Get it on Google Play
Download on the App Store

मर्डर वेपन प्रकरण 9

 

प्रकरण ९
“ मी सरकारी वकील हेरंब खांडेकर. माझ्या बरोबर आहेत इन्स्पे. तारकर, आणि रती चे वकील पाणिनी पटवर्धन, आणि त्यांची सेक्रेटरी सौंम्या सोहोनी. मला ताबडतोब तुमचे सगळे कर्मचारी इथे हजर पाहिजेत. इथे काय घडलंय याची संपूर्ण माहिती मला हव्ये.मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ”  रायबागी च्या ऑफिसात आल्या आल्याच खांडेकरांनी जोरदार आवाजात हुकूम सोडला.त्यांच्या  जाडजूड देह यष्टीत आणि भरदार आवाजात अशी जादू होती की थोड्याच अवधीत त्यांनी सगळी सूत्र हातात घेतली.काही मिनिटातच सगळे कर्मचारी त्यांच्या भोवती गोळा झाले.
“ इथला प्रमुख कोण आहे त्याने पुढे या.”  त्यांनी हुकूम सोडला.
“ मी, मी आहे.” गर्दीतून एक आवाज आला.
“ पुढे या.” खांडेकर म्हणाले.  “ कोण तुम्ही?”
“ मी कणाद मिर्लेकर. ,मी पद्मराग रायबागी च्या हाताखालचा सर्वात वरिष्ठ अधिकारी होतो.जनरल मॅनेजर. ”
तो एक तिशीच्या घरातला गुबगुबित गाल ,घारे डोळे, पातळसर ओठ असलेला माणूस होता.खांडेकरांच्या शेजारी जाऊन तो उभा राहिला.
“ तुम्हाला पद्मराग बद्दल काय काय माहिती आहे?”
“ प्रत्येक गोष्ट माहिती आहे मला.” कणाद म्हणाला.
“ पद्मराग कडे रिव्हॉल्व्हर होतं?”-खांडेकर
“ त्याच्याकडे दोन रिव्हॉल्व्हर होती. अगदी सारखी दिसणारी.त्यातली एक त्याने घरी ठेवलं होतं.तो आणि त्याची पत्नी विभक्त झाल्यावर त्याने दुसरे रिव्हॉल्व्हर खरेदी केलं. एक त्याने स्वत:कडे ठेवलं आणि एक तिला दिलं.पण मला हे माहिती नाही की त्याने तिला दिलं ते पाहिलं खरेदी केलेलं दिलं की नावाने खरीदलेलं दिलं.” कणाद म्हणाला.
“ इथे अंगिरस  खासनीस आहे?”  खांडेकरांनी विचारलं.तो पुढे आला.
“ तुम्ही इथे काय पदावर आहात? ” खांडेकर म्हणाले.
“ तो डायरेक्ट माझ्या हाताखाली काम करतो.” कणाद म्हणाला.
“ तुला कितपत माहिती आहे रायबागी बद्दल?” खांडेकर म्हणाले.
“ बऱ्यापैकी आहे.अगदी कणाद एवढी नाही पण तरीही बरीच आहे.”   खासनीस म्हणाला.
“ रायबागी कडे दोन रिव्हॉल्व्हर होती हे माहित आहे?” –खांडेकर.
“ हो.”
“ रती बद्दल काय माहिती आहे?”
“ मला खूप माहिती आहे. जुन्या सगळ्याच स्टाफ ला तिच्या बद्दल  माहिती आहे.कारण पद्मराग शी लग्न होण्याआधी ती इथे त्याची सेक्रेटरी होती.”  खासनीस ने उत्तर दिलं.
“  तुझं काय म्हणणं आहे?” खांडेकरांनी कणाद ला विचारलं.
