष्टी. आपल्याभोवती नवीन स्वर्ग निर्माण करायचा आहे, नवीन पृथ्वी बनवायची आहे. जो हे करून दाखवील त्याचा मार्ग सत्याचा. नवीन सृष्टी दिसू लागल्यावर कोणाचा पक्ष सत्य हे प्रत्येकाला लगेच कळून येईल. नवीन स्वर्ग व नवीन पृथ्वी निर्माण करण्याची ही कामगिरी निराशावादी व खडे फोडणारे अशांच्या हातून कधीही व्हावयाची नाही.

हिंदुस्थानात धर्मामुळे र्‍हास झाला व जपानचा अभ्युदय धर्माच्या अभावामुळे झाला असे म्हणणारे जे आमचे मित्र आहेत त्यांना आमचा असा प्रश्न आहे की, कृपा करून तुमची धर्माची कल्पना काय ती तरी आम्हाला नीट कळू दे. एकदा धर्म काय याची व्याख्या ठरली म्हणजे मग कदाचित असेच दिसून येण्याचा संभव आहे की धर्मामुळेच हिंदुस्थानात जिवंत राहिला, धर्मामुळे तो टिकाव धरुन उभा राहिला. परंतु असे जेव्हा आम्ही म्हणतो. तेव्हा धर्म याचा अर्थ रुढी , दंतकथा, स्नानसंध्या, टिळेमाळा,  भस्मे व जानवी, गोमूत्रे प्रायश्चिते व गोप्रदाने हा नसतो. सत्यश्रध्दा व  सत्यविचाराचे आचारांत प्रकटीकरणे म्हणजे धर्म हा आमचा अर्थ असतो. 

अशा अर्थाने हिंदुधर्माकडे पाहू लागलो म्हणजे मग माझं संकट दूर कर, माझा रोग बरा कर, असली दुबळी नवस करणारी मूर्तीपूजा म्हणजे हिंदुधर्म नव्हे हे दिसून येईल. राष्ट्राच्या महान व अनंत जीवनात पराजया इतकाच जयही क्षणभंगुर आहे. सदैव विजयीच व्हाल, ऐहिक भाग्याने मिरवाल, अशी लालूच हिंदुधर्म दाखवीत नाही, जय व अपजय ही हिंदुधर्मातील दृष्टी नाही. यश की अपयश ही हिंदुधर्माची दृष्टी नाही. कर्म; निष्काम कर्म एवढाच हिंदुधर्माचा शब्द आहे. जय येवो वा पराजय येवो तू आपला धर्म उत्कृष्टपणे आचार, तू आपले कर्म नीट बजाव, तू लढत राहा,  कर्म करीत रहा. ''मामनुस्मर युध्द्या च।'' ही हिंदुधर्माची शिकवण आहे. ''विजयाकडे जाण्याचा एखादा जवलचा रस्ता माझ्याजवळच आहे, मी दाखवितो या'' असले ढोग हिंदुधर्म दाखवीत नाही. स्वर्गातील अप्सरा व  नंदनविलास किंवा नरकातील यमयातना, नाना फले किंवा नाना छळ हिंदुधर्म हे काही दाखवीत नाही. हिंदुधर्म जर केवळ विजयाचेच तत्वज्ञान सांगत असेल तर तो अपूर्ण राहील; जगाच्या अनुभवावरच उभारलेला ठरेल. जय व पराजय याची फिकीर न करता तू भलेपणाने, मनात श्रध्दा  व वर परमेश्वर या भावनेन कर्म करीत रहा, अविरत झगडत रहा, असे सांगून हिंदूधर्म जयपरजयांच्या वर गेला आहे. तो विजयाचे नगारे वाजवीत नाही व पराजयाचे गार्‍हाणेही गात नाही. जयाने हुरळू नका, उन्मत्त होऊ नका; पराजयाने होरपळू नका, मुळूमुळू रडू नका असे सांगून हिंदुधर्म जणू निर्द्वंद्वाकडे घेऊन जात आहे, केवल कर्तव्याकडे घेऊन जात आहे.   आपणामध्ये खरी अचल श्रध्दा असेल तर जय किंवा पराजयाचे आपण साक्षी बनू; जगातील जयापजयाचे खेळ, खालीवर नाचणार्‍या राष्ट्रांचा नाच, हे रहाटगाडगे कौतुकाने पाहत राहू.  जय व पराजय ही माझी दोन पावले आहेत जन्म-मरणाची पावले टाकीत मनुष्य ज्याप्रमाणे पुढे चालला आहे त्याप्रमाणे जयापजयाची पावले टाकीत आपणास पुढे जायचे आहे. जय वा पराजय या दोहांना साधन करून मला माझे परमविकासाचे-परिपूर्णतेचे ध्येय गाठावयाचे आहे, आमच्या अंत:करणात सार्वभौम असा,  परमथोर असा, कशानेही उल्लू न होणारा व खचून न जाणारा असा संयम आहे. या महान संयमाच्या जोरावर जगातील बर्‍या वाईट परिस्थितीचा आम्ही आमच्या मनावर यत्किंचितही परिणाम होऊ देणार नाही. ज्यांची सारी दृष्टी या मर्त्य जगातच मिळणार्‍या विजयावर व वैभवावर, सुखांवर विकासावर खिळलेली आहे, त्यांचा आपणांस हेवा व मत्सर कशाला वाटावा ? या जगात जयापजय, सुख दु:ख जन्म मरण, पतन आरोहण उदय व अस्त, भरती ओहोटी, मान; अपमान, विकास व विनाश, हसणे व रडणे, स्तुती व निंदा यांचा विशाल दोला सारखा पुढे मागे होत आहे.  सुखापाठोपाठ छायेप्रमाणे येणार दु:ख मोठया विजयाच्या पाठोपाठ उरात धडकी भरवणारा पराजय, ट्राफलगारच्या पाठोपाठ आस्टर्लिट्झ, असे चक्रनेमिक्रमेण हे जग सारखे झुलत आहे हे आपणास माहित नाही का, ? या द्वंद्वातून तर पलीकडे जावयाचे आहे. जयला व पराजयाला दोघांसही काटीत; छाटीत आपणांस पुढे जावयाचे आहे. समोर त्या पैलतीरावर असलेल्या परमेश्वरास पहावयाचे आहे.

