११ मुका ३-३-1
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
मी भरपूर कष्ट करणारा एक शेतकरी आहे.आता मी साठीच्या घरात आलो आहे .आमचे कुटुंब संयुक्त आहे.मी माझे आईवडील व वाघासारखे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा आमचा बारदाना आहे.माझ्या लहानपणी आमची शेतजमीन कमी होती.वडिलांनी त्यात काही भर घातली.हळूहळू मी व वडील या दोघांनी शेतीचा विस्तार बराच केला.
पुढे मुलांनी तर त्यात सतत कष्ट करून आणखी भर घातली.आता मी बऱ्यापैकी सधन शेतकर्यांमध्ये गणला जातो.गोठय़ामध्ये बैलांबरोबरच म्हशी व गायी आहेत.एक मुलगा गडी माणसांबरोबर दुधाचा धंदा बघतो.गायी व म्हशी यांची देखभाल करण्यापासून दूध काढून त्याची विक्री करण्यापर्यंत सर्व काम तो पाहतो.दसरा मुलगा विविध प्रकारची भाजी पिकवीतो.भाजी व फळफळावळ यांचा सर्व व्यवहार दुसरा मुलगा बघतो.शेती विषयक इतर कामे तिसरा मुलगा पाहतो.
मी जवळजवळ निवृत्त आहे.मुले माझा सल्ला घेतात.सर्व कामांवर अजूनही माझी देखरेख असते.नातू व नाती शाळेत शिकत आहेत.थोडय़ाच दिवसांत ती कॉलेजात जाऊ लागतील.
माझेही शिक्षण जुन्या काळातील कॉलेजपर्यंत झाले आहे.आमच्या गावाला नदी,कालवा,अशी पाण्याची सोय अजून तरी नाही.बहुतेक शेती कोरडवाहू आहे.बऱ्याच जणांनी विहीर खणण्याचा प्रयत्न केला.परंतु कांहीच विहिरींना थोडेबहुत पाणी लागले.बऱ्याच जणांचे प्रयत्न फुकट गेले.मीही आमच्या जमिनीमध्ये घराजवळ विहीर खणली.सुदैवाने त्याला पाण्याचे बळकट झरे लागले.कितीही पाणी उपसले तरी विहीर सदैव तुडुंब भरलेली असते. उन्हाळय़ामध्येही आमच्या विहिरीचे पाणी आटत नाही.पाऊस जून महिन्याच्या अखेरीपर्यंत गेला तरीही आमची विहीर बऱ्यापैकी भरलेली असते. विहिरीवर दोन पंप बसवले आहेत. गरजेप्रमाणे ते सुरू असतात.भाजीपाला फळफळावळ शेती सर्वाना पाण्याचा पुरवठा त्यातून होतो.
आमची सर्व प्रगती या पाण्यामुळेच झाली आहे .माझ्याकडे मोटार, जीप, पिकअप व्हॅन आणि पाण्याचा टँकर आहे.शेतीमध्येही मी ट्रॅक्टरचा वापर करतो.जवळपासच्या शेतकर्यांना व शहरात मी टँकरमधून पाण्याचा पुरवठा करतो.त्यावरही मला बऱ्यापैकी पैसा मिळतो.
विहीर खणून त्याला भरपूर पाणी लागल्यापासून आमची भरभराट झाली आहे.थोडक्यात भरभराटीचा पाया भरपूर पाणी असलेली विहीर हा आहे.सहा महिन्यांपूर्वी आमच्या येथे एक अपघात झाला.विहिरी जवळून मोटार रस्ता जातो.एका रात्री रस्त्यावरून मोअर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. कदाचित मोटार यंत्रणेमध्ये कांही बिघाड झाला असावा .मोटार कुंपण तोडून,विहिरीचा कठडा तोडून, विहिरीमध्ये कोसळली.मोटार उभीच्या उभी विहिरीमध्ये गेली.मोटारीत आईवडील व तीन मुले असे एक अख्खे कुटुंब होते.दुर्दैवाने एकही वाचू शकला नाही.विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे सर्वांचा बुडून मृत्यू झाला.
