Get it on Google Play
Download on the App Store

मर्डर वेपन प्रकरण 13


 

प्रकरण १३
जेवण्याच्या सुट्टीत सौंम्या,कनक आणि पाणिनी हॉटेलात बसले होते.
“ पाणिनी,मला टिप मिळाली आहे की दुपार नंतर ते तुला काहीतरी धक्का द्यायच्या तयारीत आहेत.” कनक ओजस म्हणाला.
“ काय आहे नेमकं?”  पाणिनीने विचारलं
“ ते नाही समजलं.”
“ कनक, तुझ्या लक्षात आलं का अंगिरस खासनीस कुठलातरी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ नये या काळजीत पडलेला होता.जेव्हा तो प्रश्न त्याला न विचारताच चंद्रचूड यांनी तपासणी थांबवली,तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर संकटातून सुटल्याचा भाव होता. बर,ते असू दे.उत्क्रांत उद्गीकर बद्दल काय? ”  पाणिनीने विचारलं
“ तो कॉन्ट्रॅक्टर आहे.पंचावन्न वय आहे.विधुर आहे.त्याच केरशी शहरात घर आहे.घराचा मागचा भाग तो भाड्याने देतो,नेहेमी.त्याला एक मुलगी आहे ती कॉलेज ला आहे.बाहेर गावी राहते.”कनक ने माहिती दिली.
“ रती किंवा या प्रकरणाशी संबंधित कुठल्या व्यक्तीचा आणि या माणसाचा काही संबंध?” पाणिनीने विचारलं
“ तेच महत्वाचं सांगायचंय तुला , पाणिनी. या माणसाचा राहण्याचा पत्ता २९१ केरशी शहर असा आहे.आणि मैथिलीने जेव्हा घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज सादर केला, तेव्हा तिने तिचा निवासी पत्ता म्हणून २९१ केरशी हाच पत्ता दिला होता.याचा अर्थ ती त्याची भाडेकरू होती. तुझ्या लक्षात आलं का, पाणिनी,तुझ्या ऑफिसात जेव्हा बॅग विसरून जायचं प्रकरण घडलं,तेव्हा उद्गीकर ची गाडी आपल्या इमारतीच्या पार्किंग पासून जवळच्या पार्किंग लॉट मधे उभी होती.”
पाणिनी चे डोळे विस्फारले. अचानक पाणिनीला काहीतरी आठवलं.  “कनक, निवेदिता नंदर्गीकर, म्हणजे अंगिरस खासनीस ची सेक्रेटरी, ही पण घटस्फोटीता आहे.मला खासनीस म्हणाला होता.तिने पण आपल्या नवऱ्याला  घटस्फोट दिला तेव्हा ती २९१ केरशी या पत्त्यावर रहात होती का याची माहिती काढ. मी आणि सौंम्या ज्या विमानाने विलासपूर ला आलो, त्याच्या आसपास आधी आणि नंतर कोणती विमाने विलासपूर ला आली ,त्यात कोण प्रवासी होते याची यादी मिळव.”  पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे पाणिनी.आणखी काय?”—कनक
“ उत्क्रांत उदगीकर  च्या मुलीचे नाव काय आहे?”  पाणिनीने विचारलं
“ हिमांगी.”
“ मैथिलीने घटस्फोटाचा अर्ज दखल केला कोर्टात, त्याची तारीख काय होती?”  पाणिनीने विचारलं
“ पंधरा सप्टेंबर.”
“ मैथिली ही जर उत्क्रांतच्या बंगल्यात मागच्या भागात भाड्याने रहात असेल काही काळ, म्हणजे घटस्फोटासाठी वेगळ राहायला लागत म्हणून, तर हिमांगी आणि तिची नक्कीच ओळख असणार.कदाचित निवेदिता सुद्धा त्या दोघींना ओळखत असेल.तू सध्या हिमांगी कुठे आहे याचा तपास काढ.”
“ रती ला सोडवायची किती संधी आहे तुला?”—कनक
“ या कोर्टातून सोडवायचे काम अवघड आहे.कारण तिला खुनाची संधी होती का आणि कारण होते का या दोनच गोष्टी ठरवायचे काम प्राथमिक खटला चालवणाऱ्या कोर्टाचे असते.आणि या दोन गोष्टींचा विचार केला तर रती त्यात अडकते. पण वरच्या कोर्टात केस जाईल तेव्हा सरकारी वकिलांना सिद्ध करावे लागेल की तिच्या पर्स मधे खुनी हत्यार होतं.पण यात दोन रिव्हॉल्व्हर गुंतल्या आहेत.एकाला आपण रती चं रिव्हॉल्व्हर म्हणू,जे मिस्टर रायबागी ने त्या दोघांच्या लग्नानंतर  खरीदली,आणि तिला दिली. दुसरी त्याने त्यांच्या लग्नाच्या आधी खरेदी केली होती, त्याला आपण रायबागीचं रिव्हॉल्व्हर म्हणू. खून झालाय तो या रिव्हॉल्व्हर ने.” पाणिनी म्हणाला.
“ पण एक गोष्ट तू विसरलास पाणिनी, की रायबागीच्या रिव्हॉल्व्हर वर रतीचे ठसे आहेत.”
“ मी विसरलो नाहीये.”  पाणिनी म्हणाला.  “ ते ठसे नेलपेंट किंवा जिलबी वा गुलाबजाम सारख्या पदार्थाचं बोट नवऱ्याच्या रिव्हॉल्व्हर ला  लागलं असावं.ते नक्की कधी हे सांगणे अवघड आहे.”
“ पण तुला हे सिद्ध करणं अवघड आहे पाणिनी.”कनक म्हणाला.
“ मला काहीच सिद्ध करायला लागणार नाही.मला फक्त न्यायाधीशांच्या मनात संशय निर्माण करणे एवढंच काम करायचंय ”
तेवढ्यात वेटर त्यांनी ऑर्डर केलेलं खाणं घेऊन आला. ते जेवत असतांना पाणिनी एकदम म्हणाला,  “ कनक, मला उत्तरं सापडलंय.”
“ कशाचं?”
“ मी जे शोधून काढू शकत होतो त्याचं. ”  पाणिनी म्हणाला.  “ एक काम कर, विलासपूरच्या एअरपोर्ट वरून  स्वत: चालवायच्या कार कोणी कोणी भाड्याने घेतल्या ते शोधून काढ.”
“ काय  तर्क लढवतो आहेस तू?”—कनक
“ काय घडलं आहे  हे मी सिद्ध नाही करणार, काय घडलेलं असू शकतं ते मी कोर्टाला नजरेला आणून देणार, सरकारी वकील हे नाही सिद्ध करू शकणार की तसं घडलेलं नसू शकतं. ”  पाणिनी म्हणाला.
(प्रकरण १३ समाप्त.)