परिस्थितीच्या भरती; ओहोटीतून, या जयापजयातून, दोहांतूनही जो मानवी विचार, जे मानवी चारित्र्य निर्माण होत असते. त्या सत्य व  चिरंजीवी वस्तूला धर्म म्हणतात. हे जे विचारधन आपण जमा करीत असतो, हे जे चारित्र्य आपण जमा करीत असतो. त्यांच्याशी सहकार्य करूनच, त्याची मदत घेऊनच, आपण आपले सामाजिक जीवन किंवा राष्ट्रीय जीवन उभारीत असतो. राष्ट्रीय जीवन व धर्म यांची फारकत नसते.  धर्म व समाज याच्यांत प्राण व कुडी असा संबंध असतो. हा चारित्र्यरूप व  वैचारीक धर्म यांची राष्ट्रीय जीवनातून हकालपटटी कराल तर नाश होईल.  जो विचारनिधी, जी दिव्य ध्येये राष्ट्रला या भरती ओहोटीच्या काळात या येणार्‍या जाणार्‍या कालौघात मिळालेली असतात, ती जोपर्यत राष्ट्र उराशी धरून ठेवील, ती पर्यंत निष्ठेने, चिकाटीने, कष्टाने क्लेशाने, प्रसंगी प्राणार्पण करूनही सांभाळील, हे बीज, ही पुंजी जो पर्यत राष्ट्र हातची जाऊ देणार नाही, प्राणांचे पांघारूण घालून त्याला जपेल, तो पर्यत राष्ट्राला मरण नाही. 

आपला धर्म शिकवतो की, हे जग काही अंतिम सत्य नव्हे. अनंततेच्या मानाने हे जग काहीच नाही; मिश्याच म्हणा ना, हिंदुधर्माची ही विशाल दृष्टी ज्याच्या हृदयात श्रध्दापूर्वक बिंबवलेली असेल तो बाहय ख्यालीखुशालीच्या जीवनासाठी, बाहय सुखविलासासाठी, भराभर सुखोपभोग भोगावयास मिळावेत म्हणून, उच्चतम अशा धार्मिक आनंद, चारित्र्याचा व सत्यानुभवाचा आनंद,  तो दिव्य व अवीट असा आंतरिक आनंद गमावयास तयार होणार नाही.  मृत्कणासाठी माणिकमोती फेकून द्यावयास तयार होणार नाही. चिंतामणी कून गारगोटी पदरी बांधणार नाही.