Get it on Google Play
Download on the App Store

मर्डर वेपन प्रकरण 14

 

प्रकरण १४
जेवायच्या सुट्टी नंतर कोर्ट सुरु व्हायच्या आधीच लोकांनी कोर्टात गर्दी केली.वरिष्ठ सरकारी वकील हेरंब खांडेकर अचानक कोर्टात हजर झाले. खांडेकर हे बलदंड शरीराचे आणि रुंद खांदे असलेले व्यक्तिमत्व होते. एखाद्या पिंपासारखे दिसायचे.आवाजही शरीराला साजेसा होता.
“ मी तुला म्हणालो होतो ना पाणिनी, त्यांच्याकडे काहीतरी धक्कादायक बातमी आहे आणि त्यासाठीच खांडेकर आलेत. ” कनक ओजस म्हणाला. पाणिनीने काही न बोलता फक्त मान डोलावली.पोलीस रतीला घेऊन कोर्टात आले.पाणिनीने पटकन संधी साधून तिला विचारलं, “ सोमवारी सकाळी तू तुझ्या नवऱ्याच्या घरातून  नेमकी कधी बाहेर पडलीस?”
“ सकाळी सहाच्या सुमाराला असेल.” रती म्हणाली.
“ आणि नंतर दिवसभर कुठे होतीस तू?”  पाणिनीने विचारलं
“ मी ते सांगू नाही शकत तुम्हाला पटवर्धन. मला माहित्ये की अशिलाने वाकीलांपासून काही दडवून ठेवू नये तरीही.....”
“ मी एकच प्रश्न विचारतो तुला, तू अंगिरस खासनीस बरोबर होतीस? ”
तिची नजर बदलली. “ मी...मी..”
“ सर्वांनी उभे रहा, न्यायाधीश येत आहेत.” पट्टेवाला ओरडला आणि न्या.फडणीस कोर्टात आले.
“ अरे, खांडेकर स्वत: हजर आहेत अत्ता ! तुम्ही या खटल्यात सहभागी होताय वकील म्हणून की दुसरे काही काम आहे?” खुर्चीत बसतांना फडणीसांनी विचारलं.
“वकील म्हणून हजर झालोय मी.” खांडेकर उत्तरले.
“ ठीक आहे रेकॉर्डवर तसे येउ दे. चंद्रचूड, पुढे चालू करा काम.”न्या.फडणीस म्हणाले.
चंद्रचूड,खांडेकरांच्या कानात काहीतरी कुजबुजला.नंतर न्यायाधीशांना म्हणाला,
“ युअर ऑनर, खर तर मी खासनीस ची साक्ष संपवल्याचं जाहीर केलं होतं पण मला काही महत्वाचे प्रश्न पुन्हा विचारायचेत.परवानगी असावी. ”
“ ठीक आहे. बोलवा खासनीसना.” फडणीस म्हणाले.
 कसायाच्या तावडीतून सुटलेला बकरा पुन्हा पकडल्यावर कसं होईल तसा त्याचा चेहेरा झाला.नाराजीनेच तो पिंजऱ्यात आला. त्याला प्रश्न विचारायला खांडेकर उभे राहिले.
“या महिन्याच्या  पाच तारखेला,मंगळवारी  सकाळी तू आणि आरोपीने एकत्र नाश्ता केलात? ”
“ हो.”
“ आणि सोमवारी चार तारखेला सुद्धा ?”—खांडेकर.
“ हो.”
“ तुम्ही तुमच्या रायबागी एन्टरप्रायझेस च्या ऑफिसात सोमवारी चार तारखेला संपूर्ण दिवस होतात?”—खांडेकर
“ नाही साहेब.”खासनीस म्हणाला.
“ मग कुठे होता?”
“ पूर्णपणे गैरलागू प्रश्न आहे.हरकत आहे माझी.”  पाणिनी म्हणाला.
“ मान्य.” –न्या.फडणीस
“ ठीक आहे,” खांडेकर म्हणाले,  “ तू आरोपीच्या बरोबर होतास सोमवारी?”
 खासनीस ने अस्वस्थपणे रती कडे पाहिलं,  “ हो. पण पूर्ण दिवस नाही, काही काळ.”
“ आरोपी ला कुंभावे गावाजवळ एक जागा खरेदी करायची होती ती तुला दाखवण्यासाठी आणि तुझं मत घेण्यासाठी म्हणून  तीन तारखेच्या रविवारी तू आरोपी रती बरोबर तिकडे गेला होतास की नाही? ” खांडेकर कडाडले.