पोलीस आले पंचनामा झाला मोटार विहिरीतून बाहेर काढण्यात आली.त्या कुटूंबाचे जवळचे कुणीही नातेवाईक नव्हते.प्रेतांची ओळख पटवण्यासाठी त्या कुटुंबाच्या शेजारचे लोक आले. प्रेतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणीही पुढे आला नाही .शेवटी पोलिसांनी त्या पांचही प्रेतांना (पोस्टमार्टेम) शवविच्छेदन झाल्यावर भडाग्नी दिला.
तेव्हापासून आमच्या वैभवाला उतरती कळा लागली आहे.विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे.त्याला घाणेरडा वास मारतो.गुरे ते पाणी पीत नाहीत.गुरांचा जीव वाचविण्यासाठी टँकरचा उपयोग करून मला पैसे देऊन दूरवरून पाणी आणावे लागते .पाण्यातून उत्पन्न मिळण्याऐवजी पाण्यासाठी खर्च करावा लागतो.आमच्या कुटुंबासाठी पाणी आणावे लागतेच.त्या अपघातापासून पाण्यामध्ये काय झाले कुणास ठाऊक परंतु भाजीपाला नीट पिकत नाही.आंबा पेरू सीताफळ इत्यादी फळेही येत नाहीत.केवळ पीक कमी येते एवढेच नव्हे तर फळे भाजीपाला टोमॅटो या सर्वांना कसला तरी घाणेरडा वास येतो.भाजीपाल्याचा धंदा बुडाल्यात जमा आहे.पाण्याचा धंदा तर बुडालाच आहे.शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
सुरुवातीला आम्हाला मोटारीतील तेल विहिरीत पडल्यामुळे घाणेरडा वास येतो असे वाटत होते.आम्ही पंप बसवून,पाणी उपसून, संपूर्ण विहीर कोरडी केली.विहिरीतील गाळ काढला.आता पाण्याला वास येण्याचे कांहीही कारण नव्हते.परंतु मांस कुजल्याचा वास येतच राहिला.गुरांवर कसला तरी रोग पडला.गुरांचे डॉक्टर आणून त्यांना गुरे दाखविण्यात आली.त्यांनी औषध योजनाही केली .कांही गुरे दगावली.दुभती गुरे दूध देईनाशी झाली.
आमच्या घरालाही आजारपणाने ग्रासले.अामच्या वैभवाला उतरती कळा लागली.
सुरुवातीला आम्हाला हे सर्व कां होत आहे ते लक्षात आले नाही .एक दिवस मध्यरात्री विहिरीतून किंकाळ्या मारल्याचे आवाज येऊ लागले.नंतर रडण्याचे आवाज येऊ लागले.कितीतरी लोक दु:खाने रडत आहेत ओरडत आहेत असे वाटत होते. लक्ष देऊन ऐकल्यावर पुरुषाचा आवाज स्त्रीचा आवाज व मुलांचे आवाज येत होते.रोज मध्यरात्री या रडण्यामुळे कुणालाही नीट झोप येत नाहीशी झाली.सकाळी सर्वांचे डोळे चुरचुरत असत.
अपघात झाल्यापासून सुरुवातीला दोन तीन महिने रडण्याचे आवाज येत नसत.रडण्याचे आवाज येऊ लागल्यावर मोटारीतील कुटूंबातील लोकांचे आत्मे तळमळत आहेत असे लक्षात आले.ते जीव पुढच्या गतीला गेले नव्हते.हे लक्षात आले तरी पुढे काय करावे ते कळत नव्हते.
निरनिराळे लोक निरनिराळे उपाय सांगत होते .विहिरीच्या कठड्यावर रोज(वाडी/पानवाडी) दुपारी वरण भात पोळी ठेवावी असे कांहीजणानी सुचविले.
कांहीजणानी वरण भात पोळी तिन्ही सांजेला ठेवावी असे सांगितले.याबरोबरच तुपाचा दिवा लावावा असेही कांहींचे मत होते.त्या जिवांची प्रार्थना करावी. त्यांना आम्हाला त्रास देऊ नका आमचा कांहीही दोष नाही असे नम्रतापूर्वक सांगावे असेही सुचविले.
कुणी देवळात जाऊन प्रार्थना करावी.कुणी देवाला देवीला नारळ द्यावा.
