Get it on Google Play
Download on the App Store

अवशेष

माला स्वप्नांची ओघळली !

जपली ध्येये जी ह्रदयाशी

गमली मजला जी अविनाशी

कोसळुनी ती जमल्या राशी

अवशेषाच्या या भवताली.

रवि येतां क्षितिजावर वरती

दवापरी विरल्या आकांक्षा

जागिच जिरल्या मनी जिगीषा

हासत झाकुनि त्या अवशेषा

करणे आहे प्रवास पुढती.

वास्तव जगताच्या हेमन्ती

स्वप्नांचा उत्फुल्ल फुलोरा

ढाळि तळाला वादळ -वारा

रात्रीच्या त्या प्रदीप्त तारा

काचेचे कण आता गमती.

पण अद्यापी स्मृतिचे धागे

गुन्तुन मागे जिवा ओढती

अद्यापी त्या विझल्या ज्योती

कधिं एखाद्या भकास राती

पहाट ये तो ठेवति जागे.

दृश्ये मोहक अद्यापी ती

स्वप्नामध्ये समूर्त होती

थडग्यामधुनी छाया उठती

धरावया जो जावे पुढती

थडग्यामध्ये विलीन होती.

वसन्त सरला, सरले कूजन

सरले ते कुसुमांकित नंदन

सरले आर्त उराचे स्पंदन

मूर्तीवरिल मुलामा जाउन

सरले आता मूर्तीपूजन.