नरवीर मालुसरे, सिंहगडावर छापा
(चाल :- महाराज शिवाजी छत्रपतीची कीर्ति )
चौक १
धन्य धन्य शिवाजी महाराज पराक्रमी महान् ।
महा मत्त मारिला ज्याने अफझुलखान ।
शाहिस्त्याची बोटें तोडुनी केला हैराण ।
कांपती यवन थरथरां, म्हणती अंतरा,
शिवाजी खरा, बडा सैतान ॥ध्रु०॥
एके दिवशी जिजाबाई विचार करुनी स्वमनाचा ।
शिवाजीस प्रश्न पुसे आपल्या राजकारणाचा ।
सिंहगडावरी अम्मल अझुनी यवनांचा ।
गड किल्ल्याचा हा तात, घेऊनी हातात,
पुणें प्रांतात, खुशाल तुम्ही नाचा ॥
केला विचार शिवाजीनें मातुश्रीच्या वचनाचा ।
आणविला मित्र जिवलग सखा प्राणांचा ।
तानाजी मालुसरे अवतार भीमसेनाचा ।
त्याच्या घरीं पाहुण्यांचा मेळा, झाला होता गोळा,
आनंद सोहळा, मुहूर्त लग्नाचा ॥
सूर्याजी बंधु आणि शेलार मामा त्याचा ।
म्हातारा ऐंशी वर्षाचा लढवय्या साचा ।
बाराशें मावळे जमाव घेऊन लोकांचा ।
आला रायगडावरी शीघ्र, स्वरुप त्यांचे उग्र,
जसा काय व्याघ्र, कलिजा राजाचा ॥
चाल
तानाजी मोठा बलवान, धिप्पाड महान्,
विस्तीर्ण भाळ, स्वरुप विक्राळ ॥
दंडासारख्या मिशा गुलढबू, त्यावरी लिंबू राहे सूढाळ,
हृदय विशाळ ॥ हत्तीचे धरुनिया सुळे,
उभा करी बळें वीर्य तेजाळ, कर्दनकाळ ।
चाल : दुसरी
दांडपट्टा करवाईत नंबर पहिला खरा ।
शिवाजीस भेटतां लवून केला मुजरा ।
कां बोलविले मज सांगा राजेश्वरा ।
काय संकट पडलें सत्य सांग मैतरा ।
राव म्हणे जिजाईस पुस जाऊनि चातुरा ।
आली जिजाबाई पंचारती घेऊनी करा ।
शिवाजीस ओवाळुनी मग तानाजी वीरा ।
ओवाळु लागतां चकित मालुसरा ।
मोडते
काय घालू ओवाळणी राजमाता ही महान ।
म्हणे जिजाबाई शिव थोरला पुत्र तूं लहान ।
तुम्ही दोघे समान मज ओवाळीलें प्रेमानें ।
काय ओवाळणी अवघड, द्यावा सिंहगड,
वैरी तुझ्याकडे वांकवील मान ॥१॥
चौक २
ऐकुनी खवळला व्याघ्र जसा काय दरिचा ।
गर्जना करुनी आदळला पाय आणि बरचा ।
उचलुनी विडा बोलिला हेतु अंतरीचा ।
जाऊनी सिंहगड घेतो, तरिच मागें येतों,
नातरि धरितों, रस्ता स्वर्गीचा ॥
घ्यावा मुजरा शिवाजी शेवटला मित्राचा ।
जरी मेलों तिकडे तरी सांभाळ करी पुत्राचा ।
घरी लहान रायाजी येवढा हेतु अंतरीचा ।
द्यावें भोजन सकळ सैन्यास, हुरुप जाण्यास,
उदयभान्यास दरारा आमुचा ॥
भोजन घालून सर्वांस विडा पैजेचा ।
उचलुनी तानाजी शब्द करी मौजेचा ।
हत्यारबंद जमाव करुनी सार्या फौजेचा ।
मावळे निघाले फडफडाड, शब्द कडकडाड,
धरला झडझडाड, रस्ता सिंहगडाचा ।
चाल
भाला बरची तलवार पट्टा,
बाण तीर कमटा असा परिवार, चपळ अनिवार ॥
सिंहगड फार अवघड, भयंकर चढ चढले भराभर, केवळ वान्नर ॥
माघ महिना वद्य अष्टमी, काळोख नामी, गडद अंधार, रात्र दीड प्रहर ॥
चाल : दुसरी
चाळीस हात उभा कडा किल्ला अवघड ।
बांधीव तटावर बुरुज तिकोनी गड ।
किल्ल्यावरी सोडली यशवंती घोरपड ।
तीन वेळ परतली मग झाली चरफड ।
रागे धरुन सोडितां तिने धरिली पक्कड ।
तानाजी शेलार मामा सर्वांच्या पुढें ।
तीनशें चढून वर गेले वीर फक्कड ।
इतक्यात तुटला दोर पडले वरकड ।
मोडते
घस्तीस लागली चाहुल गनिम आया कोण ।
एक शिपाई आला पाहवया धरुनी अभिमान ।
ठार केला त्यास पुढे येतां मारुनी बाण ।
बाकीचे पळाले धडधडा, गनिम आया बडा,
चढके अभी कडा खडा दुष्मान ॥२॥
चौक ३
