Get it on Google Play
Download on the App Store

०८ मुक्तता १-२

(ही गोष्ट काल्पनिक आहे नाव स्थळ इत्यादीमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

समोर पडलेल्या दामोदराच्या प्रेताकडे पाहावत नव्हते.त्याचे डोके फुटून रक्ताच्या धारा चालल्या होत्या .आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारलेले वाटत होते.

हेमांगीने त्याच्या पत्नीने फोन उचलला आणि त्यांच्या विभागातील पोलिस स्टेशनचा नंबर फिरविला .पलीकडून हॅलो असे येताच तिने इथे माझ्या नवऱ्याचा खून झाला आहे .ताबडतोब या असे सांगितले . पलीकडून पत्ता विचारताच तिने तिचा पत्ताही सांगितला .आम्ही निघालो असे पोलिसांचे शब्द ऐकल्यानंतर मटकन ती खाली बसली.

तिच्या डोळ्यासमोर दामोदर बरोबर घालवलेले दहा वर्षांचे आयुष्य उलगडत होते . दहा वर्षांपूर्वी हेमांगीचे दामोदरबरोबर लग्न झाले होते .हेमांगीचे फारसे शिक्षण झाले नव्हते. तिचा नवरा दामोदर एका फॅक्टरीत नोकरीला होता .त्याच्या तुटपुंज्या पगारात दोघांचे भागण्यासारखे नव्हते.मदत म्हणून तिने धुणीभांडी करण्याला सुरुवात केली.त्यावेळी ती एका झोपडपट्टीत राहत होती.लग्नापूर्वी तिच्या आईबरोबर ती धुणीभांडी झाडू पोचा करण्यासाठी जात असे.त्या कामाची तिला सवय होतीच .झोपडपट्टीतच तिचा जन्म झाला होता .लग्न होऊनही ती झोपडपट्टीतच आली होती .

ज्या घरी ती कामाला जात असे तेथील ब्लॉक बघून तिला आपलाही असाच ब्लॉक असावा असे वाटत असे. आपल्या दोघांच्या तुटपुंज्या उत्पन्नात ते शक्य नाही याची तिला जाणीव होती. 

तिच्या हाताला चव होती .ती स्वयंपाक उत्तम करीत असे.ती जिथे धुणी भांडी करीत असे तिथे मालकीण एक दिवस आजारी पडली.त्यांना स्वयंपाक करणे अशक्य होते .मी तुला दाखविते असे म्हणून, बाईनी स्वयंपाकगृहात खुर्चीवर बसून, तिला जसा जमेल तसा स्वयंपाक कर म्हणून सांगितले.तिने उत्तम स्वयंपाक केला. त्या बाईनी धुणीभांडी करण्यासाठी दुसरी बाई लावली.  हेमांगी तेव्हापासून त्यांच्याकडे स्वयंपाक करू लागली .त्यांच्या ओळखीने आणखी दोन तीन घरात तिला स्वयंपाक करण्याचे काम मिळाले .ती सकाळी घरचा स्वयंपाक करून बाहेर पडत असे .दुपारी एक पर्यंत तीन चार जणांकडे स्वयंपाक करून नंतर घरी येत असे .काही ठिकाणी पूर्ण स्वयंपाक असे तर काही ठिकाणी नुसत्या पोळ्या  असत. तिला बऱ्यापैकी पैसा मिळत असे.

झोपडीत न राहता ब्लॉकमध्ये राहायला जावे असे तिला उत्कटतेने वाटतच होते . आता आपली ती इच्छा पुरी होईल असे तिला दिसू लागले .दोघांचा ब्लॉक असावा या विचाराशी तिचा नवरा सहमत होताच. ती व तिच्या नवऱ्याने पै पै करून पैसा साठविला आणि एक दिवस ती ब्लॉकमध्ये राहायला आली .ब्लॉक छोटासाच होता वनरूम किचन एवढाच होता.तिने तो छानपैकी हौशीने सजविला होता. 

तिने दुसऱ्यांकडे स्वयंपाकी म्हणून जाण्याऐवजी घरीच डबे द्यायला सुरुवात केली.कुठेही न जाता तिला घरच्या घरी उत्तम उत्पन्न मिळू लागले .वाढता वाढता पंचवीस तीस डबे ती निरनिराळ्या घरी पोचवू लागली .पोचवू लागली म्हणजे  ती स्वतः जात नसे त्या कामासाठी तिने एक पोऱ्या ठेवला होता .दिवसेंदिवस तिची भरभराट होत होती. 

ती व दामोदर दोघेही समाधानकारक  उत्पन्न मिळवीत होती .त्यांना एक मुलगाही झाला होता .असे सर्व छान चालले असताना त्यात माशी शिंकली . त्यांच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली .

फॅक्टरीतील मित्रांबरोबर तिचा नवरा हळूहळू वाहू लागला. त्यांच्या संगतीने त्याला निरनिराळे नाद लागले.बाई बाटली जुगार सर्व काही सुरू झाले .तिने त्याचे व्यसन सुटण्यासाठी अनेक  प्रयत्न केले.प्रयत्नांना विशेष यश आले नाही .दिवसेनदिवस त्याचा बेतालपणा वाढतच चालला .

ब्लॉक नवर्‍याच्या नावावर घेतला गेला होता .त्याच वेळी दोघांचे नाव लावणे आवश्यक होते . दुर्दैवाने ते राहून गेले .दामोदर एका सटवीच्या ,बाईच्या मागे इतका वाहावत गेला की त्याने हेमांगीला एक दिवस तू या घरातून निघून जा मला तिला आणून ठेवायचे आहे असे सांगितले . 

हेमांगीवर अक्षरशः आकाश कोसळले.त्याच्या व्यसनापायी ती कंटाळली होतीच.आज ना उद्या त्याचे व्यसन सुटेल अशी तिला आशा होती .ती आशाही हळूहळू मावळत चालली होती .त्याला कुणीतरी बाईने नादी लावले आहे याची तिला बरेच महिने कल्पना नव्हती.एक दिवस तिला तिच्या मैत्रिणीकडून ते कळले.

.दामोदरने एक दिवस तिला सांगितले. मला सुंदरीला(त्या बाईचे नाव ) इथे आणायचे आहे .एका म्यानात  दोन तलवारी मावत नाहीत. तू ताबडतोब जागा सोड. माझ्या घरातून निघून जा.

दामोदर तर हातचा गेला होता .तिचे दामोदरवर प्रेम होते.तो बाईच्या नादी लागला हे कळल्यावर तिला मोठा धक्का बसला होता .तरीही ती नेटाने स्वयंपाक करून डबे पोहोचवीत असे .  तेव्हापासून तिने बचत करून बँकेत पैसे साठवायला सुरुवात केली होती.दामोदरच्या भानगडी घरापर्यंत  येतील असे तिला वाटले नव्हते.

मी घरातून जाणार नाही तुमच्या इतकेच हे घर माझे आहे असे तिने दामोदरला ठणकावून सांगितले .तुमच्यापेक्षा मी जास्त पैसे ब्लॉकसाठी भरले आहेत असेही सांगितले.दामोदरने ते काहीही असो मी तुला घटस्फोट देणार आहे.घर माझ्या नावावर आहे तुला घर सोडावे लागेल म्हणून सांगितले .

मी जाणार नाही असे तिने ठणकावून सांगितले . त्यावरती तो हमरीतुमरीवर आला .हमरीतुमरी वरून हाणामारीवर आला. तिची ताकद त्याच्या पुढे अर्थातच कमी पडत होती.

मारामुळे अंग दुखत असतानाही  ती स्वयंपाक करीत होती .डबे पोचवीत होती.ती पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होती.तिला एका घराची गरज होती.जिथे ती स्वयंपाक करून डबे पोचवू शकेल.

ती जर भाड्याच्या घरात पैसे असल्यामुळे जाऊ शकली असती तर काहीच प्रश्न नव्हता.दामोदरला सोडून ,भांडीकुंडी गॅस घेऊन, मुलासकट  ती त्या जागेतून निघून गेली असती.

तिने दामोदरला  मी ब्लॉकमध्ये दिलेले पैसे मला दे .मी दुसरीकडे राहायला जाईन असे सांगितले. कुठले पैसे? कसले पैसे? ब्लॉक माझा आहे. कायदेशीररित्या मी मालक आहे.मला आठ दिवसांत ब्लॉक रिकामा पाहिजे असे सांगून त्याने तिला धमकाविले .

तिचे दामोदरवर अजूनही प्रेम होते .त्या प्रेमाची तर आता वाट लागली होतीच.दामोदर बळाच्या जोरावर तिला घराबाहेर काढू शकला असता .दुसरीकडे जागा भाड्याने घेण्याइतकासुध्दा पैसा तिच्याजवळ नव्हता .गॅस भांडीकुंडी इथपासून सर्व तयारी तिला करावी लागली असती .शिवाय तिला मुलाकडेही पाहावे लागले असते.तिच्याजवळ पैसा नव्हता. मिळालेला सर्व पैसा तिने ब्लॉक घेण्यात,सजविण्यात खर्च केला होता.

ती सर्व बाजूनी वेंगली होती.जागा ,गॅस, भांडीकुंडी, इथपासून तिला सर्व पाहावे लागणार होते .काय करावे असा मोठा प्रश्न तिच्या समोर उभा होता .ती विचारात हरवली होती .तिच्यासमोर दामोदर बरोबरचे सर्व आयुष्य उलगडत होते .

समोर दामोदराचे प्रेत होते.वेळ सकाळची होती.तिचा मुलगा अजून झोपलेला होता . 

बाहेर पोलीस सायरनचा अावाज आला. आणि ती तिच्या आठवणीतून जागी झाली.

(क्रमशः)

२/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन