Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 29

प्रत्येक ज्ञान म्हणजे वेदच आहे. ते ज्ञान समाजाच्या मंगलाचे असो. म्हणजे झाले. ते ज्ञान अनंताचे नवजीवन रुप प्रकट करणारे असो म्हणजे झाले. कसे जगावे हे शिकविणारे ज्ञान आयुर्वेद म्हणून संबोधिले जाते.  समाजाला दु:खाचा विसर पाडणारे संगीत त्याला गंधर्ववेद म्हणतात.  समाजाचे संरक्षण करणार्‍या विद्येला धनुर्वेद म्हणतात. सारे ज्ञान वेदच आहे. हे ज्ञान अनंत आहे. अनंतकाळात अनंतऋषी, अनंत ज्ञाने; अनंत वेद; देतच राहतील. सनातन धर्माचे विशाल ध्येय पुनरपी जगाला दाखविण्यासाठी पुन्हा आपणास परमोत्कट बौध्दीक विकासाची ज्वाला पेटविली पाहिजे. जे मोठे आहे ते कोणालाही नष्ट करता येणार नाही! ते क्षणभर झाकले जाते. डोळ्यांआड होते. मेघ येतात व सूर्याला झाकतात.  परंतु सूर्य मरत नाही, तो पुन्हा तेजाने झळकणारच. आपली महान ध्येये ती का मेली? नाही. ती अद्याप आहेत, ही महान्ध्येये ज्या कारणांनी डोळ्याआड होतात. ती कारणे आपण दूर करु या. क्षुद्र वासना, क्षुद्र सुखे, क्षुद्र आसक्ती यांच्या नादी लागून ह्या महान ध्येयांना आपण विसरतो.  ज्ञानपूजक, सत्यशोधक वेदधर्माचे खरे वारसदार व्हावयाचे असेल तर ज्ञानासाठी वेडे व्हा. अनंत क्षेत्रे पडली आहेत, तेथे घुसा सत्यासाठी म्हणून जे सत्य शोधू पाहतात, ज्ञानासाठी म्हणून म्हणूनजे ज्ञानापाठोपाठ जातात त्यांची तहानभूक कशी हरपते, देहालाही ते कसे विसरतात, दिवस रात्र कसे भुलतात हे या भरतभूमीत तरी सांगण्याची जरुरी नाही. आध्यात्मिकतेसाठी धडपडणा-याने, वेदाची उपासना करणार्‍याने 'बस्स झाले बुवा आता, थकलो आपण असे म्हणून वाटेतच कधी बैठक मारली असे ऐकीवात नाही, जो असा थांबेल तो शोधकच नव्हे. तो भक्त नव्हे. सत्याची खरी तहान त्या लागलेलीच नाही. जे आध्यात्मितेच्याबाबतीत तेच ज्ञानाच्या सर्व बाबतीत. ज्या यात्रेकरुने शुध्द भावाने ज्ञानमंदिराकडे जाण्यासाठी एक पायरी ओलांडली तो सर्व पायर्‍या ओलांडून गाभार्‍यात गेल्याशिवाय, यात्रा पुरी केल्याशिवाय थांबणार नाही. तोपर्यत त्याचे समाधान होणार  नाही.

मानवजातीने जे उद्योग चालविले आहेत, जे विचारप्रांत उत्पन्न केले.  आहेत त्या सर्व ठिकाणी आपणही गेले पाहिजे, ह्या सर्व बौध्दीक व औद्यागिक क्षेत्रातून मोठमोठी माणसे आपल्यामधूनच उत्पन्न झाली पाहिजेत.  असे जोपर्यत होत नाही तोपर्यत सुखाने घास खाता कामा नये. यंत्रविद्येत, वास्तुशास्त्रात, कलेत वा:ड्मयात, वैद्यकीत, तत्वज्ञानात, चिंतनात, सर्वत्र अद्वैत प्रकट करता येते. परंतु अद्वैत कधी अर्धवटपणे प्रकट होत नाही.  जगात दोन देवतांची कधी पूजा करता येत नाही. जे ध्येय धराल त्याची शेवटपर्यत कास सोडू नका. खरा अद्वैती हा दुनियेचा बादशहा आहे. तो जागातील स्वामी आहे. तो आपल्या विषयात थोडेसे जाणतो किंवा बरेचसे जाणतो. असे नाही. तर जेवढे जाणता येणे शक्य आहे तेवढे जाणतो. तो काम साधारणपणे बरे असे नाही करणार, तर उत्कृष्ट करील. १०० पैकी १०० मार्क मिळविणे. हे त्याचे ध्येय. हा त्याचा बाणा. खर्‍या अद्वैती मनुष्याला क्षुद्र वस्तूतही उदात्तता दिसते. प्रत्येक गोष्टीत त्याला सत्याचा साक्षात्कार होतो. नारायण दिसतो. आपल्याकडे संन्यासी तोंडाने नारायण म्हणतो, याचा अर्थ हाकी, खर्‍या संन्याशाला सर्व वस्तू नारायणाची रुपे वाटली पाहिजेत. सर्वत्र पावित्र्याचा त्याला अनुभव आला पाहिजे. गायीची अवलाद सुधारणे दरिद्री मजुरांना हात देणे हे नारायणाचेच रुप ही नारायणाचीच पूजा.

ही सर्वत्र मंगल पाहण्याची दृष्टी शिक्षकाला सर्वाच्या आधी हवी, कारण नवपिढीचा तो निर्माता असतो. जो विद्यार्थी समोर बसलेला असेल त्याच्यामध्ये सारे राष्ट्र, सारी मानवजात खरा शिक्षक पाहील समोर बसलेली मुले म्हणजे देवाच्या मूर्ती आहेत असेत्याला वाटेल. मुलांना तो हिडसफिडिस करणार नाही. तू दगड आहेस, बैल आहेस, असे म्हणणार नाही. 'देवो भूत्वा देवं जयेत् ।' स्वत: मंगल मंगलाची सेवा करावयाची.