Get it on Google Play
Download on the App Store

प्रामाणिक नोकर 1

एका कापडाच्या व्यापा-याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते. प्रामाणिकपणाने वागावे, कोणाला फसवू नये. कोणाला हसू नये. कष्टाने मिळेल ते खावे. चोरी-चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहवे लागले तरी आनंदाने राहवे, असे त्याचा बाप त्याला शिकवीत असे. निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते.  मुलगा चुणचुणीत होता; चपळ होता; परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता. दुकानात तो सर्वांना आवडे. गि-हाईक त्याच्याकडे जास्त यावयाचे; दुस-या नोकराकडे कमी जावयाचे. बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवाघरची फुले.

एके दिवशी एक श्रीमंत बाई काही रेशमी कापड खरेदी करावयास आली होती. एक रेशमी साडी तिने पसंत केली. तिला पोत आवडले, रंग आवडला. पदरही सुंदर होता. तो मुलगा ती साडी बांधून देत होता परंतु इतक्यात ती साडी एके ठिकाणी थोडी फाटली आहे असे त्याला दिसले. त्या बाईने ते पाहिले नव्हते. परंतु तो मुलगा प्रामाणिक होता. तो तिला गोड शब्दांत ही साडी येथे जरा फाटली आहे. ही नका घेऊ. दुसरी पसंत करा; येथे पुष्कळ नग आहेत.”

परंतु त्या बाईला तसलीच साडी पाहिजे होती. तशी साडी त्या दुकानात नव्हती. ती बाई निघून गेली. दुकानदार गादीवर बसलेला होता. नोकराचे ते वर्तन पाहून त्याला राग आला. असला नोकर काय कामाचा? त्याच्यामुळे दिवाळे काढण्याची पाळी यावयाची, असे तो मनात म्हणाला.