Get it on Google Play
Download on the App Store

छत्रपति शिवाजी महाराजांचा पोवाडा

चौक १

यवनराज्य पद्धती राक्षसी जाचक झालि चहूवर्णां ।

स्वधर्मग्लानी पाहुनी हानी शिवप्रभूला आली करुणा ॥ध्रु०॥

साल पंधराशे एकुण पन्नास म्हणती शालिवाहन शक ज्याला ।

श्री शिवराये पवित्र केलें निजक्षत्रिय कुलबीजाला ॥

द्वितीय मासीं हा द्वितीय पुत्र अद्वितीय शहाजी राजाला ।

द्वितियेचा चंद्रमा अजुनी पहा सूख दर्शवी मनुजाला ॥

यवन भूपती पुसे माहिती आजुबाजुच्या खोज्याला ।

कंसापरि मज स्वप्नें भासती शिवाजी ग्रासिल राज्याला ॥

चाल

जिजाबाईस जाहला पुत्र, तेजस्वी जैसा हिरा ।

शककर्ता होईल स्वतंत्र, आठविली भवानी गिरा ।

पराक्रमी चतुर जगमित्र, उभवील राजमंदिरा ।

कल्पनाशक्ति विचित्र, बाळपणीं भासली तर्‍हा ॥

चाल दुसरी

विजापुरीं शिवाजी पित्राज्ञा ऐकुन ।

दरबारीं जाय परि मुजरा न करीं वांकुन ।

राजरस्त्यावरती गोवध अवलोकुन ।

एक कसाई मारला ठार भाला भोकुन ।

म्लेंच्छासी वर्तन सदा ठेवी वांकुन ।

राजनीती राक्षसी अधर्मता देखुन ।

चित्तांत म्हणे ही सत्ता द्यावी फेंकुन ॥

मोडते

स्वातंत्र्याची ज्योत प्रदीप्त झळाळली अंतःकरणा ।

स्वराज्य मी स्थापीन सांगतो साक्ष ठेवुनी आई तव चरणा ॥१॥

चौक २

बाजी तानाजी तिसरा येसाजी परम मित्र अनुसंगाला ।

जशी रामाची वान्नरसेना सहाय्य झाली प्रसंगाला ॥

प्रथम तोरणा किल्ला घेउनी ब्रीद बांधिले चंगाला ।

दहा सहस्त्र मावळ्यासहित पूजितसे भूलिंगाला ॥

कल्याणाचा लुटुनी सुभेदार काम आणिलें रंगाला ।

चाळीस किल्ले शीघ्र जिंकिले वायु न भिडतां अंगाला ॥

चाल

शिव प्रताप ऐकुनी ऐसा, दरबार आले झांजिला ।

कपटाचा घातला फासा, केली अटक राव शहाजीला ।

परि गळां न लागे मासा, त्याणें, उलट डाव योजिला ।

दिल्लीपति शहाजान बादशाह, अति नम्रपणें आर्जीला ॥

चाल दुसरी

गेला हुकूम दिल्लीहुनी विजापुरीं सत्वर ।

द्या सोडून शहाजीला शिव आमुचा नोकर ।

अशी तंबी मिळतां कार्य झालें प्रियकर ।

वडिलांची मुक्तता झाली मग लौकर ।

सद्‌गुरु रामदासाची कृपा ज्यावर ।

काळ लंडी करिल काय साह्य होता ईश्वर ।

जिथें लाथ मारी तिथें पाणी काढी भरपूर ॥

मोडते

भरभराट चहुंकडुन वाढली हात जोडून पुढे अनपूर्णा ।

सरस्वती लक्ष्मी एके ठाई जमुन फुंकती जयकर्णा ॥२॥

चौक ३

यवनभूपती करी प्रतिज्ञा चोर बंडखोर शिवाजी ।

जिवंत धरुनी आणिल त्यास मी देईन जहागिरी नवी ताजी ॥

सकळ सरदार झाले भयाभित अफझुल त्यामध्यें रणगाजी ॥

उभा राहुनी म्हणे हजरत हुकूम द्या तरी मला आजी ॥