“ हो.” खासनीस नाईलाजाने म्हणाला.
“ दुसऱ्या दिवशी चार तारखेला सोमवारी सकाळीच लवकर  तुला आरोपीने नाश्त्याला हॉटेलात यायला  सांगितलं की नाही आणि तिथे तुला सांगितलं की नाही की जागा खरेदीचा व्यवहार पक्का ठरलाय आणि ती रोख रक्कम देऊ शकते म्हणून?”-खांडेकर.
“ हो.”
“ आणि तिने तुला सांगितलं की नाही की, रविवार आणि सोमवार मधे असं काही घडलंय की त्यामुळे तिची आर्थिक स्थिती एकदम सुधारल्ये म्हणून? तिचा नवरा पद्मराग रायबागी मरण पावलाय आणि त्यामुळे तिला मोठी रक्कम मिळणार आहे म्हणून?”—खांडेकर.
“ नाही.तिने सांगितलं की तिची आणि तिच्या नवऱ्याची तडजोड झाल्ये त्यातून तिला जागा खरेदी करता येईल अशी रक्कम मिळणार आहे.”-खासनीस
“  आणि मंगळवारी तिने तुला सकाळी सहा वाजताच  लौकर नाश्त्याला हॉटेलात यायला सांगितलं,आणि तुला म्हणाली की  पाणिनी पटवर्धन यांच्या ऑफिसातून रिव्हॉल्व्हर घेऊन ये म्हणून?”—खांडेकर
“ नाही. ”
“ एवढ्या लौकर हॉटेलात नाश्ता करायला कसे गेलात? आणि एवढ्या सकाळी कोणतं हॉटेल उघड असतं?तिला कसं माहिती होतं हे?” खांडेकरांनी सरबत्ती केली.
“ मी रोजच सकाळी लौकर उठतो.किमया हॉटेलात रोज नाश्ता करायची सवय आहे मला.ते हॉटेल लौकर उघडतं. तिने मला लौकर भेटायला सांगितलं, तेव्हा मीच सुचवलं की तिथे भेटू.”-खासनीस म्हणाला.
“ माझे प्रश्न झाले.” खांडेकर म्हणाले.
“ माझे उलट तपासणीत काही प्रश्न नाहीत.”  पाणिनी म्हणाला.
“ हृषिकेश भोपटकर , माझा पुढचा साक्षीदार आहे.” –खांडेकर म्हणाले.
अॅडव्होकेट भोपटकर आला आणि शपथ वगैरे घेतल्यावर आपण वकील असल्याचं आणि रायबागी चा कायदेशीर सल्लागार,वकील असल्याचं सांगितलं.
“ रायबागीचं विल तू तयार केलं होतंस?”-खांडेकरांनी सुरुवात केली.
“ हो.”
“ त्याची अंमल बजावणी पण केली गेली?”
“ हो.”
“ त्याच्यासाठी दुसरं विल पण केलंस?”
“ हो.”
“ ते सुद्धा अमलात आणलं गेलं?”
“ नाही.” भोपटकर म्हणाला.
“ मी तुला एका विल ची कॉपी दाखवतो, त्यावर विल करणारा म्हणून रायाबागीची सही आहे आणि साक्षीदार म्हणून तुझी आणि  सूज्ञा पालकर  हिची सही आहे. या विल नुसार सर्व संपत्ती मैथिली च्या नावाने केली आहे, याच विल ला तू अंमलबजावणी झालेलं विल म्हणतो आहेस का सांग.”
“ हो.बरोबर ”
“ दुसऱ्या विल चं काय?”
“ दुसरं विल करायचं रायबागीच्या डोक्यात होतं, त्या द्वारे, त्याला सर्व संपत्ती रती च्या नावाने करायची होती.पण त्या दोघांत खूप मतभेद झाले आणि त्या विल वर सह्या झाल्याच नाहीत.”
“ पुढे काय झालं?”
“ मी विल चे दोन तीन मसुदे बनवले होते. रती ला नक्की किती द्यायचं हे त्याचं पक्क होतं नव्हतं.त्याला काही मिळकत त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा द्यायची होती.”
