०६ बाबामारुती १-३
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
शामची बदली या गावात नवीनच झाली होती.तूर्त तो एका हॉटेलात रहात होता.त्याचे आईवडील, पत्नी व मुले, नोकरीच्या पूर्वींच्या गावी होती.त्याचे एकत्र कुटुंब होते.आई वडील वृध्द होते. मुलाच्या नोकरीच्या गावी नाइलाजाने त्यांना जावे लागत असे. त्यांना स्वतंत्रपणे राहणे कठीण होते.नवीन जागा, नवीन गाव, कदाचित बदललेले वातावरण, या सगळ्याशी जुळवून घेताना त्यांना त्रास होत असे.मुलाची नोकरी एकाच ठिकाणी असती, त्याचा व्यवसाय असता, तर त्यांना एकाच जागी राहता आले असते.शामच्या बदल्या होत असत.नाइलाजाने फरपटत त्याच्याबरोबर नवीन गावी जावे लागे.त्याची पत्नी नोकरी करीत नसे. मुलांच्या शाळा बदलाव्या लागत. प्रत्येक ठिकाणी जुळवून घेताना मुलानाही त्रास होई.एखाद्या चांगल्या गावाता, चांगल्या घरात,सर्वानी कायमचे स्थिर राहावे.शामने येऊन जाऊन नोकरी करावी किंवा नोकरीच्या ठिकाणी राहावे आणि अधूनमधून घरी येत जावे,असे सर्वांनाच वाटत असे.
शाम नवीन जागेच्या तपासात होता.एका मध्यस्थाला त्याने जागा बघण्याविषयी सांगितले होते.तूर्त तो ती जागा भाड्याने घेणार होता.जागा पटली, मानवली, किंमत जुळली, तर तो ती विकतही घेणार होता.तसे स्पष्ट त्याने मध्यस्थाला (एजंटला) सांगितले होते.मध्यस्थ निरनिराळ्या जागा दाखवीत होता.त्यातील कांही नव्या होत्या तर कांही जुन्या होत्या.शामला पगार भरपूर होता.त्याला कर्ज सहज मिळाले असते.त्याच्या वडिलांजवळही बर्यापैकी पैसा होता.सर्वाना आवडली तर त्याने ती जागा विकत घेतली असती.
शेवटी गावाबाहेर एक जागा त्याला पसंत पडली.नवीन कन्स्ट्रक्शन होती.त्याला हवा तसा थ्री बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट होता.ज्याप्रमाणे त्याला तीन बीएचके फ्लॅट हवा होता त्याचप्रमाणे फ्लॅट पश्चिम दक्षिण असता तर जास्त आनंद झाला असता.उत्तरही मोकळी मिळाली असती तर दुधात साखरच.पूर्वी तो पश्चिम दक्षिण असलेल्या फ्लॅटमध्ये राहिला होता.अशा फ्लॅटमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर वारा प्रकाश खेळत असतो.एखादी दिशा मोकळी असली,त्या बाजूला लगेच जवळ बिल्डिंग नसली, तर फारच उत्तम. थंडीमध्ये पूर्वेकडून वारा असतो.अशा जागेत जास्त थंडी वाजते.वास्तुशास्त्रानुसार पूर्वेकडील फ्लॅट चांगला असे म्हणतात. आणखीही बरेच कांही म्हणतात. त्याचा तथाकथित वास्तुशास्त्रावर फारसा विश्वास नव्हता.हा फ्लॅट पश्चिम दक्षिण होता.पश्चिमेची बाजू संपूर्ण मोकळी होती.तिथे शेती होती.फ्लॅटला लागून एक फार मोठा प्लॉट बागेसाठी मोकळा सोडला होता.तो भरपूर लांबलचक होता.त्यात जॉगिंग ट्रॅक,चिल्ड्रन्स पार्क,ज्येष्ठ मंडळींसाठी एक स्वतंत्र राखीव कोपरा,मुलाना खेळण्यासाठी भरपूर जागा,व्यायाम करणार्या मंडळींसाठी विविध सुविधा,अशा अनेक सोयी बागेच्या आराखड्यात होत्या.पुढेमागे बिल्डिंग झाली तरी ती लगेच पंधरा वीस फुटावर, जवळ, झाली नसती.वाढत्या शहराबरोबरच शेतीचे पॅनारोमिक दृश्य हरवले असते.परंतु त्याला कांही इलाज नव्हता.शहराच्या वाढीबरोबर शेती क्षेत्र कमी होत जाते.काँक्रीटचे रस्ते, काँक्रीटच्या इमारती दिवसा तापतात.उष्णता शोषून घेतात.रात्री ती उष्णता बाहेर टाकली जाते.त्यामुळे थंडावा येण्यास उशीर होतो.दिवसा व रात्री उन्हाळा जास्त जाणवतो.त्याला कांही इलाज नव्हता.वाढत्या औद्योगिकीकरणाचे,वाढत्या शहरीकरणाचे,हे अपरिहार्य
परिणाम आहेत.
त्याने पत्नीला बोलवून घेतले.तिला फ्लॅट दाखविला.तिलाही तो पसंत पडला.भाडे वाजवी होते.कांही दिवस तेथे राहावे आणि सर्व सुखसोयी पसंत पडल्या तर तो विकत घेऊन टाकावा असा विचार त्यानी केला.फ्लॅटला तीन गॅलरी होत्या.दोन शयनगृहांना दोन व हॉलला एक अश्या गॅलरी होत्या.मध्ये हॉल आणि दोन बाजूंना दोन शयनगृहे अशी रचना होती.तिन्ही खोल्या एका बाजूला पश्चिमेला होत्या.
खिडक्या उघडल्या कि पश्चिमेचे गार वारे आत शिरत असे.मनुष्य कितीही दमला असला तरी त्याचा थकवा क्षणात दूर होत असे.समोर पसरलेली हिरवीगार शेते वाऱ्यावर डोलताना पाहून मन प्रसन्न होई.शेतात सर्वत्र पाणी खेळवले असल्यामुळे त्यावरून येणारा वारा थंडगार असे.जरी गॅलरीचा दरवाजा बंद केला तरीही खिडक्यांतून येणारा वारा भरपूर असे.वारा,प्रकाश, मोकळी हवा कशालाच कमतरता नव्हती.शाम व सुधा यांच्या कल्पनेतला फ्लॅट प्रत्यक्षात त्यांना मिळाला होता.सहा महिन्यांचे पैसे त्याने अॅडव्हान्स म्हणून देऊन टाकले.शिवाय डिपॉझिटही भरले.फ्लॅटवर तो इतका खूष झाला होता कि संकुलात एकूण फ्लॅट किती त्यात भाडय़ाने किंवा विकले गेलेले किती याची चौकशी त्याने केली नाही.कांही दिवस येथे रहायचे आणि पसंत पडला तर हा फ्लॅट विकत घेऊन टाकायचा असे दोघांनी ठरवले.एवढ्या मोठ्या फ्लॅटला,त्या गावातील इतर जागा व त्यांचे भाडे लक्षात घेता,निदान दरमहा वीस हजार रुपये भाडे सहज पडले असते.हा फ्लॅट त्याला केवळ दहा हजार रुपये भाड्यात मिळाला होता.ज्याअर्थी इतकी चांगली नवी जागा इतक्या स्वस्त किमतीत मिळते त्याअर्थी त्यात कांहीतरी दोषअसला पाहिजे असा विचारही त्यांच्या मनात आला नाही.
ही जागा पाहून आईवडील मुले सर्व खूष होतील असे त्याला वाटले.ज्या अर्थी ही जागा केवळ दहा हजार रुपये भाड्यात मिळाली त्या अर्थी त्याची किंमतही कमी असेल असा अंदाज त्याला आला.स्वस्तात मिळाल्यास जागा घेऊन टाकावी असे त्याने ठरवले.ही जागा विकत घ्यायची झाली तर साधारण किती पैसे पडतील असे त्याने मध्यस्थाला विचारले.त्याने सांगितलेली किंमतही बाजारभावापेक्षा बरीच कमी होती.एवढी कमी किंमत कां?तसेच एवढे कमी भाडे कां?म्हणून त्याने विचारले.त्यावेळी तो इस्टेट एजंट म्हणाला,गावाचा झपाट्याने विस्तार होत आहे.लोकाना सर्व कांही घराजवळ हवे असते.गावात राहणाऱ्यांना दूधबाजार, भाजीबाजार, कापडबाजार, किराणा बाजार,डॉक्टर, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स,मंदिरे,शाळा,सर्व जवळच असतात.थोडे गर्दीत रहावे लागते. मोकळा वारा नसतो.घर लहान असते.घरात सुखसोयी कमी असतात.परंतु त्याची त्यांना सवय झालेली असते.त्यांच्या दृष्टिकोनातून फायदे जास्त व तोटे कमी असतात. गावाबाहेर लांब राहिल्यास तुम्हाला येण्या जाण्यात जास्त वेळ लागतो, पेट्रोल रिक्षा बस इत्यादीवर खर्च करावा लागतो.त्यामुळे लोक चटकन गावाबाहेर रहायला येण्यास तयार नसतात.या बिल्डरने फ्लॅट तर बांधले.बर्याच इमारती उभ्या केल्या. चांगली किंमत येईल असा त्याचा अंदाज होता.प्रत्यक्षात त्याचा अंदाज चुकला.कमी भाडय़ात तो जागा द्यायला तयार आहे.गावाजवळच्या नवीन इमारतींना चांगली किंमत मिळते.चांगले भाडे मिळते.ही इमारत गावापासून बरीच दूर आहे. त्यामुळे भाडे कमी,किंमत कमी, असा खुलासा त्या इस्टेट एजंटने केला.वरवर पहाता खुलासा पटण्यासारखा होता.
शाम व सुधा यांनी गाव पाहिले होते.इथे राहून प्रत्येक गोष्टीसाठी गावात जावे लागेल याचा अंदाज त्यांना आला होता.परंतु त्याचबरोबर गावाच्या विस्ताराबरोबर इतरही गोष्टी गावाबाहेर हळूहळू उपलब्ध होतात.सर्व सुखसोयी जवळच मिळू लागतात. हे त्यांना माहीत होते.कांही दिवस कदाचित त्रास सोसावा लागेल नंतर सर्व सुखसोयी इथेच उपलब्ध होतील असा विचार करून त्यांनी ती जागा तूर्त भाड्याने घेतली होती.इथे राहून आलेल्या अनुभवावर त्यांनी फ्लॅट विकत घ्यायचा की नाही ते ठरविले असते.
नोकरीच्या पूर्वीच्या गावामधून सामान वगैरे घेऊन सर्व जण नवीन फ्लॅटमध्ये रहायला आले.आईवडील मुले सर्वांना फ्लॅट एकदम पसंत पडला.कोराकरकरीत सर्व सुखसोयींनी युक्त असा फ्लॅट पाहून सर्व खूष झाले होते.समोर लांबलचक क्षेत्रात दूरवरच्या डोंगरापर्यंत म्हणजेच क्षितिजापर्यंत हिरवाई पसरलेली होती.पुढेमागे लहान मोठ्या बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या असत्या तरी पश्चिमेचा प्लॉट बागेसाठी राखीव होता.त्यात कांही झाडे होती.त्यावर पक्ष्यांची घरटी होती.सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येई.संध्याकाळी पक्षी घरट्यात आले की सर्वत्र त्यांचा आवाज ऐकू येत असे.एकूण शहरात
तर शहरात आणि खेडय़ात तर खेड्यात अशा या सर्व सोयी होत्या. शहरातील व खेड्यातील सोयींचा सुंदर मिलाफ या जागेत झाला होता.
पश्चिमेला सूर्य कलला की त्याची किरणे फ्लॅटमध्ये येत. झाडांच्या सावल्या येत.सूर्यप्रकाश व सावली यांचा खेळ चाले.पहाटे, सकाळी,संध्याकाळी व रात्री शेतकरी सोईनुसार मोट,रहाट किंवा पंप चालवीत असत.त्याचा एक संमिश्र आवाज ऐकू येई.दूरवरून पार्श्र्वसंगीतासारखा येणारा हा आवाज मन प्रसन्न करीत असे.
पूर्वेकडे जवळूनच हमरस्ता जात होता.तेथे जवळच बस स्टॉप होता.बस स्टॉप जवळच रिक्षा स्टँड होता.गावाबाहेर वाढणाऱ्या वस्तीसाठी या बसेस व रिक्षा सोयीच्या पडत असत. किंबहुना त्यासाठीच या सोयी होत्या. सकाळी सकाळी हातगाडीवरून ताजा भाजीपाला विक्रीसाठी येत असे.थोडा महाग पडे परंतु कुठेही न जाता दाराजवळ सर्व प्रकारची भाजी उपलब्ध होत असे.मुलांची शाळेची बसही तिथे येत असे. शामजवळ मोटार व स्कूटर दोन वाहने होती.शाम व सुधा परिस्थितीनुसार दोन्हींचाही वापर करीत असत.अॅपवर ऑर्डर दिली की किराणा घरपोच येई.हव्या त्या प्रतीच्या जातीच्या गव्हाचे पॅकबंद पीठ घरपोच येत असे.डॉक्टरसाठी गावात जावे लागे.नवीन मेडिकल स्टोअर जवळच उघडला होता. त्यामुळे तीही सोय झाली होती. थोडक्यात गावाबाहेर राहूनही थोडा जास्त पैसा सोडला की तुम्हाला बहुतेक सर्व सुखसोयी उपलब्ध होत होत्या.
आई बाबांना देवळात जाण्यासाठी मंदिरे लांब पडत.शामने कायमची रिक्षा लावून दिली होती.तो त्यांना ठरलेल्या वेळी गावात सोडी आणि तासाभराने पुन्हा परत घेऊन येत असे.त्यामुळे त्यांचीही सोय झाली होती.
अजून बाग अस्तित्वात यायची होती.तूर्त ती कागदावर होती.तूर्त बागेसाठी राखलेल्या मोकळ्या प्लॉटमधील पक्ष्यांचे आवाज आणि किलबिलाट यांनी मन प्रसन्न होत होते.
*समोरच प्लॉटमध्ये एक पिंपळ होता.त्याला छानपैकी पार(चबुतरा) बांधलेला होता.त्यावर जाऊन बसता येणे सहज शक्य होते. त्यामुळे आणखी नैसर्गिक वातावरणात गेल्याचा आनंद घेता आला असता.*
*वार्याबरोबर पानांची सळसळ ऐकू येत असे.खिडक्या उघडून,सर्व जण झोपत असत.*
*खिडक्यांना मजबूत ग्रिल असल्यामुळे चोरीची भीती नव्हती.पश्चिमेकडील गार वारे येत असल्यामुळे एसीची गरज तूर्त तरी भासत नव्हती.*
*एक दिवस कशाने कोण जाणे परंतु सुधाला जाग आली.*
*तिने घड्याळाकडे पाहिले.*
*रात्रीचा एक वाजला होता.*
*ती कुशीवर वळली.*
* तिची नजर सहज खिडकीबाहेर गेली.*
*समोर पिंपळाच्या शेंड्यावर कुणीतरी बसलेला होता.*
* त्याच्याकडे पाहून सुधाला हुडहुडी भरली.*
*तिचे डोळे विस्फारले.*
* तो म्हातारा टक लावून तिच्याकडे पाहात होता.*
*एक किंकाळी फोडून ती तिथेच बेशुद्ध झाली.*
(क्रमशः)
८/६/२०२२©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com