सत्त्वशील राजा 2
राजा बळेच म्हणाला, “आंधळ्या! अरे घरदार माग, जमीनजुमला माग. डोळा रे काढून कसा देऊ? जरा विचार करून तरी मागावे की नाही?” तो आंधळा म्हणाला, “म्हणूनच मी मागत नव्हतो. ‘माग’ म्हणालास म्हणून मागितले. प्रजेचे पैसे प्रजेला द्यायचे. गंगेतल्याच पाण्याने गंगेला अर्घ्य द्यायचे. राजा, तुझ्या उदारपणाची काय रे मोठीशी थोरवी? परंतु मी कशाला अधिक बोलू? बरे तर, मी जातो.”
राजा म्हणाला, “आंधळ्या! थांब, थांब. मी डोळा देण्यास तयार आहे. कालच रात्री मी म्हणत होतो, जर माझा कोणी देह मागेल तर तो मला दिला पाहिजे. माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल, असे वाटले नव्हते. परंतु देवाची कृपा. आज माझ्या एका डोळ्याचे तरी सार्थक होत आहे.”
राजा डोळा काढून देणार, ही बातमी शहरात पसरली. राणी म्हणाली, “असा सुंदर डोळा का काढून देणार? वेडेपणा आहे. त्या आंधळ्याचे काय ऐकता?” प्रधान म्हणाले, “देण्याला तरी काही मर्यादा आहे. सा-या प्रजेचे तुम्ही पोशिंदे. तुम्ही सुखी तर प्रजा सुखी. असा वेडेपणा करू नये.” राजा म्हणाला, मी वेडा का तुम्ही वेडे? अरे, जरा विचार तरी करा. हे दोन डोळे आज सुंदर दिसत आहेत. आणखी पाचदहा वर्षांत त्यांची काय दशा होईल ते पहा. सारखे पाणी गळेल, दिसत नाहिसे होईल, पू येऊ लागेल. अरे, हा सारा देह जावयाचा आहे. दहा वर्षांनी मी आंधळाच होईन किंवा सारा देहच मातीत जाईल. जाणा-या नाशिवंत वस्तूला देऊन न जाणारी व चिरकाळ टिकणारी कीर्ती जर मोबदल्यात मिळत असेल, तर ती का न घ्या? हा डोळा देऊन मी अभंग, अमर असे यश जोडीत आहे. माझ्या कुळाचे नाव राहील, माझी गोष्ट लोक नेहमी सांगतील व ऐकतील. मी वेडा का तुम्ही वेडे?”