“ रती रायबागी ही रती कण्व होती तेव्हापासून मी ओळखतो तिला.ती एक सक्षम अशी सेक्रेटरी होती.पण संबंध म्हणाल तर, पद्मराग जे काम सांगायचे मला,ते पूर्ण करण्यासाठी मी तिची मदत घ्यायचो तेवढाच  माझा आणि तिचा संबंध येत असे. ”
“ तिने इथे सेक्रेटरी म्हणून काम चालू केलं तेव्हा पद्मराग चं लग्न झालं होतं?” खांडेकरांनी विचारलं.
“  मैथिली बरोबर ” कणाद म्हणाला. “ पुढे त्याची परिणीती घटस्फोटात झाली.”
खांडेकरांनी आता आपला मोर्चा  खासनीस कडे वळवला.
“  रती चा या घटस्फोटाशी संबंध होता?”
“  मैथिलीला वाटतं तसं.”  खासनीस म्हणाला.
“ आता मला कोणीतरी सांगा, की आज सकाळी सहा वाजता पाणिनी पटवर्धन यांच्या ऑफिसात कोण गेलं?” खांडेकरांनी विचारलं.
“ मी गेलो होतो.पाणिनी पटवर्धन यांच्या टेबलाच्या ड्रॉवर मधून रिव्हॉल्व्हर घेण्यासाठी.” अंगिरस  खासनीस म्हणाला.
“ का केलंस तू असं?”-खांडेकर.
“ कारण रतीला कशात तरी अडकवायचा प्रयत्न कोणीतरी करत होतं. मला ते होऊन द्यायचं नव्हतं ”
“ कशात तरी म्हणजे?” –खांडेकर.
“ खुनात. म्हणजे आता मला वाटतंय तसं.आधी अंदाज नव्हता नेमकं कशात ते.”  खासनीस म्हणाला.
“ त्याचा खून झाल्याचं कसं कळल तुला?”
“ आज महत्वाच्या अपॉइंटमेंट असूनही पद्मराग ऑफिसात आले नाहीत.बऱ्याच उशिरा पर्यंत.मी त्यांना सतत फोन लावत होतो तो ही लागत नव्हता.असं कधीच होतं नसे.ते कायम वेळेपूर्वी ऑफिसात येत असत.म्हणून मी त्यांच्या फ़्लॅट ची ऑफिसात ठेवलेली किल्ली घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. अडी अडचणीला उपयोगी पडावी म्हणून त्यांच्या घराची एक किल्ली त्यांच्या केबिन मधे की होल्डर ला ठेवलेली असायची.”
“ कुठे आहे त्यांची केबिन? ही? समोरची?” –खांडेकर
“ हो ”
“हे काय ! होल्डर ला किल्ली नाहीये. ” –खांडेकर
“ पोलीस घेऊन गेले आज माझ्याकडून,सकाळीच.”
“ रिव्हॉल्व्हर पाकिटात घालून पिशवीत ठेवल्यावर काय झालं नंतर?”
“ मला पटवर्धन पटवर्धन यांच्या ऑफिसात बोलावलं गेलं. स्वत: पटवर्धन यांचा फोन आला.मी गेलो, त्यांना भेटलो.त्यांनी माझ्यावर चीरीचा आरोप केला,मी मान्य केला.त्यांनी मला रिव्हॉल्व्हर हजर करायला सांगितलं.मी माझी सेक्रेटरी निवेदिता हिला फोन करून रिव्हॉल्व्हर कुठे आहे ते सांगितलं आणि तिने ते इथे आणून दिलं.”  खासनीस म्हणाला.
खांडेकरांनी जमलेल्या सगळ्यांकडे पाहिलं. “ तुमच्यापैकी निवेदिता कोण? ” –खांडेकर
“ मी.” निवेदिता पुढे येत म्हणाली.
