Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 39

ज्यांच्यामध्ये हृदय व बुध्दी, भावना व विचार, गद्य व पद्य यांचे लग्न लागलेले आहे असे थोर कलावान आज भारताला पाहिजे आहेत. सर्व गोष्टींच्या आधी यांची फार जरूर आहे. ज्यांच्या हृदयात भारतीय भक्ति आहे व भारतीय ध्येये आहेत, ज्यांच्या नसानसात, ज्यांच्या तनुमनोमतीत भारतीय रक्त सळसळत आहे, असे कलावान आज पाहिजे आहेत. राम-कृष्ण, भीष्म व युधिष्ठिर, सीता व सावित्री, अशोक व हर्ष, बुध्द व महावीर, अकबर व शेरशहा, प्रताप व शिवाजी, चांदबिबी व रेझिया, जिजाई व अहिल्या, भवानी व लक्ष्मी यांची चित्रे शब्दात, रंगात व पाषाणात अशी उतरली पाहिजेत की, लोकांच्या अंगावर रोमांच उभारतील व अंत:करणात स्फूर्तीचे पाझर फुटतील. तशीच संतांची चित्रे व चरित्रे, शंकराचार्य, तुलसीदास, चैतन्य नायक, कबीर, तुकाराम, रामदास सर्वांची अशी शब्दचित्रे व रंगचित्रे वठवली पहिजेत की, हृदय उचंबळून येईल व म्हणवेसे वाटेल की, 'धन्य मी, जो या अशा संतांच्या व वीरांच्या भूमीत जन्माला आलो!' थोर विभूतींच्या जीवनातील प्रकाशनेच भविष्यकाळातील आपली कर्तव्य आपणास ठरवावयाची आहे. त्यांच्या जीवनातून मिळालेल्या उजेडातूनच भविष्यकाळाकडे नाचत जावयाचे आहे. भूतकाळातील प्रकाशाच्या साहाय्याने हे सर्व राष्ट्र पुढे यावे असे आज करावयाचे आहे. 'हिंदुस्थान, हिंदुस्थान' अशी जगालाच घोषणा करून दाखवावयाची. एवढेच नाही तर आपल्या हृदयाच्या गाभार्‍यातही भारत हाच शब्द घुमत राहिला पाहिजे.  मारुतीच्या हृदयात श्रीराम होता त्याप्रमाणे आपल्या हृदयात रामकृष्णांची जननी जी भारतमाता ती असू दे. सर्व भारतीय जनतेच्या हृदयात; लहान मोठयांच्या, स्त्री; पुरुषांच्या सर्वांच्या हृदयात, ही भारतमाता उभी करणे हे आज सर्व कलावंतांचे काम आहे. हे आज भारतीय कलेचे ध्येय; हे गन्तव्य व मन्तव्य; हे प्राप्तव्य व हेच निदिध्यासितव्य. कला ही ध्येयाची दिव्य  जननी असते, कलेच्या द्वारा ध्येय प्रकट होत असते. कला लोकांना त्या ध्येयाकडे घेऊन जात असते. ज्या वेळेस कला साकार होत असते, कलावंताच्या स्वप्नातून संसारात अवतरते त्या वेळेस ती ध्येयबाळाला मांडीवर घेऊनच येत असते. सूर्याजवळ प्रकाश, फुलाजवळ वास, गाईजवळ वत्स, त्याप्रमाणे कलेजवळ कलेचे दिव्य ध्येय असलेच पाहिजे. तरच ती शोभेल.

म्हणून आज प्रत्येक पावलापावलाला आपणास दोन गोष्टी करावयाच्या आहेत. तिकडे जगाच्या ज्ञानात भर घालावयाची व इकडे भारताचे ध्येय प्रकट करावयाचे. आजच्या पिढीतील लोकांसमोर हे दिव्य कर्म आहे. हे आजचे रणक्षेत्र, कर्मक्षेत्र. आपण ज्या मानाने आजची लढाई रंगवू त्यावर पुढील पिढीचे सारे जीवन, तिचे अस्तित्व अवलंबून आहेत. आजचे राष्ट्रीय जीवन म्हणजे सर्व राष्ट्राची झगडा करण्यासाठी उठावणी. हिमालयापासून रामेश्वरापर्यंत, पुरीपासून द्वारकेपर्यंत; सर्वांनी उठले पाहिजे व सर्वांनी हल्ले चढविले पाहिजेत. आताशा कोठे आपल्या बाहेरच्या भिंतीला धक्का लागत आहे तोच आपण उठू या, शत्रूवर तुटून पडू या. 'हर हर महादेव' व अल्लाह अकबर' अशा गर्जना करून विशाल कर्मक्षेत्रांत विजयी होण्यासाठी घुसा. उज्ज्वल भारताच्या पुत्रांनो! अंगावर चिलखत, बरची, भाला तसेच ठेवून रणांगणावर रात्री झोपण्यात तुम्हाला भीती वाटते का? शरपंजरी पडलेल्या भीष्माचे ना तुम्ही वंशज? कर्तव्याच्या रणांगणावर आता दिवस असो, रात्र असो; सदैव तेथेच झळकले पाहिजे. नवीन आध्यात्मिकतेच्या नवधर्मांच्या, नवदिव्यतेच्या नावाने पुढे चला, कूच करा, कूचाचे नगारे वाजू देत. रणशिंगे फुंकली जाऊ देत, रणभेरी दुमदुमु दे. अर्वाचीन जगाची सारी भांडारे, सारे खजिने आपलेसे करून घेण्यासाठी सीमोल्लंघन करा.  पुढे चला, पुढे चला. भारतमातेच्या शूर सैनिकांनो! आता मागे बघू नका माघार घेऊ नका. शत्रूचे किल्लेकोट काबीज करा; काबीज केलेली शिबंदी राखून सांभाळा. मोठया हिंमतीने, मोठ्या किमतीने व मोठ्या श्रमाने जिंकलेले भाग पुन्हा गमावू नका. प्रयत्न करता करता तुम्ही थकला असाल तर मरा; तुमच्या मुडद्यांवरून तुमच्या पाठीमागून येणार्‍या नव्या ताज्या दमाच्या तुकडीला वर चढू दे व निशाण फडकवू दे.