“ मला हे पण सांगायचं आहे की त्या दोघांचे जमत नाहीसे झाले तेव्हा त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचं ठरवलं.त्यासाठी वेगळं राहावं लागतं म्हणून विलासपूरला जाऊन तिने स्वतंत्र घर करून राहावं. ”
“ तरी सुद्धा घटस्फोटाच्या बदल्यात तिला काहीतरी पोटगी द्यावीच लागणार होती त्या बाबतीत त्याने असा प्रस्ताव ठेवला की पुढील दहा वर्षं तो तिला ठराविक रक्कम देईल आणि या शिवाय त्याच्या विल मधे तिला एक रकमी काहीतरी मोठी रक्कम देण्यात येईल. आता या रकमा तडजोडीने ठरवण्यात येणार असल्याने रायबागीने मला सांगितलं की विल चा अंतिम मसुदा करायचं जरा लांबव.”  भोपटकरने मोठ निवेदन केलं.
“ खुनाच्या वेळी ही अत्ता सांगितलेली अद्ययावत परिस्थिती होती? ” –खांडेकर
“ हो.”
“ ही, तू दाखवलीस ती विल ची कॉपी आहे.मूळ विल कुठे आहे?”—खांडेकर
“  कोर्टाच्या दाखल्यासाठी कोर्टात सादर केलंय.”-भोपटकर
“ ही प्रत मला आमच्या सरकार पक्षातर्फे पुरावा म्हणून सादर करून घ्यायची आहे.” –खांडेकर
“ तुमची हरकत आहे यासाठी पटवर्धन?” - विचारलं.
“ हरकत आहे की नाही मला अत्ता नाही सांगता येणार,त्यासाठी या विषयापुरती मला भोपटकरांची उलट तपासणी घ्यावी लागेल.”  पाणिनीने विचारलं
“ ठीक आहे,घ्या. ” न्या.फडणीस म्हणाले.
“सूज्ञा पालकर तुझी सेक्रेटरी आहे? ” पाणिनी ने भोपटकरला विचारलं.
“ होय.”
“ आता असेल ना कोर्टात ती?”
“ नाही आली ती.”-भोपटकर
“ आश्चर्य आहे! तुम्ही केलेल्या विल मधे ती एक साक्षीदार आहे,आणि ती इथे हजर नाही? ”  पाणिनीने विचारलं
“ तिला समन्स दिला गेला नाहीये.बोलावलंच गेलं नाहीये तिला.” –भोपटकर
“ तसं असेल तर माझ्या तर्फे तिला सुद्धा उलटतपासणीला हजर केलं जावं.”- पाणिनी म्हणाला.
“ नक्कीच.” खांडेकर म्हणाले.  “ मी तुम्हाला या विल च्या खरेपणा बद्दल खात्री देतो ”
“हा खटला सुरु होण्यापूर्वीच कोर्टाने स्पष्ट केलं होतं, की हा खटला खुनाचा आहे, विल मधल्या संपत्तीचे वाटप या विषयाची चर्चा इथे नको. विल च्या सत्यते बाबत मी खात्री पटवली आहे. ” खांडेकर म्हणाले.
“ मी या  विल ची पूर्णपणे शहानिशा करू इच्छितो. हे फार वेगळ्याच प्रकारे केलेलं डॉक्युमेंट आहे,त्यात अशा पत्नीच्या नावाने सर्व संपत्ती केली गेली आहे जिने आपल्या नवऱ्याला आपण घटस्फोट घेतला आहे असं फक्त भासवलं.  ”  पाणिनी म्हणाला.
“ या गोष्टी पुराव्यात आलेल्या नाहीत.विल वर सह्या करण्यात आल्या तेव्हा घटस्फोटाची चर्चा सुद्धा झाली नव्हती.” –खांडेकर म्हणाले.
“मी जे बोललो ते मी रेकॉर्ड वर आणतो नंतरच हे विल पुरावा म्हणून घायचे का या बद्दल माझा निर्णय सांगेन.”  पाणिनी म्हणाला.
“ ही एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.हे विल म्हणजे विल करणाऱ्या व्यक्तीने त्याचे आरोपीशी लग्न होण्यापूर्वी केलेलं हे विल आहे ज्यात त्याने आपली संपत्ती आपल्या पूर्व पत्नीच्या नावे केली आहे. खांडेकर,या गोष्टीचे काय आहे तुमच्याकडे स्पष्टीकरण?” न्या. फडणीसांनी विचारलं.
