प्रामाणिक नोकर 2
‘तुमचा मुलगा दुकानात काम करावयास योग्य नाही. तो माझ्या मर्जीतून अजिबात उतरला आहे. असे नोकर ठेवून धन्याला लौकरच हाय हाय म्हणत बसण्याची पाळी येईल. मी तुमच्या मुलास काढून टाकू इच्छित आहे.’ अशी एक चिठ्ठी लिहून त्या मुलाबरोबरच त्याच्या बापाकडे त्याने पाठविली.
बापाने चिठ्ठी वाचली. बापाने मुलाला, काय झाले म्हणून विचारले. मुलगा म्हणाला, “माझ्या हातून काही चूक घडल्याचे मला तरी माहीत नाही. त्यांनाच जाऊन विचारा म्हणजे उलगडा होईल.”
मुलगा व बाप दोघे दुकानात आले. बाप त्या शेठजीजवळ जाऊन चौकशी करू लागला. तो शेठजी रागारागाने म्हणाले, “अहो, ती बाई साडी चांगली घेत होती. ती साडी बांधून देणे एवढे याचे काम. दुकानातील मालावर टीका करीत बसण्याची काही जरूरी होती? ती साडी कोठे जरा फाटकी होती. त्या बाईचे लक्षही नव्हते. याला ते दिसले व आपण होऊन हा त्या बाईला म्हणतो, ‘बाई, ही
घेऊ नका साडी. ही जरा फाटली आहे.’ आहे की नाही अक्कल! अशाने का दुकान चालेल? पंचवीस रूपायांचा माल पडला अंगावर?”