Get it on Google Play
Download on the App Store

आई व तिची मुले 2

ती पहा एक कोंबडी. कशी दिसते पोक्त व प्रेमळ. ती पहा तिची पिले तिच्याभोवती नाचत आहेत. आज सणावाराचा दिवस, आपल्या पिलांना काय द्यावे, याची जणू तिला चिंता होती. रोज उकिरडे उकरून ती पिलांना खायला देत असे. परंतु आजच्या दिवशी नकोत ते उकिरडे तेथील ते किडे, तिला वाटले. ती पिलांना घेऊन हिंडत त्या गरीब बाईच्या झोपडीजवळ आली, दार उघडेच होते. जणू तिचे स्वागत करण्यासाठीच ते उघडलेले होते. कोंबडी पिले घेऊन आत गेली. कोंबडी शोध करू लागली. तेथे घडवंचीवर तिला परळ दिसला. तिने घडवंचीवर उडी मारली. आपल्या चोचीने ती कणीक तिने खाली फेकण्यास सुरूवात केली. पिले मटामट खाऊ लागली. कोंबडीसुद्धा फराळ करू लागली. परळातील सारी कणीक तिने पिस्कारून टाकली. मायलेकरे स्वस्थपणे सणावाराचे जेवण जेवत होती.

ती गरीब आई बाजारातून गूळ घेऊन झोपडीत शिरली. ती कोंबडी एकदम घाबरली. ‘पक् पक्’ करू लागली. तिच्या त्या उडण्याच्या धांदलीत तो परळ पडला व फुटला. होती नव्हती कणीक सारी उपडी झाली. ती केरात मिसळली. कोंबडी व तिची  पिले सारे पसार झाली. ती गरीब माता खिन्नपणे तेथे उभी राहिली.

तिला मुलांचा राग आला. कोंबडीच्या पिलांनी तेथे सारी घाण केली होती. ती कणीक घेण्यासारखी नव्हती. बाजूची थोडी थोडी तिने गोळा केली. परंतु ती कितीशी पुरणार? माता कणीक गोळा करीत आहे तो मुले धावतच घरी आली. तेथील तो प्रकार पाहून ती अगदी ओशाळली.

“काय आता खाल? आज म्हटलं पुरणपोळी करीन; परंतु नाही तुमच्या नशिबी. तरी सांगितले होते की, घरातून जाऊ नका म्हणून. क्षणभर तुमचा पाय घरात टिकत नाही. सतवायला व छळायला आली आहेत कार्टी जन्माला! जरा म्हणून ऐकत नाहीत.” ती माता मुलांना रागे भरू लागली.