Get it on Google Play
Download on the App Store

मर्डर वेपन प्रकरण 8



 

मर्डर वेपन
प्रकरण ८
रिसेप्शनिस्ट गती ने पाणिनी ला फोन केला आणि सांगितलं की नंदर्गीकर नावाची स्त्री बाहेर आल्ये आणि  खासनीस ला द्यायला तिने एक पाकीट आणलंय.
“ पाठव तिला आत.” पाणिनी गतीला म्हणाला. नंतर  खासनीस ला म्हणाला,  “ तू तिचा ज्या प्रकारे उल्लेख केलास त्यावरून ती अविवाहित असेल असं मला वाटलं होतं, उगाचच.”
“ नाही विवाहित आहे ती. ”  खासनीस म्हणाला. “ जरा दुख:द घटनाच आहे तिच्या बद्दल.”
“ विधवा आहे?”  पाणिनीनं विचारलं
“ नाही, घटस्फोटित.”  खासनीस म्हणाला. “ एक दिवस संध्याकाळी तिचा नवरा ऑफिसातून परत आलाच नाही.त्यानंतर तिने त्याला कधीच पाहिलं नाही. नंतर तिने घटस्फोट घेतला.”
“ कधी घडलं हे?”  पाणिनीनं विचारलं
“ साधारण वर्षापूर्वी.आमचेकडे कामाला लागण्यापूर्वी ”  खासनीस म्हणाला. तेवढ्यात एक काळ्याभोर केसांची आणि काळ्याभोर डोळ्यांची तरुणी आत आली. खासनीस जाग्यावरून उठला आणि तिच्या हातातला खोका घेतांनाच त्याने पाणिनी पटवर्धन ची ओळख करून दिली. “ हे अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.सुप्रसिद्ध फौजदारी वकील.तू त्यांच्या बद्दल ऐकलं असशीलच.वाचलही असशील.”
“ अरे ! पण हे काय झालं या पॅकेटला?”  खासनीस हातात खोका घेताच ओरडून म्हणाला.
“ मी तुमच्या तिजोरीतून काढलं तेव्हा असंच होतं हे.” निवेदिता नंदर्गीकर म्हणाली.
“ अग हे सगळ उघडलंय. तू नाही ना केलंस हे निवेदिता ? ”
“ नाही हो. जसं होतं तसंच घेऊन आले.”
“ तिजोरी बंदच होती ना?”  खासनीस ने घाबरून विचारलं.
“ हो.मी तुमच्या टेबलाच्या ड्रॉवर मधून किल्ली घेतली आणि तिजोरी उघडून हे पॅकेट घेऊन इकडे आले. ”  निवेदिता नंदर्गीकर म्हणाली.
“ काहीतरी जबरदस्त गडबड झाल्ये.”  खासनीस म्हणाला.त्याने ते पॅकेट उघडायला सुरुवात केली पण तो जरा घुटमळला. “निवेदिता, तू जरा बाहेर रिसेप्शन मधे बसतेस का? मी येतो बाहेर थोड्याच वेळात आणि तुला पुन्हा सोडतो ऑफिसात ”
ती हसली आणि बाहेर गेली.
“सेक्रेटरी या नात्याने तुझ्या खाजगी गोष्टीत ती ढवळाढवळ करते? ”  पाणिनीनं विचारलं
“ सेक्रेटरी म्हणून ती खूप हुशार आहे पटवर्धन.तुमच्या विचारण्याचा अर्थ हा असला की, तिने ते पॅकेट उघडलं असेल का तर त्याच उत्तर ‘ नाही ’ असंच आहे. ”
“ सौंम्या,तू त्याला गुंडाळलेले कागदी आवरण काळजीपूर्वक काढ.हाताचे ठसे कमीतकमी येतील याची काळजी घे. आणि एका खोक्यात घालून तो खोका सीलबंद करून ठेव.कधी गरज लागली तर लागेल तो. ”  पाणिनी म्हणाला.
“ कागदावर हाताचे ठसे उमटतात? ”  खासनीस ने पटकन विचारलं.
“ उमटतात. आणि नवीन तंत्रज्ञानाने तसे उमटलेले ठसे जपूनही ठेवता येतात.”  पाणिनी म्हणाला.
 खासनीस ने निश्वास सोडला. “ माझे आणि निवेदिताचे तर खूपच ठसे त्यावर असतील. ”
सौम्याने कागदी आवरण एका खोक्यात भरून ठेवलं तेव्हा आतली रिव्हॉल्व्हर सर्वांच्या दृष्टीस पडली.
