श्री शिवराय 1
स्वराज्यसंस्थापक : श्रीशिवराय
आपण आज स्वातंत्र्यासाठी धडपडत आहोत. प्रबळ अशा परसत्तेशी आपण झुंज देत आहोत. मध्येच निराशा घेरते. अशाप्रसंगी कोणाचे स्मरण करावे, कोणाची मूर्ती डोळ्यांसमोर आणावी? कोणाचे ध्यान करावे, कोणाजवऴ स्फूर्ती व प्रेरणा मागावी? अंत:करणात अतूट व अखूट असा ध्येयवाद व आशावाद कशाने निर्माण होईल. कितीही विपत्ती येवोत, अडचणी आ पसरून उभ्या असोत, त्या सर्वांतून मार्ग काढीत आम्ही आमचे ध्येय गाठूच, असा अमर विश्वास कोण बरे आपणास देईल? कोण प्रकाश देईल? कोण मार्ग दाखवील?
मातीतून कर्मवीर
ज्याला उज्ज्वल भूतकाळ आहे, त्याला उज्ज्वल भविष्यकाळ आहे. भूतकाळातून आपणास अमर असा संदेश मिळत असतो. भूतकाळातील त्यागाचे, पराक्रमाचे, ध्येयोत्कटतेचे प्रसंग आपणास स्फूर्ती देतात. मनुष्य व मातीचे मडके यांत काय फरक? आपणही मातीच आहोत. परंतु मातीत चैतन्यमय विचारविद्युत संचरली म्हणजे त्या मातीतूनच कर्मवीर मानव निर्माण होत असतात. शालिवाहन राजाची गोष्ट सांगतात. त्याने मातीतून झुंजार वीर निर्माण केले व शक-शत्रूंचा पराजय केला. मातीतून वीर निर्माण करणे म्हणजे काय? शालिवाहन राजाने मातीप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्रातील जनतेत तेज फुंकले. लोकांची डोकी म्हणजे खोकी होती. मने मेलेली होती. शालिवाहन राजाने जनतेच्या डोक्यात तेजस्वी विचार निर्माण केले. त्यांच्या हृदयांत जिवंत, उदात भावना निर्माण केल्या. त्याने मढयांना चैतन्यकळा दिली. मेलेले राष्ट्र उभे केले. नवयुग निर्मिले. नवीन शक सुरू केला.
राज्यकर्ता महावीर शिवाजी
शालिवाहन राजाच्या अमर पराक्रमाची खूण म्हणून गुढीपाडवा आपण मानतो. परंतु ती खूण मानीत असलो तरी ती गोष्ट फार जुनी झाली. शालिवाहनानंतर असा कोण पुण्यप्रतापी महापुरुष महाराष्ट्रात झाला, की ज्याची स्फूर्ती सदैव पुरेल? ज्याचे स्मरण ध्येयार्थ मरायला शिकवील? ज्याचे स्मरण गुलामगिरीत एक क्षणभरही खितपत पडू देणार नाही? आहे का असा शककर्ता महावीर? आहे का अशी अद्वितीय विभूती? येते का डोळ्यांसमोर, राहते का उभी अंत:करणात?
होय. महाराष्ट्राजवळ अशी चिरकीर्ती विभूती आहे. महाराष्ट्राचे थोर भाग्य; देवाची त्याच्यावर थोर कृपा. महाराष्ट्राचे मस्तक ज्याच्यामुळे सदैव उन्नत राहील असा थोर पुरुष महाराष्ट्रात होऊन गेला. ज्याने अंधारात प्रकाश आणला, दास्य दवडून स्वातंत्र्य़ आणले, असा तो लोकोत्तर पुरुषसिंह होता. काय बरे त्याचे नाव?
त्या पुण्यश्लोक विभूतीचे नाव गो-ब्राह्मण-प्रतिपालक छत्रपती श्रीशिवाजीमहाराज.
महाराष्ट्रा, शिवरायाचे दिव्य चरित्र आठव आणि आजच्या बाक्याप्रसंगी वीराप्रमाणे उभा राहुन मातृभूमी स्वतंत्र्य़ करण्याचे काम पुरे होईपर्यंत माघार घेऊ नकोस.