Get it on Google Play
Download on the App Store

०७ बाबामारुती २-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

समोरच प्लॉटमध्ये एक पिंपळ होता.त्याला छानपैकी चबुतरा बांधलेला होता.त्यावर जाऊन बसता येणे सहज शक्य होते. त्यामुळे निसर्गाच्या जवळ गेल्याचा आनंद मिळणार होता.  

वार्‍याबरोबर पानांची सळसळ ऐकू येत असे.खिडक्या उघडून,सर्व जण झोपत असत.

खिडक्यांना मजबूत ग्रिल असल्यामुळे चोरीची भीती नव्हती. पश्चिमेकडील गार वारे येत असल्यामुळे एसीची गरज तूर्त तरी भासत नव्हती.

एक दिवस कशाने कोण जाणे परंतु सुधाला जाग आली.

तिने घड्याळाकडे पाहिले.

रात्रीचा एक वाजला होता.

ती कुशीवर वळली.   

तिची नजर सहज खिडकीबाहेर गेली.

समोर पिंपळाच्या शेंडय़ावर कुणीतरी बसलेला होता.   

त्याच्याकडे पाहून सुधाला हुडहुडी भरली.

तिचे डोळे विस्फारले.

तो म्हातारा टक लावून तिच्याकडे पाहात होता.

एक किंकाळी फोडून ती तिथेच बेशुद्ध झाली.

तिच्या किंकाळीने शाम जागा झाला.क्षणभर त्याला काय झाले ते कळत नव्हते.त्याने सुधाला हलवत तू कांही ऐकले का म्हणून विचारले.ती जागी होत नव्हती. कांही बोलत नव्हती.शामने दिवा लावला.बघतो तो सुधा बेशुद्ध झाली होती.त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. तरीही ती शुद्धीवर येत नव्हती.पुन्हा भरपूर पाणी तोंडावर मारले.सुधा शुद्धीवर आली.ती चटकन उठून बसली. समोरील पिंपळाकडे ती बोट दाखवीत होती.तिची दातखिळी बसल्यासारखे झाले होते.तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.

तिला गदगदा हालवत  शामने तिला काय म्हणून विचारले.ती म्हणाली,मला कशाने तरी जाग आली.कां जाग आली ते कळत नव्हते.मी कुशीवर वळले.समोरच्या पिंपळावर एक म्हातारा शेंडय़ावर बसला होता.     तिने पिंपळावर एक म्हातारा पाहिल्याचे सांगितले.त्याचे डोळे खदिरांगासारखे लाल होते.तो माझ्याकडे रोखून पाहत होता.पुढचे मला कांही आठवत नाही.शाम खिडकीजवळ गेला.त्याने पिंपळाकडे पाहिले.चांदण्याच्या प्रकाशात पिंपळ व्यवस्थित दिसत होता.त्यावर कोणीही नव्हते.शामने खाली पारावर, इकडे तिकडे जमिनीवर,आणि इतर झाडांकडे  पाहिले.त्याला कुठेही कुणीही दिसले नाही.तुला भास झाला असेल स्वप्न पडले असेल असे शाम तिला म्हणाला.

सुधा म्हणाली,मला स्पष्ट आठवते. स्वप्न नाही. पिंपळावरून एक म्हातारा माझ्याकडे रोखून पाहात असलेला मला स्पष्ट दिसला.त्याचे डोळे खदिरांगासारखे लाल होते.शामने त्या विषयावर पुढे बोलायचे टाळले.खिडकी लावून घेतली. पडदा सरकवला. सुधाला पाणी प्यायला दिले.नंतर दोघानाही रात्रभर झोप लागली नाही.

सकाळी सुधाचे डोळे चुरचुरत  होते.तिला तो म्हातारा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत होता. तिने खिडकी बंद ठेवली होती. पडदाही सरकवून ठेवला होता.खोलीत आलेल्या कुणीतरी काळोख येतो म्हणून पडदा दूर केला.वाऱ्यासाठी खिडकी उघडली.सुधा स्वयंपाकघरातून केव्हांतरी त्यांच्या शयनगृहात आली.पाहाते तो खिडकी उघडलेली.तिची नजर समोर पिंपळावर गेली.आता तिथे कुणीही नव्हते तरीही तिला तो म्हातारा कुठे दिसला ती जागा व तो म्हातारा स्पष्ट आठवत होता.तिने घाईघाईने खिडकी लावून घेतली पडदा सरकवला.मुलांना हाक मारून ही खिडकी अशीच बंद राहील. पडदाही सरकवलेला राहील. कुणीही खिडकी उघडायची नाही असे बजावले.मुलांनी कां म्हणून विचारता तिने त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे.सांगितलेले ऐका. असे उत्तर दिले.    

