पिगी बँक
एका रविवारच्या दुपारी प्रिया आणि सागर रवीबरोबर कंपोस्टच्या खड्ड्यातून खत काढून झाडांना घालायला मदत करत होते. सागरमुळे प्रियाला हि फुलझाडांची मशागत करायची आवड निर्माण झाली होती. रवी म्हणाला, “या खड्ड्यात आपण जो काही ओला कचरा टाकतो त्याचं उपयोगी खत तयार होतं आणि ते झाडांना घातलं कि, झाडं मस्त तरारतात... छान फळ-फुलं देतात...!”
प्रिया हे ऐकून आपल्या घरी पळत गेली आणि तिने घरातून आपली पिगी बँक आणली आणि ते आता हाताने खड्डा खणू लागले होते.. एक छोटा खड्डा खणून तिने आपली पिगी बँक त्यात टाकली.
सागर म्हणाला, “अगं प्रिया... तू आपली पिगी बँक यात का टाकलीस?”
सागर पंधरा-सोळा वर्षांचा झाला होता. पण त्याची बुद्धी पाच वर्षांच्या मुलापेक्षा जास्त नव्हती...!
“अरे पिगी बँक जमिनीत पेरत आहे, कारण त्यात खूप पैसे आहेत. बाहेर ठेवलं तर कोणीतरी चोरू शकतो. म्हणूनच मी ते इथे सुरक्षित ठेवत आहे.” प्रिया ने सागरला समजावून सांगितले आणि पिगी बँक मातीने झाकली.
"म्हणजे आता पिगी बँक मधले पैसे सुरक्षित राहतील? त्यांना इथून कोणी बाहेर काढणार नाही?” सागरने निरागसतेने पुन्हा नव्या प्रश्नांचा भडीमार केला.
"नाही कुणीच बाहेर काढू शकत नाही... कारण हे फक्त तुझ्या आणि माझ्यात आहे... मी कोणालाही सांगणार नाही, तू ही गुपित कोणाला सांगशील का?" प्रियाने आपले हात कमरेवर ठेवून अधिकारवाणीने विचारलं.
“नाही... तू नाही सांगणार तर मी ही सांगणार नाही. पक्कं प्रॉमिस” सागर ठामपणे म्हणाला.
"सागर, तुला माहितीये जेव्हा आपण दोघे ही कोणाला सांगणार नाही तोपर्यंत कोणीही आपले पैसे बाहेर काढणार नाही. ते इथे सुरक्षित असतील.” प्रिया आनंदाने म्हणाली.
सागरलाही आनंद झाला आणि त्याने स्मित हास्य केलं आणि लाजून आपल्याच विचारात गुंतला.
दोघांची हि निरागसता पाहून रवीच्या डोळ्यात पाणी तरारले. त्याला आशाची आठवण आली.