श्री शिवराय 3
ऐक्याचा सोहळा
लोक जातीभेद विसरून एकमेकांस क्षेमालिंगने देत आहेत. नामघोषात रंगले आहेत... ते महान दर्शन होते. त्या दृश्याचे वर्णन सांगताना तुकाराममहाराज म्हणतात...
“कठोर हृदये मृदु नवनीते
पाषाणा पाझर फुटती रे
एकमेका लोटांगणी येते रे”
तो ऐक्याचा सोहळा पाहून पाषाणाला पाझर फुटतो. कठोर हृदयाचे सनातनी-त्यांचीही मने लोण्यासारखी झाली असती. एकमेक एकमेकांस प्रणाम करीत होते.
वन्ही तो पेटवावा रे
भावगतधर्मी संतांनी सोपा सुटसुटीत नीतीधर्म दिला. जनतेच्या भाषेत दिला. भेदभाव कमी केला. लाखो लोक जमवून ऐक्याचे दर्शन घडविले. उत्कटता निर्माण केली. यात आणखी भर घालण्यासाठी त्या वेळेस समर्थ रामदासस्वामीही उभे राहिले. बाळपणीच “आई, चिंता करितो विश्वाची” असे म्हणून हा मुलगा कोप-यात विचार करीत बसे. घरातून हा बालशुक बाहेर पडला. बारा वर्षे तपश्चर्या करून पुढे बारा वर्षे देशपर्यटन केले. समर्थांनी देशाची स्थिती पाहिली. त्यांचे हृदय विदीर्ण झाले. लोकांत त्राण नव्हते.
“न मिळे खायला खायला खायला.” असे हृदय पिळवटून समर्थ सांगत आहेत. लोकांच्या पोटात अन्न नाही. डोक्यात विचार नाही. काय करावे?
समर्थनांनी महाराष्ट्र भूमी कार्यक्षेत्र म्हणून पसंत केली. महाराष्ट्र डोंगराळ प्रदेश. ठायी ठायी उंच किल्ले, खोल द-या. येथे स्वराज्याची शक्यता आहे असे का त्यांना वाटले?
पडलेल्या जनतेत सुप्त शक्ती असते, पण घर्षणाशिवाय ठिणगी पडत नाही.
“वन्हि तो पेटवावा रे।
पेटविताचि पेटतो।।”
असे समर्थ म्हणाले. कोठेतरी ठिणगी पडू दे. वन्ही पेटू दे. परंतू वन्ही कसा पेटवणार?
समर्थांनी कर्माचा संदेश दिला
भागवतधर्मी संतांनी ऐक्य निर्मिले. उत्कटता निर्मिली, परंतु कर्माचा संदेश द्यायला समर्थ उभे राहिले. त्यांनी एक नवीन दैवत दिले. कोदंडपाणी प्रभू रामचंद्र! रामचंद्रांची उपासना त्यांनी उपदेशिली. यात हेतू होता. रामाचा अवतार कशासाठी? रावणाचे निर्दालन करण्यासाठी. बंदिखान्यात पडलेले कोट्यावधी देव सोडवण्यासाठी राम आला. आजही नाही का येणार? येईल. परंतु जीवन संयमी करा. फोल चर्चा थांबवा. थोडे धारिष्ट करा. देव यायला तयार आहे. परंतु...
“कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे।।”
तुमच्या धाडसाची तो अपेक्षा करतो. तुम्ही हात, पाय, हलवा. उठा, गोपाळांनी काठ्या लावल्या म्हणजे प्रभूची करांगुळी आहेच.