तिचे कामात लक्ष नव्हते.तिच्या सासूच्या लक्षात ती गोष्ट आली.सासूने तिला तुझे काय बिनसले आहे असे विचारले.त्यावर तिने रात्रीची सर्व घटना व्यवस्थित सविस्तर सांगितली. त्यांचा यावर विश्वास नाही. मला स्वप्न पडले. भास झाला.चांदण्यात,रात्रीच्या  अंधुक  प्रकाशात,कांहीतरी विचित्र आकृत्या झाडांवर दिसतात.आपल्या मनात भूत असते.आपण केव्हां ना केव्हां कुठे ना कुठे भुतााच्या गोष्टी ऐकलेल्या,वाचलेल्या असतात.मनी असे ते स्वप्नी दिसे.त्याचप्रमाणे मनी असे ते आपल्याला रात्री भासे.असे यांचे म्हणणे आहे.त्यावर सासू कांही बोलली नाही.मुलगी घाबरलेली दिसते. चार दिवस गेले म्हणजे सर्व कांही ठीक होईल. असे ती तिच्या मनाशीच बोलली.    

रात्री खिडक्या उघड्या ठेवायला सुधा तयार नव्हती.बेडवर झोपल्या झोपल्या एका खिडकीतून समोरचा पिंपळ दिसत असे.तोच तिला काल रात्री कुशीवर वळल्यावर  दिसला होता.ती खिडकी आपण बंद ठेवूया.दुसरी खिडकी उघडी ठेवायला काय हरकत आहे असे शामचे म्हणणे होते.त्यातून तरी वारा आत येईल.अंगावर आला नाही तरी खोलीत फिरेल.गारवा येईल ताजेतवाने वाटेल असे त्याचे म्हणणे होते. त्याचे कांहीही ऐकायला सुधा तयार नव्हती.शेवटी नाईलाजाने दोन्ही खिडक्या बंद करून पडदे सरकवून  दोघे झोपली.

शामला खिडक्या उघड्या टाकून झोपायची सवय होती.खूप उन्हाळा असेल तरच तो एसी लावीत असे.खिडक्या बंद असल्या तर त्याला घुसमटल्यासारखे होत असे.सुरवातीला सुधा चुळबुळ करीत होती.कालच्या आठवणीने तिला झोप येत नव्हती.थोडय़ाच वेळात ती गाढ झोपली.शामला मात्र झोप येत नव्हती.सुधा झोपली असे पाहून त्याने एखादी खिडकी उघडण्याचे ठरविले.कॉटवरून न दिसणार्‍या खिडकीजवळ तो गेला.  सुधाने पडदेही सरकवले होते. आवाज न करता त्याने पडदे सरकवले आणि हळूच आवाज न करता खिडकी उघडली.

समोरच पिंपळ होता.त्याची दृष्टी पिंपळावर सहज गेली.तो चांगलाच दचकला.समोर  पिंपळाच्या खांदीवर म्हातारा बसला होता.रोखून लाल डोळय़ांनी तो शामकडे पाहात होता.त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले.काल त्याला सुधाने स्वप्न पाहिले. तिला भास झाला. स्वप्न व सत्य यामध्ये ती गल्लत करीत होती असे वाटत होते.आता त्याने जे काही पाहिले त्यामुळे त्याला सुधा सत्य बोलत होती.ते तिचे स्वप्न नव्हते.हे लक्षात आले.म्हाताऱ्याने फांदीवरून उडी मारली आणि तो खिडकीजवळ शामच्या पुढ्यात आला. शामने चपळाईने खिडकी लावून घेतली.आता तो म्हातारा खिडकीला नाक लावून पाहात होता.शाम जागच्या जागी थरथर कापत होता. तसाच कसाबसा तो गादीवर येऊन बसला.आता त्याला झोप लागणे शक्य नव्हते.

सकाळ झाली तो तसाच गादीवर बसून होता.सुधा जागी झाली.तुम्ही अजून गादीवर बसून कां आहात? तुम्हाला ऑफिसात जायचे नाही का? असे तिने विचारले.त्यावर शामने काल रात्री घडलेली सर्व हकिकत सांगितली.आपल्याला जो अनुभव आला तोच शामला आला हे ऐकून ती हादरून गेली.शाम म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला कदाचित भास झाला असेल असे तिला कुठेतरी वाटत होते त्यावर बोळा फिरला.    

सकाळी सर्व जण टेबलजवळ एकत्र बसून चहा घेत असत.नाश्ता जेवण शक्य असेल तेव्हा सर्वांनी एकत्र घ्यावे असा त्यांचा परिपाठ होता.त्यामुळे कौटुंबिक वातावरण निर्माण व्हायला, राखायला मदत होते.असे त्याच्या बाबांचे म्हणणे होते.विचारांची देवघेव होते.दिवसांत घडलेल्या महत्त्वाच्या घटना एकमेकांना सांगितल्या जातात.सहज गप्पागोष्टी होतात.कौटुंबिक सलोखा व प्रेम रहायला व वृद्धिंगत व्हायला मदत होते. सर्वांना ते पटत होते.त्याप्रमाणे आचरण केले जात असे.त्यांच्या घरात आणखी एक नियम होता.जेवताना कुणीही मोबाइलचा वापर करायचा नाही.हा नियम कटाक्षाने पाळला जाई.कुणाचा फोन आला तरी तो शक्यतो घ्यायचा नाही.इमर्जन्सी असेल तरच फोन करायचा किंवा घ्यायचा.  

