श्री शिवराय 2
अंधार व निराशेचा काळ
शिवरायाच्या वेळची देशस्थिती मनासमोर आणा. किती विपन्न दशा होती! उत्तर हिंदुस्थानात मोगलांचे राज्य होते. हिंदू राजेमहाराजे मोगलांचे अंकित झाले होते. धर्माची अवहेलना होत होती. मंदिरे उध्वस्त केली जात होती. बाटवाबाटव होत होती. ठायीठायी सरदार, जहागीरदार, जमीनदार यांची सत्ता. जनता त्रस्त झाली. धर्मही उरला नाही, खायलाही उरले नाही.
दक्षिण हिंदुस्थानातही तोच प्रकार. मुसलमानांच्या लोंढ्याला दोनशे वर्षे विजयनगच्या साम्राज्याने रोखले. परंतु पुढे तालीकोटच्या लढाईत हा कोट ढासळला; आणि सर्वत्र मुसलमानी सत्ता पसरली. दक्षिण हिंदुस्थानात पाच पातशाह्या झाल्या. त्या त्या ठिकाणचे मातब्बर हिंदु ह्या शाह्यांची सेवा करु लागले. गरिबांची दैना होऊ लागली. कोठे आधार दिसेना सर्वत्र अंधार व निराशा होती.
मुसलमानी राजे सक्तीने धर्मप्रसार करीत होतेच. परंतु हिंदू धर्मातील तुच्छ मानलेल्या जातींतील हजारो-लाखो लोकदेखील नाइलाजाने मुसलमानी धर्माचा स्वीकार करू लागले. मुसलमानी फकीर विरक्तपणे धर्माची गीते गीत गावोगाव हिंडत. हातात कंदील व मुखात धर्माचे सोपे गीत! हे शेकडो त्यागी फकीर मुसलमानी धर्माचा संदेश देत होते. हिंदु धर्माचा संदेश कोण देणार?
विस्कळीत हिंदु समाज
धर्म जणू रसातळाला गेला. त्याचप्रमाणे अन्नान्नशाही होती. सर्वत्र जुलुम, भांडणे, धर्माधर्माची भांडणे, जातीजातीची भांडणे, शैव-वैष्णवांची भांडणे, सर्व हिंदु समाज जसा विस्कळीत होऊन गेला होता. ना एक ध्येय, ना एक विचार. प्रबळ झंझावाताने जीर्ण-शीर्ण पणे दशदिशा उडून जावी, त्याप्रमाणे दीन-दरिद्री दुबळी जनता वाटेल तशी फेकली जात होती. जनतेला ‘त्राही भगवान्’ झाले.
परंतु अमावस्या जितकी जवळ, तितकी बीजेची चंद्रकोरही जवळ. हिंदुस्थानभर अंधार होता. परंतु कोठे तरी प्रकाश येणार असे वाटू लागले. कोठे मिळणार हा प्रकाश? कोठून मिळणार आशा? महाराष्ट्राकडे हे महान कर्म आले. भारताला मार्गदर्शन करण्याचे महान कर्म.
पांडुरंगाच्या अध्यक्षतेखाली नवा महाराष्ट्र
मुसलमानी धर्मातील एकेश्वरतेचा परिणाम होत होता. मशिदीत सारे समान. सारे भाऊ. एक ईश्वर व आपण सारे भाऊ. हिंदु धर्मात कोट्यावधी दैवते, आणि शेकडो पंथभेद. सारा समाज जसा फाटून गेला होता. मुसलमानी संस्कृतीचे प्रखर प्रहार होत होते.
अशा वेळेस संत पुढे आले. त्यांनी काळाचा संदेश ऐकला व तो आमजनतेला दिला. त्यांनी ब्रह्मविद्येची गुप्त भांडारे खोलली. संस्कृतातील धर्म जनतेच्या भाषेत आणला. ओवी व अभंग यांच्याद्वारा महाराष्ट्राची मते एक होऊ लागली. भागवतधर्मी संतांनी पंढरपूरचा विठूराया महाराष्ट्रासमोर उभा केला. अनेक दैवते असतील, परंतु एका दैवताकडे सर्वांचे डोळे वळविले, आणि जनतेत ऐक्य निर्माण व्हावे म्हणून वा-या निर्मिल्या. आषाढी-कार्तिकीच्या महावा-यांची परंपरा निर्मिली. त्या त्या ठिकाणांहून थोर संतांबरोबर हजारो नारी-नर नामघोष करीत निघू लागले. पंढरपूरच्या वाळवंटात महाराष्ट्राच्या ऐक्याचे दर्शन होऊ लागले. तेथे त्या विटेवरील समचरण मूर्तीसमोर, कटीतटावर कर ठेवून उभ्या असलेल्या मुक्या पांडुरंगासमोर सारा महाराष्ट्र भेदभाव विसरू लागला. पांडुरंगाच्या मुक्या अध्यक्षतेखाली नवमहाराष्ट्र उभा राहू लागला.