“ सांगतो मी.” खांडेकर म्हणाले.  “ त्यावेळी तिला घटस्फोट दिला गेला नव्हता.खर तर त्यावेळीच नाही तर तिने आज अखेर सुद्धा रायबागीला घटस्फोट दिलेला नाही, पण मला त्या वादात अत्ता पडायचं नाहीये.”
“ हे दस्त जर तुम्हाला तुमचा पुरावा म्हणून दाखल करायचं असेल तर बचावाच्या वकिलांना मी परवानगी देतो या साक्षीदाराची उलटतपासणी घ्यायला, या विषयापुरती. ” न्या.फडणीस म्हणाले. “ कोर्ट अत्ता तीस मिनिटांची सुट्टी जाहीर करत आहे. तेवढ्या वेळात तुमच्या सेक्रेटरीला , सूज्ञा पालकर ला समन्स  पाठवता येईल.”
“ तिला अत्ता येणे शक्य नाही होणार.तिला अत्ता ऑफिसात खूप महत्वाची कामे आहेत. ” भोपटकर म्हणाला.
“ भोपटकर, तुमची साक्ष झाली आहे.तुम्ही ऑफिसात जाऊन बसा आणि पालकर मॅडम ना पाठवा.” न्यायाधीश म्हणाले.
नाईलाज झाल्याप्रमाणे भोपटकर म्हणाला, “ पण तिला विचारले जाणारे प्रश्न फक्त फक्त विल च्या सह्या बद्दल असावेत , त्या वेळच्या आसपास असणाऱ्या परिस्थिती बद्दल नकोत.”
“ ते आपण त्यावेळी ठरवू. तिला समन्स काढायची व्यवस्था करा.” फडणीस कोर्टातल्या अधिकाऱ्यांना म्हणाले.  नंतर पुन्हा भोपटकर ला म्हणाले, “  पुढच्या अर्ध्या तासात ती इथे आली पाहिजे नाही आली तर ती येई पर्यंत कोर्ट चालू होणार नाही आणि आज संध्याकाळी कोर्ट संपे पर्यंत नाही आली तर पाणिनी पटवर्धन यांना हवी तशी साक्ष तिने दिली आहे असे गृहीत धरण्यात येईल.आणि त्यानुसार पटवर्धन यांच्या मता नुसार पुरावा दखल करून घ्यायचा की आणि हे कोर्ट ठरवेल. ” फडणीसांनी ठणकावलं आणि उठून आत गेले.
भोपटकर लगेच खांडेकरांच्या कानाला लागला.पाणिनी पटवर्धन सौंम्याकडे वळला.
“ माझ्या डोक्यात एक संशय आहे.तू आपल्या गतीला इथे कोर्टात यायला सांग लगेच.बरोबर आपल्या एका टायपिस्टला बरोबर घेऊन यायला सांग.आल्यावर त्या दोघींना न्यायाधीशांच्या समोरच्या बाकावर बसायला सांग त्यांना.”  पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, तुझी अशील रती सोमवारी संध्याकाळी विमानाने विलासपूरला का गेली असावी?”
“ नाही माहिती मला कनक.माझा अंदाज आहे की तिला कुंभावे गावात जो प्लॉट घ्याचा होता,त्याचे डील पूर्ण करायला ती कुंभावे ला जाऊन आल्यानंतरच ती विलासपूरला जायला निघाली असावी.त्यासाठीच तिने आपल्या पर्स मधे मोठी रक्कम ठेवली असावी. पण तू का विचारलंस असं कनक? ”  पाणिनी म्हणाला.
“ याचं कारण असं आहे की सरकार पक्षाने एक असा साक्षीदार मिळवलाय की ज्याने रती ला सोमवारी  विमानाने विलासपूरला जाताना पाहिलंय. म्हणजे ती विलासपूर एअर पोर्ट ला उतरली, तिथून टॅक्सी ने विलासपूर ला गेली. तिथे तासभर होती नंतर पुन्हा विमानाने चैत्रापूरला आली. हे सर्व बघणारा एक साक्षीदार खांडेकरांना मिळालाय.”-कनक.
“ तो तिला खात्रीलायक ओळखेल?” पाणिनीने विचारलं
“ त्याचं म्हणणं आहे,तिने डोळ्याला गॉगल लावला होता, गडद काचेचा, पण तरीही तो ओळखू शकेल. त्याला असंही वाटतंय की ती एकटी नसावी, तिच्या सोबत कोणीतरी  पुरुष होता पण ते नक्की नाही.”
“ अरे, मी आणि सौंम्या पण विलासपूरला जाऊन आलो.”
