Get it on Google Play
Download on the App Store

०४ दुष्ट व नीच ३-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

लक्ष्मण, ऊर्मिला  व त्यांची मुले एसटीच्या लाल डब्यात बसून मुंबईला परत आली.

मुंबईत आल्या आल्या उर्मिला तिच्या भावाला भेटली.तिने रामबद्दल सर्व हकिगत त्याला सांगितली.

रामचे वाटोळे कसे करता येईल याची युक्ती तिने त्याला विचारली.

तिचा भाऊ जारणमारण करण्यात, भूत उठवून ते एखाद्यावर सोडून त्याचे वाटोळे करण्यात वाकबगार होता.

त्याचा तो धंदाच होता.त्याने त्यासाठी काय काय करावे लागेल त्याची एक यादीच बहिणीजवळ दिली.बराच खर्च येणार होता.अकरा बोकड  काम झाल्यावर देण्यात येतील असे देवीला वचन द्यावे  लागणार होते.या वचनाचा भंग होऊन चालणार नव्हता.त्यासाठी बोकड खरेदी करून त्यांच्या अंगावर कुंकू पिंजर शिंपडून  ते एका रांगेत बांधून ठेवावे लागणार होते.काम होताच त्यांचा बळी जाणार होता.कामाच्या   प्रत्येक टप्प्यावर एकेक बोकडाचा बळी देण्यात येणार होता . 

सर्व खर्च जवळजवळ पंचवीस हजार रुपये येणार होता.जर बोलल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या नाहीत तर केलेले चेटूक स्वतःवर उलटले असते.त्यामध्ये वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणांना धोका होता.त्याने बहिणीला नीट विचार करून ठरव.इतका खर्च तुला झेपेल का त्याचा विचार कर.असे निक्षून सांगितले.जर ठरविल्याप्रमाणे देवीला नैवेद्य दाखविला गेला नाही तर देवी कोपेल आणि हे सर्व आपल्यावर उलटू शकते हे लक्षात घेऊन काय करायचे ते ठरव.

उर्मिलेला पांच हजार रुपयेसुद्धा एकरकमी उभे करणे कठीण जाणार होते.तिथे ती आवश्यक असलेले पंचवीस हजार रुपये कसे उभे करणार होती?चोरी करीन स्वतःला विकीन परंतु रामचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही असा पण तिने केला होता.मागचा पुढचा विचार न करता तिने तिच्या भावाला तू देवीला वचन दे देवीला साकडे घाल.रामचे वाटोळे होईल याची व्यवस्था कर असे सांगितले.तिच्या भावानेही मागेपुढे न पाहता देवीला साकडे घातले.जबरदस्त भूत उठवून ते रामच्या मागे सोडले.

प्रवास करून आल्यावर राम आजारी पडला.बहुधा प्रवासाचा त्रास झाला असेल, ठिकठिकाणी पाणी बदलले त्याचा परिणाम झाला असेल,चार दिवस गेले की सर्व कांही ठीक होईल असा विचार सर्वांच्या  मनात आला.डॉक्टरांनी तपासले किरकोळ ताप आहे असे सांगितले

चार दिवस झाले आठ दिवस झाले

ताप उतरत नव्हता.रामला अशक्तपणा वाटू लागला होता.डॉक्टरांनी त्याच्या सर्व तपासण्या केल्या.कुठेच कांही दोष दिसत नव्हता.रामला बरे मात्र वाटत नव्हते.डॉक्टर बदलण्यात आले.स्पेशॅलिस्टांचे मत घेण्यात आले.रोगाचे निदान होत नव्हते. 

सीता विचार करू लागली होती.राजापूरच्या गंगेच्या ठिकाणी जेव्हां तिला तिची जाऊ ऊर्मिला भेटली,तेव्हां तिच्या डोळ्यात दिसलेली चमक तिला आठवत होती.तिचा दुष्टपणा तिला आंत कुठेतरी जाणवला होता.ही बाई सुधी नाही. उलटय़ा काळजाची आहे.हे तिला खोलवर जाणवले होते.ती आपल्या श्रीमंतीवर वैभवावर जळते हे तिच्या लक्षात आले होते. 

नेहमीच्या मार्गाने रामला बरे वाटणार नाही हे तिच्या लक्षात आले.तिच्या ओळखीचे एक साधुपुरुष होते.ती त्यांना जाऊन भेटली.त्यांनी ध्यान लावल्यावर त्यांना सर्व गोष्टी लक्षात आल्या.त्यांनी तिला तिच्या जावेने रामच्या अकल्याणासाठी काय केले आहे ते सांगितले. 

