प्रियेचें ध्यान
" उद्यां प्रातःकालीं इथूनि मजला जाण निघणें
पुण्याला जाण्याला, स्वजन सगळा सोडुनि गडे;
उद्यां एव्हां माझ्याविण वद कसें होइल तुला ?--
दुणे तूझेवीणें श्रम सखि ! पथीं होतिल मला ! ”
असें मोठया कष्टें तुजजवळिं मी पत्नि ! वदतां,
गळां तूझे माझे, मम तव, सखे हस्त असतां,
विशालाक्षीं तूझे जल भरुनियां मी न दिसुनी,
वियोगाला भावी, समजलिस तूं भूत चुकुनी !
निशीथीं या आतां असशिल मला ध्याउनि जसें
मदाभासा स्वांगीं विरहविकलीं वेष्टित, तसें --
मला शोकानें तूं समजुनि मदाभास दिधलें ,
स्मरूनी तें आलिंगन, ह्रदय हें फारचि उले !
गमे तूंतें ध्याया मज न दुसरी आकृति बरी,
रतीचे वेळींच्या शिरति ह्रदयीं अन्यहि जरी;
म्हणूनीयां वाटे मज अनुभवें याच सखये --
सुखाहूनी दुःखा स्मरति बहुचा बद्ध हृदयें !
अहा ! अंकीं माझे तुज बघतसें मी बसलिस,
शिरा स्कंधीं माझे लववुनि गडे तूं पडलिस,
वियोगाचे तकें रडत असतां, अश्रु सुदती !
तुझे, माझ्या वक्षीं टपटप बधें मी उतरती !
टिपापा मी त्यांतें, पदर सरसावीं, परि गडे,
भिजीनी तो तूझें गयन सुकणें, हें नच घडे ;--
असें कां व्हावें हें न कळुनि रडें मी खळखळां,
पुसाया तें लागे अहह ! नयनां तोच मजला !