“ तिच्या आणि तुमच्या विमानात फक्त अर्धा तासचं अंतर होतं. ती आधी गेली नंतर तू. म्हणजे एवढीच आधी की तू तिथे पोचण्यापूर्वी  तिला घरी जाऊन फ्रेश व्हायला, चहा घ्यायला, पुरेसा अवधी मिळाला असावा.” कनक म्हणाला.
“ माझ्या डोक्यात हीच कल्पना होती की कोणीतरी रतीच्या घरी गेलं असावं, विलासपूरला, तिच्या घरातून रिव्हॉल्व्हर घेतलं असावं,आणि ते मर्डर वेपन च्या ठिकाणी  बदलून ठेवलं असावं.”  पाणिनी म्हणाला.
“ थोड्याफार फरकाने सरकार पक्षाचं म्हणणं तेच आहे, फक्त ते  कोणीतरी म्हणजे रती होती असं खांडेकरांना वाटतंय.  म्हणजे पाणिनी, त्यांचा तर्क आहे की रतीने चैत्रापूर मधे तिच्या नवऱ्याला त्याच्याच रिव्हॉल्व्हर ने ठार केलं, नंतर तिला विलासपूरला जायचं होतं, आपली रिव्हॉल्व्हर घेऊन  यायचं  होतं आणि आपल्या पर्स मधे असलेल्या  मर्डर  वेपन च्या जागी आपली रिव्हॉल्व्हर ठेऊन मर्डर वेपन कुणाला सापडणार नाही अशा पद्धतीने  टाकून द्यायचं होतं.”
“ पोलिसांचे म्हणणे आहे की हे सर्व करतांना तिला एवढी घाई झाली की ती तुझ्या ऑफिसात तिची हँड बॅग विसरून गेली आणि  त्यातच जे रिव्हॉल्व्हर होतं,ते तुला मिळालं ते रिव्हॉल्व्हर हेच मर्डर वेपन होतं.आता हे रिव्हॉल्व्हर परत मिळवून ते बदलण्यासाठी तिला ते तुझ्या ऑफिसातून काहीही करून काढून स्वत:च्या ताब्यात घ्यायचं होतं.त्यासाठी तिने अंगिरस खासनीस ची नियुक्ती केली. ”
“ ओहो.”  पाणिनी म्हणाला.  “ अजून काय प्रगती तुझ्या तपासात?”
“ उत्क्रांत उदगीकर ची मुलगी  हिमांगी  आणि कणाद मिर्लेकर हे मित्र आहेत.साहजिकच सूज्ञा पालकर ला जेव्हा घटस्फोट घ्यायचा होता तेव्हा नवऱ्यापासून वेगळे राहण्यासाठी घर लागते तेव्हा  कणाद ने हिमांगीच्या वडिलांचे घर  सुचवलं.” कनक ओजस म्हणाला.
“ तर मग मैथिली पण तिथेच राहायला आली असल्याने तिची आणि अॅडव्होकेट भोपटकरची त्या वेळी ओळख झाली असणार.”
“ किंवा भोपटकर च्या सेक्रेटरीशी.” कनक म्हणाला.
“ रायबागीला जे वाटत होतं की मैथिलीने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, आणि त्या आधारावर त्याने रतीशी दुसरं लग्न केलं, जे बेकायदा ठरलं, या सर्व परिस्थितीला भोपटकर हाच जबाबदार होता.”  पाणिनी म्हणाला.
“ हिमांगी आणि मैथिलीची मैत्री !” कनक म्हणाला. “  हिमांगी जेव्हा जेव्हा येते तेव्हा सूज्ञा पालकर ला ती भेटते, त्या एकत्र कॉफी घेतात गप्पा मारतात मग ती जाते. तशीच ती खून झाला त्या सोमवारी  गाडी घेऊन चैत्रापूरला आली होती.  तिने ज्या पार्किग लॉट मधे गाडी लावली. आता हे पार्किंग आपलं ऑफिस आणि अॅडव्होकेट भोपटकर चं ऑफिस याच्या बरोबर मधेच आहे. आता या सर्वाचा खुनाशी संबंध असेलच असं नाही पण योगायोग आहे का? ” कनक ने शंका उपस्थित केली.
“ मला याचा विचार करू दे कनक, मग पुन्हा भेटू आपण.पण तू खूपच मोठी माहिती दिलीस मला.”
(प्रकरण १४ समाप्त.)