पाणिनी ने पेन्सिल रिव्हॉल्व्हर च्या नळीत घालून ती उचलली आणि टेबलचे ड्रॉवर मध्ये टाकली.
“ आपण आता तारकरला  फोन करू आणि सांगू की जे रिव्हॉल्व्हर हरवल्याचे मी सांगितले होतं त्याला, ते आता माझ्याकडे आलंय परत. ”
“ सांगितले होते  या भूत काळातील शब्दामध्ये बराच कालावधी गेलाय.” सौंम्या म्हणाली.
“ अगदी बरोबर.त्याला फोन कर आणि हेच शब्द वापर.”  पाणिनी म्हणाला.
“  खासनीस,इथे तारकर लौकरच हजर होईल. ते रिव्हॉल्व्हर ताब्यात घ्यायला तो टपलेलाच असेल.तो येईल तेव्हा तू इथे नसलेलंच बरं.”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मला या लफड्यात संरक्षण देणार असाल ना?”
“ अजिबात नाही.मी माझ्या अशिलाला संरक्षण देणार आहे.त्या नंतर स्वत:ला वाचवणार.तूच हे लफड निर्माण केलंस आता निस्तरही तूच.”  पाणिनी म्हणाला.
बाहेरून गती चा इंटरकॉम खणखणीत आवाजात वाजला. तिचा आवाज एकदम  टिपेचा आणि उत्तेजित होता. “ बाहेर इन्स्पे.तारकर आलेत आणि त्यांचे बरोबर सरकारी वकील खांडेकर आहेत. ”
“ येउदे त्यांना आत.सौंम्या,बाहेर जावून त्यांना आत घेऊन ये.”
दोघेही घाईघाईत आत आले.
“ तुम्ही रिव्हॉल्व्हर संदर्भात आला असाल ना? बसा आरामात.काय घेणार?”
“ माहिती शिवाय काही नको आम्हाला आणि फक्त रिव्हॉल्व्हर नाही इतरही बऱ्याच गोष्टींवर बोलायचंय आम्हाला. तू काय लपवतो आहेस आमच्या पासून?” खांडेकर म्हणाले.
“ मी इथे पोलिसांना मदतच करायला बसलोय.”  पाणिनी म्हणाला.
खांडेकरांनी तारकरला खूण केली.
“ कुठाय रिव्हॉल्व्हर?” तारकर म्हणाला.
पाणिनीने आपल्या टेबलाच्या उजव्या ड्रॉवर मधून रिव्हॉल्व्हर काढलं.
“ मी आधी इथे आलो तेव्हा ते इथं का नव्हत? ” तारकर म्हणाला.
“ ती एक मोठी कथाच आहे.”
“ फोनवर तू म्हणालास की तुझ्या हातून ती हरवल्ये.” तारकर म्हणाला.
“ सॉरी, तारकर, माझी सेक्रेटरी तुला म्हणाली की रिव्हॉल्व्हर सापडत नाहीये.कुठेतरी ठेवल्ये गेल्ये. ”  पाणिनी म्हणाला.
“ कुणाच्या हातून?” तारकर ने विचारलं
“ ती एक मोठी लांबलचक कथा आहे. तुम्हाला सांगायची की नाही मी  विचार करतोय.”  पाणिनी म्हणाला.
“ उलटपक्षी मीच  विचार करतोय की खुनाचे हत्यार लपवले आणि ते खुनाचे हत्यार आहे हे माहित असून सुद्धा वस्तुस्थिती दडवली या आरोपाखाली तुला न्यायाधीशांसमोर हजर करावं का याचा.” 
“ असं असेल तर मी तुमच्याशी काही न बोलता कोर्टासमोरच काय ते बोलेन.”  पाणिनी म्हणाला.
“ तारकर. रिव्हॉल्व्हर वर ठसे आहेत का तपास घेशील?” खांडेकर म्हणाले.
“ साधारण अशा प्रकारच्या रिव्हॉल्व्हर वर ठसे मिळायची शक्यता नसते.तरीही मी पोलीस स्टेशन ला गेलो की बघतो.” तारकर म्हणाला आणि त्याने नळीत पेन्सिल घालून रिव्हॉल्व्हर उचललं आणि आपल्या बरोबर आणलेल्या पिशवीत टाकलं.तेवढ्यात खांडेकर म्हणाले, “ नंबर सांग त्यावरचा.”