“ काय केलंस तू  खासनीस चा फोन आल्यावर?” –खांडेकर
“ मी त्यांची तिजोरी उघडली, आत त्यांनी सांगितल्यानुसार एका पिशवी होती, मी ती उलटी केली आतून एक पाकीट खाली पडलं. त्या पाकिटाची एक बाजू धारदार ब्लेड ने कापली गेली होती. त्यामुळे त्यातून  एका टिश्यू पेपर मधे गुंडाळलेलं रिव्हॉल्व्हर खाली पडलं. ”
“ तू काय केलंस?” –खांडेकर.
“ मी ते उचललं, पुन्हा कागदात गुंडाळलं आणि पटवर्धन यांच्या ऑफिसात येऊन  खासनीस ना दिलं ”
“ आता मला हे हवंय की पाकीट कोणी कापले? बोला ! पटकन.” खांडेकर खेकसले.
सगळे शांत बसले.
“ हे बघा, पद्मराग रायबागी ला झोपलेल्या अवस्थेत गोळी घालून मारण्यात आलंय.कायद्याच्या भाषेत याला निर्घृण खून म्हणतात.फर्स्ट डिग्री मर्डर ! याला शिक्षा म्हणजे फाशी.”
पुन्हा सन्नाटा.
“ खुन्याला मदत करणारा, पुरावा दडवणारा,किंवा त्यात छेडछाड करणारा, पुरावा जाग्यावरून हलवणारा  सुद्धा गुन्हेगार असतो.ज्या या केस मधे  खासनीस आहे.त्याला मी जबाबदार धरणारच आहे.पण त्याच्याकडे असलेला पुराव्यात सुद्धा कोणीतरी छेडछाड केली आहे. मला त्याचं नाव हवंय आणि त्याने रिव्हॉल्व्हर बदललं आहे का हे ही हवंय.त्याने हे का केलं ते ही हवंय. ”-खांडेकर पुन्हा कडाडले.
लोक एकमेकांकडे बघायला लागले पण खांडेकरांना उत्तर मिळालंच नाही त्यांच्या प्रश्नाचं.
“ तुमच्यापैकी कोणालातरी माहिती नक्कीच आहे पण कदाचित अत्ता सांगायचे धैर्य नसेल त्याच्यात,तर मला किंवा तारकर ला फोन करून मला ती व्यक्ती सांगू शकते. तसं झालं नाही तर मी सगळ्यांनाच जबाबदार धरीन.” –खांडेकर म्हणाले.
दाराजवळ उभे असलेले काही कर्मचारी अचानक बाजूला सरकले.खांडेकरांनी तिकडे पाहिलं.एक जाडगेला आणि उर्मट दिसणारा  मनुष्य आत येत होता.
“ मी, हृषिकेश भोपटकर, अॅडव्होकेट खांडेकर. आपली भेट नाही झालेली यापूर्वी पण मी तुम्हाला कोर्टात बरेच वेळा बघितलंय ”
“ कोण आहात पण तुम्ही?” खांडेकर म्हणाले.
“ वकील आहे मी.पद्मराग च्या हयातीत त्याचा वकील होतो आणि आता त्याच्या विधवा पत्नीचा वकील आहे.” भोपटकर म्हणाला.
“ मला वाटलं पटवर्धन वकील आहेत तिचे.”-खांडेकर.
“ दोन विधवा पत्नी आहेत.पटवर्धन हे रती चे वकील आहेत आणि मी  मैथिली चा.” भोपटकर म्हणाला.
“ घटस्फोट झाला नव्हता का?” –खांडेकर
“ याचं उत्तर मिसेस रायबागी च देईल.” भोपटकर म्हणाला, आणि दारातून तिशीच्या घरातील एक स्त्री आत आली. भोपटकरने तिचा हात हातात घेतला आणि ओळख करून दिली,  “ ही  मैथिली रायबागी. आता ती मालक आहे पद्मराग च्या सगळ्या व्यवसायाची.”
“ तू घटस्फोट नाही घेतलास?” खांडेकरांनी विचारलं.