डोंगरांतिल उंदिर बेटा पकडून आणतों पहा सहजीं ।

खावंदाच्या चरणीं बांधिन पूर्ण प्रतिज्ञा ही माझी ॥

चाल

एका हत्तीचें बळ त्याला, चालला प्रतिज्ञा करुन ।

बारा हजार स्वार हातीं भाला, वीस हजार पायदळ धरुन ।

अग्नीबाण उंट जेजाला, तोफखाना अफाट भरुन ।

तीन वर्षें पुरेल तबेला, अशी पूर्ण तयारी करुन ॥

चाल दुसरी

आला दीन गर्जत प्रथम तुळजापुरीं ।

केली चूर्ण भवानी जात्यांत घालून पुरी ।

मग आला पंढरीस भिमा नदीच्या तीरीं ।

बडव्यांनीं लपविली विठ्ठल मूर्ती खरी ।

गांव लुटून पुण्याकडे वळला मग लौकरी ।

बाई जवळ तळ देऊनी विचार करी ॥

मोडते

प्रातापगडावरी होते शिवाजी विचार करित अंतःकरणा ।

प्रचंड फौज घेऊन आला खान बहादूर नव तरणा ॥३॥

चौक ४

काय करावें कसें करावें विचार करी शिव मनाप्रती ।

स्वप्नीं येउनी दृष्टांत दिधला भवानीनें त्या शिघ्रगती ॥

भिऊ नको रे मुला खानाचा मृत्यू आहे पहा तुझ्या हातीं ।

पाठिराखी मी आहे तुजला विजय पावसी रणक्षितीं ॥

आरंभुनी मग शिवप्रभूनें कपट युक्तिची राजनीती ।

पत्र रवाना अफझुलखाना नम्रपणा दर्शवी अती ॥

चाल

बादशहाचा मी अपराधी, तुम्ही प्रतापी रण बहाद्दर ।

युद्धाची गोष्ट नव्हे साधी, तुम्ही कृपा करा मजवर ।

द्या अभय वचन मज आधीं, मी पिढीजात नोकर ।

मी नव्हे तुमचा वादी, तुम्ही पित्यासमान रणशूर ॥

चाल दुसरी

असा निरोप ऐकुनी खान हर्षला पुरा ।

मग कपट बेत ठरवूनी निज अंतरा ।

कळविले मनोगत कृष्णाजी भास्करा ।

म्हणे जाउनी तुम्ही शिव बोधावा पुरा ।

मज विषयीं किलमिष नको ठेवूं चातुरा ।

दरबारीं वजन मीं खर्चुनी नाना तर्‍हा ।

तुज राज्य देवविन करुनी शिफारस जरा ।

देउनी थाप मग नेऊं विजापुरा ॥

मोडते

कसें करुनी तुम्ही आणावा भेटिला ही वस्त्रें प्रावर्णा ।

इकडे नसेल आम्ही येऊं तिकडे आठवण ठेवा हो स्मरणा ॥४॥

चौक ५

वकिल येउनी कचेरी होउनी बेत खानाचा कळवियला ।

धन्य तुमची अक्क्लहुषारी राग आमुचा पळवियला ॥

मग शिवरायें रात्रीं एकांतीं वकिल युक्तिनें वळवियला ।

घात खानाचा बेत उभयतां आत्महितास्तव जुळवियला ॥

पंत गोपिनाथ वकिल आपुला खानाकडे पळवियला ।

बहु विनयानें जाऊनी त्यानें खान बहादुर आळवियला ॥

चाल

भेट घ्यावी गडाच्या खालीं, उभयतांत ठरलें असे ।

शिवाजीनें तयारी केली, त्यांत कमतरता मुळीं नसे ।

मंडप सिद्धता झाली, गाद्या गिरद्या लोड तिवासें ।

खानासाठीं मुक्काम स्थळीं, तंबु दिले शोभतील तसे ॥

चाल दुसरी

घेऊनी फौज तो यवन गडाखालीं आला ।

वर कृष्णाजी भास्कर पाठवून दिला ।