“सी-४८८०९. असा नंबर आहे. ” तारकर म्हणाला.
खांडेकरांनी तो आपल्या वहीत लिहून घेतला आणि म्हणाले,“ ही त्याची पहिली खरेदी आहे.”
 “ म्हणजे? ”  पाणिनीनं विचारलं
“ तुला मी आधीच सावध करतोय,पटवर्धन, रिव्हॉल्व्हर बदलल्याचं जर आढळून आलं या केस मधे,तर तुझ्या विरुद्ध मी खटला भरेन.” खांडेकरांनी पाणिनीला दमात घेत म्हंटलं.
“ रिव्हॉल्व्हर ची बदला बदली म्हणजे?”  पाणिनीनं विचारलं
“ पद्मराग रायबागी ने दोन अगदी सारखी दिसणारी आणि सारख्याच प्रकारची म्हणजे पॉइंट ३० ची रिव्हॉल्व्हर खरेदी केली आहेत.एक दोन वर्षांपूर्वी आणि एक चौदा महिन्यांपूर्वी.दुसरी खरेदी करतांना त्याने विक्रेत्याला बोलून दाखवलं होतं की त्याला त्याच्या बायकोच्या संरक्षणासाठी म्हणून ती हव्ये.” खांडेकर म्हणाले.
“ ती ही आहे? दुसरी?”  पाणिनीनं विचारलं
“ पहिली.” खांडेकर म्हणाले.
“ तर मग त्यात एवढी बोंबाबोंब करण्याजोगं काय आहे मला समजत नाही.”  पाणिनी म्हणाला.
“ काय आहे,पटवर्धन, तुला सवयच आहे बंदुका बदलायची आणि आम्हाला गंडवायची.माझा कयास असा आहे की तुझ्या अशिलाला दोन्ही रिव्हॉल्व्हर हाताळायला संधी असल्यामुळे खुनात न वापरलेल्या रिव्हॉल्व्हर मधून तू दोन गोळ्या उडवून रिव्हॉल्व्हर ची बदला बदली केली असणार.मी पैज लावून सांगतो जेव्हा आम्ही त्याची तपासणी करून घेऊ तेव्हा रायबागी ला मारण्यात आलेली गोळी या रिव्हॉल्व्हर मधून मारण्यात आली नव्हती असंच सिद्ध होईल. ” खांडेकर म्हणाले.
“ तसं असेल तर रती विरुद्ध काही केसच नाही तुमच्याकडे.”  पाणिनी म्हणाला.
“  तर त्याचा अर्थ असा की मी तुला त्या खुनात अडकवू शकतो.”
“ जर का ही रिव्हॉल्व्हर खुनात वापरलेली नसेल तर.”  पाणिनी म्हणाला.
“ बरोबर.” खांडेकर म्हणाले.
“ पण जर का ही रिव्हॉल्व्हर खुनात वापरलेली असेल तर?”  पाणिनीनं विचारलं
“ तर मी तुला........” खांडेकर काही न सुचून गप्प झाले.
“ हे बघ पटवर्धन,त्यापूर्वी मला तुझ्याकडून लेखी उत्तरं हवंय की हे रिव्हॉल्व्हर सकाळी का नाही उपलब्ध झालं.”
“ सांगतो मी, रती ने रायबागी च्या ऑफिसातील  अंगिरस  खासनीस ला हरवलेल्या  बॅग आणि रिव्हॉल्व्हर बद्दल सांगितलं.त्याला वाटलं की हे रिव्हॉल्व्हर रती ला अडचणीत आणू शकेल त्यामुळे ते तिथून गायब करणं श्रेयस्कर आहे.त्यामुळे आपण स्वत: पाणिनी पटवर्धन आहोत असं इथल्या झाडलोट करणाऱ्या बाईला भासवून,अंगिरस ने मी ड्रॉवर मधे ठेवलेली रिव्हॉल्व्हर उचलून रायबागी च्या ऑफिसात नेऊन ठेवली.तिथे ठेवतांना त्याने आधी एका खाकी पाकिटात टाकून सील केलं.त्यावर शेरा मारला की हे पटवर्धन यांच्या ऑफिसातून घेतले आहे. आणि त्या खाली सही केली. ”  पाणिनी म्हणाला.
“ एवढं सगळं त्याने का केलं ? ” तारकरने विचारलं.