“ नाही.मी अर्ज केला पण शेवट पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही.”  मैथिली म्हणाली.
“ काय !! ”  खासनीस किंचाळला.  “ तू तर पद्मराग ला लिहिलं होतंस की सर्व काही जुळवलं आहे....”
“ नक्कीच लिहिलं मी पत्र.ती हरामखोर रती माझ्या नवऱ्याची आर्थिक पिळवणूक करत होती ना! मग मी ठरवलं, तिच्याशी जशास तसं वागायचं.” छद्मीपणे  मैथिली म्हणाली.
“ तुझा नवरा तिच्याशी लग्न करणार होता हे तुला लक्षात आलं होतं? ” –खांडेकर
“ अर्थातच.म्हणून तर त्याने मला केरशी ला हाकलून दिलं आणि घटस्फोट घ्यायला मागे लागला.”  मैथिली म्हणाली.
“ तू त्यानुसार अर्ज केलास?”
“ हो.”
“ आणि तू तुझ्या नवऱ्याला कळवलंस की तुला घटस्फोट मिळालाय म्हणून?” खांडेकर
“ नाही.मी एवढंच कळवलं की सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालंय.” – मैथिली
“ खोटारडी आहे ही ! ” अंगिरस  खासनीस ओरडला.  “ हिने घटस्फोटाच्या निकालाची प्रत रायबागी ला पाठवली होती.”
“ ती काही अधिकृत प्रत नव्हती.” – मैथिली  खांडेकरांना म्हणाली. “ तुम्ही रेकोर्ड तपासू शकता.”
“ मी सांगतो, ती अधिकृत ऑर्डर होती कोर्टाची. ”  खासनीस म्हणाला.
“ हे बघ तुझी आणि रती ची काय थेरं चालायची मला माहित्ये.तिची सहानुभूती मिळवायची आणि रायबागी च्या  धंद्यावर डोळा ठेवायचा तुझा डाव होता.पण आता मी आल्ये.त्याची विधवा पत्नी म्हणून मला सर्व हक्क मिळाले आहेत,माझ्या नवऱ्याच्या धंद्याचे. तुझ्या त्या रती ला कायदेशीर दृष्ट्या काहीही किंम्मत नाहीये.एखाद्या मैत्रिणीला किंवा रखेलला असते त्यापेक्षा जास्त किंमत नाही.”— मैथिली.
“ मला वाटतंय की सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगणे आवश्यक आहे की मृत रायबागी च्या इच्छा पत्रावर कोर्टाने शिक्का मोर्तब करावे म्हणून आणि  मैथिली ला अधिकृत रित्या वारस म्हणून मान्यता मिळण्यासाठी मी कोर्टात अर्ज करतो आहे.” भोपटकर म्हणाला.
“ इच्छापत्र ! म्हणजे रायबागी ने इच्छापत्र केलंय?” खांडेकर उद्गारले.
“ तेच तर सांगत्ये ती. सर्वकाही  मैथिलीच्या नावाने करणारे इच्छापत्र.” भोपटकर म्हणाला.
“ रती शी लग्न झाल्यावर रायबागी ने दुसरे इच्छापत्र केलं नव्हतं?  माझी माहिती आहे की केलं होतं.ज्यानुसार त्याने सर्व काही रती च्या नावे केलं होतं.”  पाणिनी म्हणाला.
“ त्या लग्नाला काहीही अर्थ नव्हता.”  मैथिली झटकून टाकत म्हणाली.
पाणिनीने आपली नजर भोपटकर वरून ढळून दिली नाही.
“ मी इच्छापत्राबद्दल विचारतो आहे.लग्नाबद्दल नाही.”  पाणिनी म्हणाला.
