Android app on Google Play

 

दूर मनोर्‍यांत

वादळला हा जीवनसागर -अवसेची रात

पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात

भांबावुनि अभ्रांच्या गर्दित गुदरमरल्या तारा

सूडानें तडतडा फाडतो उभें शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भंवतालीं

प्रचण्ड भिंगापरि फुटतें जळ आदळुनी खालीं

प्रवासास गल्बतें आपुलीं अशा काळरातीं

वावटळींतिल पिसाप्रमाणें हेलावत जातीं.

परन्तु अन्धारांत चकाके बघा बन्दरांत

स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शान्त !

किरणांचा उघडून पिसार देवदूत कोणी

काळोखावर खोदित बसला तेजाचीं लेणीं

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यांत

अन् लावा ह्रदयांत सख्यांनो, आशेची वात !