नवा शिपाई
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेचि पतित लीं ज आंखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मला न सूख;
कूपांतिल मी नच मंडूक;
मळयास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
जिकडे जावें तिकडे माझीं भांवडें आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा---पायांखालीं तृणावृता भू दिसते;
कोठेंही जा---डोईवरतें दिसतें नीलांबर तें !
सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसतो गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;
तीं माझीं, मी त्यांचा,---एकच ओघ अम्हांतुनि वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !
पूजितसें मी कवणाला ?--- तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;
‘ मी ’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनि तो, निजशिरीं ओढिती अनर्थ भलते देख !
लहान---मोठें मज न कळे,
साधु---अधम हें द्वयहि गळे,
दूर---जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठे---साधु---जवळ, त्या सकलीं मी भरुनी राहें !
कोण मला वठणीला आणूं शकतों तें मी पाहें !
हलवा करितां तिळावर जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केन्द्राभंवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक,
परि अन्यां बोंचाया घरितो कांटे कीं प्रत्येंक !
अशी स्थिती ही असे जनीं !
कलह कसा जाइल मिटुनी ?
चिंता वागे हीच मनीं.
शान्तीचें साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे !