Get it on Google Play
Download on the App Store

फूलपांखरू

जेथें हिरवळ फार विलसते,
लताद्रुमांची शोभा दिसते,
तेथें फुलपांखरूं पहा हे----
सुंदर बागडतें !

कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,
गन्धयुक्त अवकाशामधुनी,
पुष्पपरागा सेनित हिंडे ---
मोदभरें करुनी !

तरल कल्पना जशी कवीची,
सुन्दर विषयांवरुनी साची
भ्रमण करी, गति तशीच वाटे---
फुलपांखराची !

वा मुग्धेची जैशी वृत्ति
पतिसहवासस्वप्नावरती
विचरे फुलपांखराची तशी---
हालचालही ती !

निर्वेधपणें इकडे तिकडे
वनश्रींतुनी अहा ! बागडे;
त्याचा हेवा ह्रदयीं उपजुनि
मन होई वेडें !

तिमिरीं आम्हीं नित्य रखडणें,
विवंचनांतचि जिणें कंठणे,
पुष्पपतंगस्थिति ही कोठुनि---
आम्हांला मिळणें !

असे यास का चिन्ता कांहीं ?
यास ’ उद्यां ’ चा विचार नाहीं,
अकालींच जो आम्हां न्याया---
मृत्युमुखीं पाही !

बहु सौख्याची कुसुमित सृष्टि,
तींत वसे हें, न कधीं कष्टी,
ग्रीष्माचे खर रूप विलोकी---
नच याची दृष्टि !

‘ सर्व विनाशी असतो, प्राणी ’
ही मज खोटी वाटे वाणी;
फूलपांखरूं---मरण पाहिलें---
आहे कां कोणी ?

( वसंततिलका )

जें रम्य तें बधूनियां मज वेड लागे
गाणें मनांत मग होय सवेंचि जागें;
गातों म्हणून कवनीं फुलपांखरातें,
व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनातें.