Get it on Google Play
Download on the App Store

०९ मुका १-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

गावाबाहेर इनामदारांचा वाडा निर्मनुष्य,भयाण, भकास व एकाकी असा होता.वाड्यामध्ये कुणी रहात आहे असे वाटत नव्हते.वाड्याचे दरवाजे दिवसा व रात्री सताड उघडे असत.माणसाचा पायरव कुठेही ऐकायला येत नसे.उंदीर घुशी यांनी सर्वत्र बिळे केली होती.ठिकठिकाणी वटवाघळे लटकलेली असत.इतस्ततः कोळ्यांनी जाळी विणली होती.बाहेरून व आतून वाडा जुनाट दिसू लागला होता.कुंपणाची पडझड झाली होती.वाडय़ाच्या एक दोन भिंतीही पडल्या होत्या.चिमण्यांनी वाडय़ात घरटी बांधली होती.पाली सरडे कावळे इतस्ततः फिरत असत.बाहेरून व आंतून वाडा भयाण दिसत होता.

वाड्यासभोवती रान माजले होते.जमीनीवर व झाडावर निरनिराळ्या वेली वेड्या वाकड्या वाढल्या होत्या.लहान मोठी अनेक झाडे उगवली होती.ठिकठिकाणी वारुळे उभी राहिली होती. दिवसा गुरेढोरे चरण्यासाठी बेधडक आंत येत असत.वाड्याला आता कुणी वारस राहिला नव्हता.शेतामध्ये कुणीही कांहीही पीक घेत नव्हते. लहान लहान झुडपे आणि झाडे शेतामध्येही उगवली होती.झाडांवर पक्ष्यांनी घरटी बांधली होती.वांदर इतस्ततः झाडांवरून फिरत असत.सर्व इस्टेट झपाटलेली दिसत होती.कुणीतरी जबरदस्त भूत येथे रहात असावे असे वाटत होते.भुताला पशुपक्षी चालत असत फक्त माणसांची अॅलर्जी होती असे दिसत होते.क्वचित कुणीतरी  अनोळखी वाड्यात गेला तर त्याला कुणीतरी विचित्र बाई उलटी टांगलेली दिसत असे.तिचा चेहरा भयानक होता.केस पिंजारलेले होते.सुळे बाहेर आलेले होते.हाताची नखे तीक्ष्ण वाढलेली होती.नखांनी ती त्याला फाडणार आणि नरडीचा घोट घेणार असे वाटत असे.चेहरा रागीट  दुसऱ्याला खाऊ कि गिळू असा होता. कधी कधी ती आंत येणाऱ्यांच्या पुढ्यात दणकट उडी मारीत असे.तिच्या नुसत्या दर्शनाने बुडाला पाय लावून आंत जाणारा पळत बाहेर येत असे.   

आगरात शिरून झाडांवरील फळे तर दूरच राहिली काडीसुद्धा उचलण्याची कुणाची हिंमत नव्हती.चोरी करणाऱ्याला काय दिसेल व त्याचे काय होईल याची कांहीच शाश्वती नव्हती.चोरी करणाऱ्याला कधी झाडावरून ढकलून दिले जाई.कधी त्याचे हात पोळत.कधी त्याला कुणीतरी उलटय़ा पायांची, केस पिंजारलेली,भयानक दात विचकलेली बाई दिसे.कंपाउंडमध्ये जाऊन आलेल्याची कधी दातखिळी बसे.कधी तो तापाने फणफणत असे.कधी कुंपणाबाहेर आल्या आल्या तो बेशुध्द होत असे. कधी त्याचा हात पाय मोडलेला असे. त्याने काय पाहिले,असा त्याला कोणता अनुभव आला,ते सांगायलाही तो तयार नसे.

लोकांना त्या वाडय़ाची  अशी दहशत बसली होती कि कम्पाउंडमध्येच काय परंतु त्या बाजूलाही जायला कुणी तयार नसे.कुंपणापासून दहा फूट अंतर राखूनच लोक जात असत.एकटा दुकटा कुणी वाड्याच्या  आसपासही फिरकत नसे.वाड्याला वारस नसल्यामुळे वाडा व सर्व इस्टेट सरकारजमा झाली होती.कांही दूरचे वारस होते.परंतु त्यांची त्या वाड्यावर, त्या मालमत्तेवर,हक्क सांगण्याची हिंमत नव्हती.सरकारने वाडा ताब्यात घेतल्यावर तो वापरात आणण्याचा प्रयत्न केला.मालमत्तेची देखभाल करण्याचाही प्रयत्न केला.त्यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याचा प्रयत्न केला.जे जे कामगार व शासकीय अधिकारी तिथे जात ते पुन्हा तिथे जायला तयार होत नसत.शेवटी ती सर्व मालमत्ता वर वर्णन केल्याप्रमाणे ओसाड राहिली होती.वाड्यात राहणारी  हडळ किंवा जे कुणी होते ते कधी सोडून जाईल कांही सांगता येत नव्हते.वाडा तथाकथित हडळ मुक्त झाल्याशिवाय तो व इतर इस्टेट वापरात आणणे शक्य नव्हते.   

हल्ली त्याची अशी वाताहात झाली असली तरी  एकेकाळी तो वाडा गजबजलेला होता.इनामदारांचे वंशज हेमाद्रीपंत व त्यांचा मुलगा नवीनचंद्र तिथे राहत असत.हेमाद्रीपंतांच्या पत्नीचे निधन झाले होते.नवीनचंद्रचे लग्न झाले होते.त्याची पत्नी सौदामिनी अशीच खानदानी इनामदार वंशातील होती.वाडा तीन मजली होता.नोकरचाकर यांना राहण्यासाठी वाड्याबाहेर लांबलचक क्वार्टर्स बांधल्या होत्या.आला गेला पाहुणा रावळा यासाठी तिसऱ्या मजल्यावर वीस खोल्या होत्या.नोकरचाकर  नातेवाईक पै पाहुणा यांनी वाडा गजबजलेला असे.भद्रावतीचे इनामदार म्हणून हेमाद्रीपंत यांना ओळखले जाई.कोणे एकेकाळी त्यांच्या मूळ पुरूषाला मर्दुमकी गाजवल्यामुळे खास पेशव्यांकडून भद्रावती व आसपासच्या  पंचवीस गावांची इनामदारी मिळाली होती.

ही भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यातील नाही.हे गाव सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्र व कर्नाटक आणि गोवा यांच्या सीमेवर महाराष्ट्रात आहे.स्वातंत्र्य मिळाले वतने नष्ट करण्यात आली.हेमाद्रीपंतांची  वंशपरंपरागत चालत आलेली   इनामदारी गेली.थोड्याच वर्षात   वृद्धत्वामुळे हेमाद्रीपंत यांचा मृत्यू झाला.इनामदारी गेल्यावर वाडा आणि त्याभोवतीचा फक्त वीस पंचवीस एकरचा प्रदेश हेमाद्रीपंतांच्या मालकीचा राहिला. इनामदारीबरोबर उत्पन्नही गेले. रुबाबही गेला.उत्पन्नाबरोबरच नोकरचाकर नातेवाईक यांना निरोप द्यावा लागला.वाड्याची रया गेली.

साफसफाई झाडफेड होत नाही म्हणून वरचे मजले बंद करण्यात आले.फक्त तळमजला वापरात होता.तरीही संचित धन भरपूर होते.वाड्या सभोवतील  पंचवीस एकरमध्ये असलेली शेती व विविध प्रकारची झाडे यापासून मिळणारे उत्पन्न एका कुटुंबाला भरपूर होते.नवीनचंद्र व सौदामिनी यांचा जोडा अनुरूप होता.दुर्दैवाने त्यांना मूलबाळ नव्हते.तेवढी एक उणीव सोडली तर सर्व कांही छान होते.इनामदारी नष्ट झाली असली, आसपासच्या गावात असलेला दबदबा नाहीसा झाला असला, उत्पन्नात प्रचंड घट झाली असली, तरी जे कांही थोडेबहुत उरले होते त्यात नवीनचंद्र व त्याची पत्नी सौदामिनी सुखाने राहात होती.मूल होण्यासाठी त्यांनी डॉक्टरी, वैद्यकीय,दैवी प्रयत्न करून पाहिले. दुर्दैवाने सर्व प्रयत्न फसले.त्यांना यश मिळाले नाही.नवीनचंद्र व सौदामिनी त्यामुळे दोघेही निराशेच्या छायेत होती.मूलबाळ नसल्यामुळे त्यांच्या जगण्याला अर्थ राहिला नव्हता.दत्तक घेण्याचा त्यांचा विचार होता .परंतु तो अजून कार्यवाहीत आला नव्हता.   

अशावेळी नर्तकी सारिका नवीनचंद्रच्या आयुष्यात आली.नृत्य हा तिचा व्यवसाय होता.लोकांना नादी लावणे हा तिचा उपव्यवसाय होता.किंवा कदाचित याच्या उलटही म्हणता येईल.कांही  कामासाठी नवीनचंद्र जवळच्या शहरात गेला होता.तिथे मित्रांच्या आग्रहास्तव तो सारिकेचे नृत्य पाहायला गेला.त्या दिवशी मित्रांबरोबर तो परत आला.दुसऱ्या दिवशी एकटाच तो तिला भेटायला गेला.त्यानंतर त्याच्या शहरात वारंवार चकरा होऊ लागल्या. हल्ली शहरात एवढे काय काम असते असे सौदामिनीने विचारले.त्यावर त्याने कांहीतरी थातूरमातूर उत्तर दिले.सहज मित्रांनाही  भेटायला जातो असे उत्तर दिले.

एके दिवशी तो सारिकेला घेवून वाड्यावर आला.सौदामिनी जे उडत उडत ऐकत होती ते खरे होते असे तिच्या लक्षात आले.सौदामिनीने विरोध करण्याचा प्रयत्न केला.परंतु नवीनचंद्र सारिकेपायी वेडा झाला होता.सौदामिनीचे ऐकूनच घ्यायला   तो तयार नव्हता.सारिकेने त्याला पूर्णपणे कह्यात घेतले होते. तिच्यावरील तथाकथित प्रेमापुढे त्याला दुसरे कांहीही ऐकू येत नव्हते.कांही दिसत नव्हते.   एकेकाळी सौदामिनी त्याची लाडकी होती.सौदामिनीला तो माहेरी जाऊसुध्दा देत नसे.आता सौदामिनी  घरात राहिली काय आणि  नाही राहिली काय सर्व त्याला सारखेच होते.तिच्याकडे त्याचे पूर्णत: दुर्लक्ष होते.      

सौदामिनीपुढे दोन पर्याय उपलब्ध होते.पहिला पर्याय माहेरी सरळ निघून जाणे.दुसरा पर्याय जे कांही चालले आहे तिकडे कानाडोळा करणे.तिसरा पर्याय होता.येनकेनप्रकारेण सारिकेचा काटा काढणे.तिला अशी नाही तर तशी दूर करणे.हा पर्याय अजून सारिकेच्या डोक्यात आला नव्हता.सौदामिनीच्या माहेरी आता तिचे आई वडील नव्हते.भावाचे व वहिनीचे राज्य होते.त्यांचीही इनामदारी गेली होती.तिचे दु:ख त्यांनी कितपत समजून घेतले असते प्रश्नच होता.चार शब्द नवीनचंद्राला समजून सांगण्याऐवजी त्यांनी सौदामिनीला आपला नवरा सांभाळता येत नाही म्हणून दोष दिला असता.एकंदरीत सारासार विचार करता माहेरी जाण्यात विशेष अर्थ नव्हता.

तिला तिचे दु:ख   कुणालाच सांगता येत नव्हते.नवीनचंद्र व सारिका यांचे प्रेमाचे चाळे तिला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत होते.दिवसेंदिवस सारिका तिच्या डोक्यात जाऊ लागली होती.आणि शेवटी ती रात्र उजाडली.रात्रीचे बारा वाजले होते.सारिका नाचाच्या ऐनभरात आली होती.कोणत्या तरी सिनेमातील एक रेकॉर्ड वाजत होती.त्या गाण्याच्या तालावर नवीनचंद्र व सारिका यांचे प्रेमाचे चाळे चालले होते.हे सर्व बाहेर दिवाणखान्यात चालले होते.नवीनचंद्र त्याच्या खोलीत क्वचितच असे.तो सारिकेच्या खोलीत लोळत पडलेला असे.   सौदामिनी आपल्या खोलीत होती.गाण्याचे व सारिकेच्या पदन्यासाचे आवाज तिच्या कानात तप्त सळईप्रमाणे  घुसत होते.तिला होणार्‍या मानसिक वेदना असह्य झाल्या होत्या.रागाच्या भरात ती ताडताड नाच चालला होता त्या खोलीत आली.     

*सौदामिनीने सारिकेला वाड्यावरून ताबडतोब आताच्या आतां निघून जा असे फर्मावले.*

*नवीनचंद्रने सौदामिनीला तूच निघून जा असे सांगितले.त्यावर मी या वाड्याची मालकीण आहे.मी कां म्हणून निघून जाऊ असा प्रतिप्रश्न तिने केला.*

*नवीनचंद्र व सौदामिनी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.*

*शेवटी रागाच्या भरात कोपऱ्यात उभा केलेला सोटा हातात घेऊन नवीनचंद्रने सौदामिनीच्या डोक्यात मारला.*

*वर्मी मार लागल्यामुळे सौदामिनी तिथल्या तिथे रक्ताच्या थारोळ्यात आडवी झाली.बहुधा ती तिथल्या तिथे मृत झाली असावी.*

*कशी कोण जाणे डोके फुटलेली, रक्ताने लडबडलेली, सौदामिनी ताडदिशी उभी राहिली.*

*नवीनचंद्र तिच्याकडे विस्फारित नजरेने पाहत होता.*

*त्याच्या हातातील सोटा हिसकावून घेऊन तिने तो सारिकेच्या डोक्यात मारला.सारिका तिथेच ढेर झाली.*

*दुसऱ्याच क्षणी सौदामिनी सारिकेच्या शरीरात शिरली होती.सौदामिनीचे धड धाडदिशी खाली पडले.*

*सारिकेच्या शरीरात सौदामिनी शिरल्यावर ती ताडकन उभी राहिली.तिच्या शरीरात   शिरलेल्या सौदामिनीने तोच सोटा नवीनचंद्रच्या डोक्यात मारला.*

*तीन प्रेते जमिनीवर आता पडली होती.अासमंत स्तब्ध होते.*

*दिवे भगभगत होते. कुणीतरी पोलिसांना कळवल्यावरच पोलिस येणार होते.*

(क्रमशः)

१२/७/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com