कुणी गडावरच्या प्रसिध्द देवीला आम्हाला दुःखमुक्त कर तुझी खणा नारळाने ओटी भरेन असा नवस बोलावा असे सुचविले.
कोणी कांही कुणी कांही सुचवतच होते.आम्हाला वेड्यासारखे झाले होते.कोणत्याही उपायाने का होईना परंतु विहिरीतील पाणी शुध्द व्हावे स्वच्छ व्हावे वास जावा असे आम्हाला वाटत होते.पाणी खराब झाल्यामुळे आमच्या अस्तित्वावरच संकट आले होते.भाजीपाला शेती गुरे ढोरे फळफळावळ सर्व धुळीला मिळत होते.जो जे उपाय सुचवील ते आम्ही करीत होतो.
एकाने आम्हाला जवळच्या गावी नामांकित ज्योतिषी आहेत त्यांना पत्रिका दाखवा असे सांगितले.पत्रिका बघून ते गृहशांतीचा कांहीतरी उपाय सुचवतील असे त्यांच्या बोलण्यात आले.मी त्यांना भेटलो.माझी पत्रिका दाखविली.त्यांनी प्रश्नकुंडली मांडली.(प्रश्नकुंडली म्हणजे आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्या वेळची ग्रहस्थिती पाहून कुंडली तयार करणे आणि त्याचे फळ सांगणे.)दोन्ही पाहून त्यांनी ग्रहशांती सुचवली.अजून कांही काळ ग्रह वाईट आहेत.सुमारे दोन तीन महिन्यांनंतर ग्रहस्थिती सुधारेल.कुणीतरी तुम्हाला योग्य उपाय सुचवील.आणि तुमची पिडा टळेल असेही सांगितले.मी ग्रहशांती केली.विशेष कांही उपयोग झाला नाही.
माझ्या गावापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर गावी एक साधुपुरुष राहतात असे कुणीतरी सांगितले .ते अंतर्ज्ञानी आहेत.ते सहसा कुणाशी बोलत नाहीत.त्यांच्या मनात आले तर ते तुमच्याशी बोलतील.तुम्हाला उपाय सुचवतील.प्रयत्न करून बघायला हरकत नाही असे सांगितले.
मी व माझी पत्नी रामनगरला गेलो.महाराजांकडे आम्ही गेलो.त्यांच्या दर्शनाच्या इच्छेने बरीच मंडळी बाहेर बसली होती.त्यांच्या मर्जीनुसार ते कुणालाही बोलवतात.तुमच्या दैवात असेल तर ते तुम्हाला बोलावतील असे कुणीतरी म्हणाले.आमचे दैव बलवत्तर होते.स्वामींनी आम्हाला बोलाविले.आम्हाला त्यांना आमची समस्याही सांगावी लागली नाही.
आम्ही त्यांना नमस्कार करताच ते म्हणाले ते पाच जीव त्यांच्या मृत्यूनंतर योग्य संस्कार न झाल्यामुळे तुमच्या विहिरीत व आसपासच्या परिसरात अडकून पडले आहेत.तुम्ही जास्त खर्च आला तरी प्रयागराजला जा तिथे त्यांच्यावर विधिवत संस्कार करा.पोलिसांनी त्यांना भडाग्नी दिल्यामुळे त्यांच्या अस्थी किंवा राख मिळणे शक्य नाही.काय उपाय करायचा ते तेथील गुरुजी तुम्हाला सांगतील.ते सांगतील त्याप्रमाणे त्यांच्यावर अंतिम संस्कार करा.नंतर ते पुढच्या गतीला जातील.तुमचा त्रास दूर होईल .तुमच्यावरील संकट टळेल.
पोलिसांकडून मृत व्यक्तींची नावे वय राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती आम्ही बरोबर घेतली.त्यांच्या मोटारीचे राहिलेले अवशेष बरोबर घेतले.आम्ही प्रयागराजला गेलो.तेथील गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सर्व संस्कार केले.
*विहिरीचे पाणी आता पूर्ववत गोड झाले आहे*
*घरातील आजारपण गुरांचे रोग दूर झाले आहेत.*
*दूध भाजीपाला फळफळावळ अन्नधान्य पूर्वीप्रमाणे मिळू लागले आहे.*
*आमच्यावरील संकट दूर झाले आहे.*
९/५/२०२१©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com