“ कारण त्याला रती ला वाचवायचं  होतं आणि त्याला  स्वत:लाही. कारण त्याला माहीत होतं की कधी ना कधी त्याच्यावर रिव्हॉल्व्हर चोरल्याचा आरोप येऊ शकतो.”  पाणिनी म्हणाला.
“ तुझ्याकडे नेहेमी प्रमाणे पटवून देणारा खुलासा आहे.पण मी फक्त ऐकून घेतोय.मला तो पटला आहे असा अर्थ काढू नकोस.” तारकर म्हणाला.
त्यानंतर पाणिनीने रिव्हॉल्व्हर च्या चोरी पासून त्याने ती कशी पकडली हे सर्व सांगितलं.
“ आणि आता तुझं म्हणण आहे की ज्या पाकिटात रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं,ते उघडलं गेलंय?”
“ हो.एका धारदार ब्लेड ने पाकिटाला फट पडून आतले रिव्हॉल्व्हर बघितलंय आणि पुन्हा ते पाकीट पिशवीत टाकलंय.माझ्या ते ताब्यात आल्यावर मी माझ्या हाताचे ठसे त्यावर पुन्हा उमटणार नाहीत याची काळजी घेऊन ते ड्रॉवर मधे ठेवलंय.”  पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, असल्या भूल थापांना मी गण्डणार नाही. रायबागी सगळा बनव तू मोठ्या चातुर्याने रचलायस.आम्ही जेव्हा रती ला संशयित म्हणून अटक करू आणि हे रिव्हॉल्व्हर पुरावा म्हणून सादर करू तेव्हा तू म्हणशील की रती चे पर्स मधे हेच रिव्हॉल्व्हर होतं कशावरून? ते सिद्ध करण्यासाठी  तू आम्हाला  खासनीस आणि त्याच्या सेक्रेटरीला कोर्टात आणायला भाग पाडशील, आणि तिथे तू असं म्हणशील की त्या दोघांच्या ताब्यातच रिव्हॉल्व्हर असल्याने त्यात बदलाबदली करायची संधी दोघांना होती.रती चा यात काही संबंध नाहीये.”
“ कोणीतरी रती ला अडकवण्यासाठी छेडाछेडी केल्ये हे नक्की.”  पाणिनी म्हणाला.
“ मला आधी तो पुरावा ताब्यात घेऊ दे.” खांडेकर म्हणाले.
“ थांबा,तुम्ही जर तो रिव्हॉल्व्हर गुंडाळलेला कागद या ऑफिस बाहेर घेऊन जाणार असाल तर तसं करण्यापूर्वी तो तुम्ही इथेच माझ्या समोर आधी तपासा म्हणजे नंतर कटकट नको की पाकीट कापलेलं होतं की नाही आणि....”  पाणिनी म्हणाला.
“ मला मान्य आहे की पाकीट कापलेलं आहे.तुझ्याच कल्पनेचा , योजनेचा, तो एक भाग होता पाणिनी. मी आता काय करणारे ते सांगतो, तुला आणि सौंम्या ला मी रायबागी च्या ऑफिसात नेणारे.”
“ मी तयारच आहे यायला.उलटपक्षी मीच सुचवणार होतो ते.पण सौंम्या नाही.तिला आज ऑफिसात खूप...”  पाणिनी म्हणाला.
“ तिला किती कामं असतात ते मला माहित्ये.बघावं तेव्हा तू आणि ती हॉटेलात बसलेले असता आणि जेव्हा एखादी केस येते तेव्हा ती दिवसभर पुरवता आणि रात्री परत हॉटेलात जाऊन तिथून घरी जाता. ” खांडेकर म्हणाले.
“ आपण दोघेही वकील असलो तरी दोन गोष्टीत फरक आहे,पहिला मुद्दा म्हणजे, तुमच्या सारखं मला दिवसभर काथ्याकूट करत बसावं लागत नाही.नेमकं काय करायचं ते मला माहित असतं त्यामुळे कमी वेळात मी दिवसभराचं काम करू शकतो.”  पाणिनी म्हणाला.
“ दुसरा मुद्दा? ” खांडेकरांनी विचारलं
“ मी केसेस जिंकतो.” खवचट पणे  पाणिनी म्हणाला. आणि सौंम्या ला घेऊन  खांडेकरांबरोबर निघाला.
( प्रकरण ८ समाप्त)