मुले शाळेत निघून गेली होती.नाष्टा करताना शामने बाबांजवळ दोन्ही रात्रीची हकीकत सविस्तर सांगितली.

त्यावर बाबा म्हणाले, कदाचित पिंपळावर एखादे अमानवी अस्तित्व असेल.खवीस झोटिंग समंध कुणीही असू शकेल. पिंपळावरच काय इतरही एखाद्या झाडावर कुणी असू शकेल. परंतु त्या कुणाचीही आपल्या घरात येण्याची हिंमत नाही.आपल्या फ्लॅटला हनुमंताचे कवच आहे.मी मारुती भक्त आहे.हे तुला माहीत आहेच.दर शनिवारी मी उपास  करतो.रामरक्षा व मारुती स्तोत्र म्हटल्याशिवाय मी रात्री झोपत नाही.मारुती मंत्राचा मी रोज जप करतो. जे रोज रामरक्षा म्हणतात. त्याचबरोबर हनुमंत मंत्राचा जप करतात किंवा मारुती स्तोत्र म्हणतात.त्यांच्याकडे अशुभ, अमानवी, शक्ती पाहणे शक्य नाही.आपल्या घराला श्री श्री राम व श्री श्री हनुमंतरायचे कवच आहे. तुम्ही बिनधास्त राहा. खिडक्या उघड्या टाकून झोपायला हरकत नाही.

समोर पिंपळावर खरेच कुणी आहे का त्याचा मी शोध घेतो.खरेच ते असेल तर मला ते दिसल्याशिवाय राहणार नाही.मग काय करायचे ते मी पाहीन.

बाबा बोलत असताना सुधा जिवाचे कान करून ऐकत होती.तिचा आपल्या श्वशुरांवर गाढ विश्वास होता.बाबा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या फ्लॅटला कवच आहे यावर तिचा विश्वास बसला.

शाम व सुधाच्या शयनगृहाला लागून हॉल व त्याच्या पलीकडे बाबा व आई यांचे शयनगृह होते.पिंपळ फक्त हॉल व शामचे शयनगृह यातून दिसत असे.बाबांच्या खोलीतून तो दिसत नसे.आज बाबांनी आपला मुक्काम हॉलच्या गॅलरीत टाकला होता. आरामखुर्ची टाकून बिनधास्तपणे बाबा गॅलरीत बसले होते.हॉलमधील दिवे मालवले होते.रात्रीचे बारा वाजले.पिंपळावर एक आकृती दिसू लागली.शाम व सुधा म्हातारा दिसतो असे म्हणाले होते.हा तर तरुण होता.जे कुणी अमानवी अस्तित्व होते ते आपली रूपे बदलू शकते याची कल्पना बाबाना होती.

तो तरुण पिंपळावर बसून बाबांकडे बघत होता.तो क्षणोक्षणी आपली रूपे बदलत होता.कधी लहान मुलगा, कधी तरुण, तर कधी म्हातारा, कधी पुरुष,तर कधी स्त्रीरूप.केस पिंजारलेली, मळवट भरलेली, लालबुंद डोळे असलेली, अक्राळविक्राळ सुळे असलेली, अशी बाई पाहून कोणाच्याही छातीत धडकी भरली असती.म्हाताराही तसाच भीती वाटेल असा भयानक दिसत होता.त्याच्या डोक्यावर सैतानाच्या चित्रात दाखवतात त्याप्रमाणे किंवा बैलाच्या असतात त्याप्रमाणे दोन शिंगे होती.सुळे बाहेर आलेले होते.त्याचे लालबुंद डोळे खोबणीबाहेर आले होते.

डोळे बाहेर लोंबत असताना दिसत होते.

* ती अशुभ शक्ती क्षणोक्षणी रूपे बदलत होती. पिंपळावर या फांदीवरून त्या फांदीवर असा त्या शक्तीचा नाच चालला होता.*

*काळोखी रात्र असूनही कशी कोण जाणे तिची, त्या अशुभ शक्तीची, सर्व रूपे स्पष्ट दिसत होती.*

*कधी ती अशुभ शक्ती बाबांच्या गॅलरीजवळ येत असे तर कधी दूर पिंपळावर जात असे.*   

* बाबांना घाबरवायचा त्या शक्तीचा इरादा स्पष्ट दिसत होता.*

*बाबा शांतपणे सर्व पाहात होते.बाबा घाबरत नाहीत असे पाहिल्यावर तो समंध(बहुधा समंध) हताश निराश झाल्याचे बाबांना स्पष्ट दिसत होते.*

*बाबांच्या शेजारी गॅलरीत बसून शाम सर्व कांही पाहात होता.बाबांच्या आधारामुळे त्याला थोडेबहुत निर्धास्त वाटत होते.*

* बाबानी आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांच्या फ्लॅटला खरेच हनुमान कवच होते.त्या शक्तीची आंत येण्याची हिम्मत होत नव्हती.*

(क्रमशः)

१०/६/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com