आम्ही आलों संकेतापरी यावें भेटिला ।

शिवाजीनें तयारी केली शकुन गांठिला ।

वाम हातीं वाघनख काचा कमरपट्टीला ।

सव्य हातीं बिचवा अस्तनींत लपविला ॥

मोडते

गुप्त झाडीमध्यें फौज ठेवुनि वंदुनि मातुश्रीचरणा ।

गडाखालीं उतरले महाराज कदम कदम वाजे कर्णा ॥५॥

चौक ६

दीड सहस्त्र खानानें शिपाई जवळचि ठेउनियां मागें ।

हुजर्‍या आणि एक पंच हत्यारी आपण वकील ऐसे चौघे ॥

अशी खानाची होती तयारी शिवा जीनें पन्नास अवघे ।

टप्यावरी ठेवुनि शिपाई आपण तानाजी आले दोघे ॥

मंडपाजवळ येऊनि महाराज भ्यालासारखी करी सोंगे ।

वकीलानें खानाचा हत्यारी दूर धाडिला अति वेगें ॥

चाल

आसपास मराठे लोक, बैसले होते बहु लपून ।

शिवाजीचा त्यावेळीं झोक, हळु हळु पायपडे जपून ।

खानाकडे लावुनी रोख, पाहे कपट क्रियेमध्यें निपुण

मनीं आठवुनि बंधु शोक, सूड घ्याया गेला हाप हापून ॥

चाल दुसरी

तानाजी सहित मंडपांत आले सत्वर ।

ताजीम घ्यावया उठला खान लौकर ।

दोघांच्यामध्यें तो कृष्णाजी भास्कर ।

दिली ओळख करुनी उभयतांची रितसर ।

राजनीतिप्रमाणें सरळ झाले इथवर ।

खान झाला उताविळ त्यावेळीं खरोखर ।

कडकडून भेटाया उभारिले द्वय कर ॥

मोडते

दोन पावलें जाउनि धरितां शिवाजीस म्हणे क्यौं डरना ।

काखेंत मुंडी दाबुनी धरुनी कटयार काढी जीव हरणा ॥६॥

भाग ७

भेट होतां खानानें कटयार शिवाजीचे कुशी वाजविली ।

कपट जाणुनी महाराजांनी वाघनखानें गाजविली ॥

काखेंतुनी मानगुटी काढुनी समशेर आपली साजविली ।

खानाची तरवार हिरावुनी तोडातोडी बहु माजविली ॥

येसाजी तानाजी धांवले पुनरपि तलवार पाजविली ।

शीर खानाचें तोडुन नेले नौबद विजयी वाजविली ॥

चाल

किल्ल्यावरी फुंकिले शिंग, पूर्वींच्या संकेतापरी ।

तोफा सुटल्या साधला रंग, करा कत्तल तुम्ही लौकरी ।

नेताजी बांधुनी चंग, गेला चालूनी सैन्यावरी ।

मोरोपंत जैसे बजरंग, जावळीचें सैन्य संहरी ॥

चाल दुसरी

झाली दाणादाण शत्रूचे एकंदर हंसे ।

शिवाजीस लूट लाभली हत्ती पाउणशे ।

आठ हजार घोडे उंट हजार बाराशे ।

बारा लक्ष रोकड रुपये चांदीचे ठसे ।

सोनें मोतें जवाहिर दोन लक्षाचें तसें ।

तीस हजार बैल, होन मोहोरास गणती नसे ।

तोफखाना एकंदर आणखी शूर माणसें ।

आली चालुन लक्ष्मी कृपा केली जगदीशें ।

विजापुरीं बातमी कळतां झालें पहा कसें ।

घरोघरीं शंखध्वनी शहर भयाण दिसे ।

तीन दिवस राज नौबद बंद केली असे ॥

मोडते

अल्ली आदिलशहा रडे धाय धाय तखदीर अल्ला क्या करना ।

रामचंद्र म्हणे पुढिल प्रसंगीं शिद्दी जोहार येईल रणा ॥७॥