“ नंतर केलेलं इच्छापत्र सापडलं तर रायबागी प्रश्न उद्भवेल. पण माझ्या माहिती नुसार,त्याने दुसरं इच्छापत्रकेलं असलं तरी  तो आणि रती वेगळे झाल्यावर त्याने ते फाडून टाकलंय.” भोपटकर म्हणाला. “ मला अत्ता कायदेशीर बाबीत शिरायचं नाहीये,इथल्या अधिकाऱ्यांना परिस्थिती काय आहे आणि आपल्याला कुणाशी बोलावं लागेल  हे समजावं रायबागी माझा हेतू आहे.” भोपटकर म्हणाला.
“ तुझी अशील  मैथिलीने जर रायबागी ची फसावणूक केली असेल, घटस्फोट दिल्याचं सांगून, तर त्याचा आर्थिक लाभ घेण्यापासून तिला कायदा रोखेल. ”  पाणिनी म्हणाला.
“ कायदेशीर मुद्दे आपण कोर्टात लढू, पटवर्धन.मला एवढीच जाणीव करून द्यायची आहे सर्वांना,की,  मैथिली ही आता मालकीण बनली आहे रायबागी च्या सर्व व्यवसायाची आणि आमची अपेक्षा आहे की सर्व कर्मचारी वर्ग प्रामाणिकपणे तिला साथ देईल. ” भोपटकर म्हणाला.
“  खासनीस चा अपवाद वगळता.”  मैथिली खडूसपणे म्हणाली.  “ याचं कारण या क्षणापासून मी  खासनीस ला कामावरून काढून टाकत्ये. दुपारपर्यंत तुझं चंबूगबाळं आवरायचं आणि निघून जायचं.तुझ्या लाडक्या रतीला जवळ घेऊन सांत्वन करत बस.मी अत्ताच अधिकृत रित्त्या आदेश देत्ये की उद्यापासून तुला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.”
“ तुला अजून कोर्टाने वारस म्हणून नियुक्त केलेलं नाही.तुला काही अधिकार नाहीये या क्षणी त्याला असं काही बोलायचा.”  पाणिनी म्हणाला.
पाणिनीकडे दुर्लक्ष करून  मैथिली, कणाद मिर्लेकर ला उद्देशून म्हणाली, “ मी काय म्हणाल्ये,तुला ऐकू आलंय ना? मला या क्षणापासून  खासनीस इथे नकोय.त्याच्या सगळ्या वस्तू घेऊन जायला सांग त्याला.आणि किल्ल्या आणि ऑफिसच्या वस्तूंचा ताबा तू घे.इथे त्याला यायला पूर्ण बंदी आहे.”  मैथिली म्हणाली.
“ हो, मिसेस रायबागी.” आवंढा गिळत कणाद मिर्लेकर म्हणाला.
“ ठीक आहे तर, सगळ्यांनी लक्षात ठेवा.माझ्या वकिलांचे काहीही म्हणणे असले तरी इथे माझ्याच आज्ञा पाळाव्या लागतील तुम्हाला.” एवढं बोलून ती आणि भोपटकर बाहेर पडले.
“ मला विचाराल तर माझ्या आणि  माझ्या अशिलाच्या दृष्टीने   मैथिली च्या आदेशांना शून्य किंमत आहे.तुम्ही लोकांनी काय करायचं ते ठरवा. ज्या क्षणी घटस्फोट घेतला असल्याचे सांगून  तिने रायबागीची फसवणूक केली,त्याच क्षणी तिने त्याच्या संपत्तीवर सांगितलेला हक्क आपोआप नष्ट झाला आहे. तुमचं आणि रायबागी चं काय नातं आणि संबंध असतील आणि तुम्ही तिच्या पोकळ धमक्यांना कितपत भीत असाल त्याचा विचार करून तुम्ही लोक काय निर्णय घ्यायचा आहे स्वत:बाबत तो घ्या. ” पाणिनी म्हणाला आणि चकित झालेल्या खांडेकरांना तिथेच सोडून बाहेर पडला.
( प्रकरण ९ समाप्त)