Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 20

जो सदगुरु असतो तो काही एक मागत नसतो. शिष्यची देणगी न मागता येते. गुरू फक्त ध्येयदर्शन करवितो. गुरू शिष्याला गुलाम करीत नाही. गुलामगिरी ही निरळयाच जातीची अन्यत्र वाढणारी विषवल्ली आहे.  गुरूजवळ ती वाढत नाही. सदगुरू जितके स्वातंत्र्य देतो. तितके कोणीच देत नाही. ज्या स्वातंत्र्याच्या मोकळया हवेत ध्येयाची फुले फुलतात, जे  दिल्याने ध्येयाचा अधिकच विकास होतो. ते स्वातंत्र्य सदुगुरुइतके देणारा कोण आहे? आणि शिष्यही मागावे त्याहूनही अधिक भक्तिप्रेम देतो.  सदगुरु स्वातंत्र्य देतो. म्हणूनच शिष्य भक्ती देतो आणि शेवटी असा एक भाग्याचा दिवस उजाडतो की, त्या दिवशी सदगुरु शिष्याला म्हणतो. ''वत्सा आता सेवा पुरे. आता तुला बलवान पंख फुटले आहेत. जा आता व स्वतंत्र्य गगनविहार कर'' गुरू-शिष्याचे स्थूल. संबंध, बाहय बंधने तोडून शिष्याला दूर जा असे सांगण्याचे काम गुरूच करतो. कारण शिष्याला सेवेत व भक्तीतच आनंद वाटत असतो. तो सोडून जावयास तयारच नसतो. परंतु खरा विकास हा बंधनात होणार नाही हे जाणून खरी कसोटी बंधनात नाही हे जाणून, गुरू शिष्याला मोकळा करतो. 

गुरूच्या सिद्घित शिष्याची शक्ती आहे. गुरूजवळ ज्या मानाने असेल त्या मानाने शिष्यास मिळेल. गुरूच्या जोरावरच शिष्याच्या सार्‍या उडया.  आध्यात्मिक जगात निराधार असणे याहून दुर्देव नाही. ज्याला पाळ ना मूळ, ज्याला माय ना बाप, ज्याला सखा ना सदगुरु -असा उपटसुंभ कोणीतरी होणे, अशी कोणाशी संबंध नसलेली कोणावर न कधी विसंबिलेली अपूर्व विभूती होणे हयापेक्षा जन्माला न येणे बरे. ज्याला खाली खोल मूळ नाही आधार नाही, असली कुत्र्याची भूते किती वेळ टिकणार? काय दिवे लावणार? ती उगवली नाहीत ती वाळून जातील, दिसली नाहीत ती  अदृश्य होतील त्याचप्रमाणे असेही दुसरे काही आहेत, की जे स्वत:च्या विकासाला बांध घालतात, स्वत:ल मिळालेल्या देणगीची वाढ करीत  नाहीत. तेही लवकर मरतात. जो प्रवाह पुढे जाणार नाही. दुसर्‍या शेकडो प्रवाहाशी प्रेमाने मिळणार नाही. मोठया प्रवाहाशी मिळून त्याचे हितगुज  ऐकत नाही. तो प्रवाह गंगेला मिळणार नाही व म्हणूनच महान सागराचे  दर्शनही त्याला नाही. तो प्रवाह सुकून जाईल नाहीसा होईल.