उदयभानू बाटगा रजपूत मगरमस्त ।
एक गाय दीड शेळी नित्य खाऊन करी फस्त ।
अफु, गांज्या, दारुच्या निशेंत निशिदिन मस्त ।
अठरा बिब्या भोगि महालांत, विषय-ख्यालांत,
धुंद तालांत, बलाढय प्रस्थ ॥
त्याच्या पुढें युद्धाला कोण टिकेना दरोबस्त ।
चांदवडी रुपये चिमटीनें तोडितो नुस्त ।
तेल्याची पहार बडी वाकवुनी भारदस्त ।
थट्टेनें करुनियां सरी, बिबीच्या तरी, गळ्याभीतरी, बैसवी तुस्त ॥
आठराशें शिपाई रजपूत पठाण मदमस्त । वेशीच्या आंत सदरेवरी बंदोबस्त ।
रात्रीची वेळ लोक निजले होते काय सुस्त । अशा संधित केला हल्ला,
झाला गलबला, करुन भिसमिल्ला, कापली घस्त ॥
तानाजीनें केली कापाकापी धरुनियां शिस्त ।
पांचशें पठाण कापुनी केले उध्वस्त ।
किती जखमी झाले कितीकांचे तुटले हस्त ।
रक्ताचा झाला कर्दम, पाहून एकदम, पळाले अधम, करुनी शिकस्त ॥
चाल
उदेभानु आणि तानाजी, सहजासहजीं येक झाली नजर, भिडले सामोर ॥
द्वंद्व युद्ध झालें मग सुरु, हिमाचळ मेरु जसे गिरीवर, लढाई घनघोर ॥
एकाचे एकाला वार, झाले अनिवार, उभयता वीर, जाहले ठार ॥
चाल : दुसरी
इतुक्यांत दरवाजा भवानीनें उघडिला ।
सूर्याजी मावळे घेऊनियां वर आला ।
तानाजी पडला पाहुनी फार खवळला ।
गर्जनायुक्त रणीं व्याघ्र जसा धांवला ।
मोड करुनि शत्रुचा पुरा किल्ला घेतला ।
कितीकांनी भीतीनें आपुल्या हातीं आपुला ।
तटावरुन उडया घालूनी जीव काय दिला ।
जय सूचक केंबळ घरासी अग्नी लाविला ।
रायगडावरुनी तो शिवाजीनें पाहिला ।
त्या आनंदात म्हणे धन्य सुभेदार भला ।
मोडते
दुसर्या दिवशी फडकले मराठयांचे निशाण ।
तीनशे मावळे झाले निकामी सैन्य ।
शिवाजीस समजतां सकळ वर्तमान ।
सिंह गेला आणि गड आला, देव कोपला,
उपाय नाहीं त्याला, भरले मग नयन ॥३॥
चौक ४
जिजाबाईस झालें दुःख त्यावेळी भारी ।
धन्य धन्य तानाजी मोक्षाचा अधिकारी ।
ओवाळणी घालून काय गेला स्वर्गा माझारीं ।
धाय धाय जिजाबाई रडे, बहूत ओरडे, असा वीर पुढें, न होय निर्धारी ॥
सूर्याजीस दिली त्या गडावरची मुखत्यारी ।
रणीं पडले त्यांच्या वारसाला द्रव्य दिलें भारी ।
कडी तोडे कितीकांस दिल्या ढाल तलवारी ।
खूष केले सकळ सैनिका, इनाम किती एका,
पराक्रम पक्का, पाहुन बाहादुरी ॥
रायाजीनें लग्न मग केलें आपुल्या द्वारी ।
रद्द केली प्रतीकुळ समजुनी पहिली नवरी ।
रुपवान कुलवान दुसरी आणुनिया गहिरी ।
समारंभ करुनी ठाकठीकी, देउन देशमुखी, रायाजीस पक्की, दिली सरदारी ॥
चाल
पुढें शिवाजीच्या मर्जीनें, त्या सूर्याजीनं पराक्रम केला, ऐका दाखला ॥
गड किल्ला पुरंधर, डोंगरावर, चढविला हल्ला, यवन फार भ्याला ॥
उदेभानुचा तिथें भाउ, पाहूनी झाला म्याऊ, त्या सूर्याजीला, शरण मग आला ॥
चाल दुसरी
आला आला सूर्याजी आला दंड ठोकुन ।
उदेभानुची दुर्दशा सकळ ऐकुन ।
चट सारे मोंगल पठाण भ्याले देखून ।
केला स्वधीन किल्ला आपुला बोज राखून ।
शिवाजीचें निशाण किल्ल्यावरी अवलोकुन ।
बादशाहासी हेर सांगती तोंड फांकुन ।
ऐकुनी शहाची गेली कंबर वाकुन ।
झाली साह्य भवानी वैरी दिले हांकुन ॥
मोडते
एकापाठीं एक जय मिळतां कांहीं दिवसान ।
दिल्ली विजापूर बादशहाचें गळले अवसान ।
कवि रामचंद्राचें कवन शब्दाची खाण ।
श्रीकृष्णातिरी रहिवास, यमक अनुप्रास, ऐकतील खास, मर्द प्रेमानं ॥४॥