यावर सीतेने उपाय विचारला.ते साधुपुरुष म्हणाले मी असल्या भानगडीत पडत नाही.असल्या गोष्टींमध्ये तरबेज पारंगत असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे तुला जावे लागेल.तिने अशा एखाद्या व्यक्तीचे नाव विचारले.त्यांनी भानुदास नावाच्या एका व्यक्तीचे नाव सुचविले.सीता त्यांच्याकडे गेली.

भानुदासने आवश्यक त्या सर्व तपासण्या,चौकशी,इत्यादी गोष्टी केल्या.तिच्या जावेने इतका पक्का बंदोबस्त केला आहे की त्यांत आपण कांहीच करू शकत नाही असे त्याने सांगितले.निराश व नाउमेद होवून सीता घरी परत आली.रामच्या कल्याणासाठी तो बरे व्हावा म्हणून काय करावे ते तिला समजत नव्हते.भानुदासने तिला आशेचा एकच किरण दाखविला होता.जर तिची जाऊ तिने दिलेले वचन पूर्ण करू शकली नाही तर ती सर्व गोष्ट तिच्यावर उलटेल.तिचा सर्वनाश होईल.

सीतेने विचारले तिचा सर्वनाश मला अभिप्रेत नाही.तिने वाईट केले म्हणून तिचे वाईट व्हावे असे मला वाटत नाही.मला माझा राम बरा व्हायला पाहिजे.भानुदासने तिला सांगितले,मी प्रयत्न करतो परंतु मला खात्री देता येत नाही.एकूण परिस्थिती बिकट होती.उर्मिला तिचे वचन पुरे करू शकली नाही तर तिचे वाटोळे होणार होते.रामचे कल्याण होईल की नाही ते सांगता येत नव्हते.

भानुदासने एक उपाय सुचविला.महामृत्युंजय मंत्राचा जप शंकरच्या पिंडीसमोर बसून सकाळ व संध्याकाळ किमान एक शे आठ वेळा करावा.जर शक्य झाले तर त्याच्या पटीमध्ये सकाळी व संध्याकाळी करावा.त्यामुळे एक प्रकारचे कवच राम सभोवार निर्माण होईल.भोले शंकरच्या मनात असेल तर राम वाचेल.याशिवाय दुसरा कोणताही उपाय सुचत नाही.भानुदासच्या म्हणण्यानुसार सीतेने सकाळ संध्याकाळ जपाला सुरुवात केली.डॉक्टरी उपाय चालले होते.डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करीत होते.आता सर्वकांही परमेश्वरावर   दैवावर अवलंबून होते.  

इकडे उर्मिलेला टप्प्याटप्प्याने देवीला(भुताला)दिलेले वचन पूर्ण करायचे होते.त्यासाठी पैसा पाहिजे होता.तिच्याजवळ ना दागदागिने होते.ना बँकेत पैसा होता.तिला कुणाकडून कर्ज मिळेल अशीही शक्यता नव्हती.ती तिच्या दुर्दैवाने व रामच्या सुदैवाने आवश्यक तो पैसा उभा करू शकली नाही. अकरा बोकडांची देवीला वाहण्यासाठी अपेक्षित माळ, ती उभी करू शकली नाही. तिने केलेले गारुड,तिने केलेले चेटूक, तिने सोडलेली भुतावळ, वचनपूर्तीच्या अभावी तिच्यावरच उलटली.तिची एक मुलगी अपघातात दगावली.दुसरी तापाचे निमित्त होऊन गेली.लक्ष्मणला कारखान्यामध्ये काम करीत असताना जीवघेणा अपघात झाला आणि त्यांत त्याचा मृत्यू झाला.उर्मिलेच्या डोळ्यांसमोर या सर्व गोष्टी घडल्या.दुसर्‍याचे वाईट चिंतिले, दुसर्‍याचे वाईट करायला गेले की त्याचे काय परिणाम होतात ते तिला समजले.तिचा सर्व नाश झाल्यावर हे समजून कांहीच उपयोग नव्हता.सैरभैर अवस्थेत रस्त्याने जात असताना तिला अपघात झाला

त्यात तिचा एक पाय गेला.तिला आता जन्मभर खुरडत चालावे लागणार होते.ती आता मरेपर्यंत पश्चातापाच्या आगीत जळत रहाणार होती.तिच्या हव्यासापायी तिचा नवरा ,व तिच्या मुली यांचा निष्कारण बळी गेला.नाहीतरी असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशी म्हणच आहे.उर्मिलेशी लग्न करताना असंगाशी संग होत आहे याची लक्ष्मणला कल्पना नव्हती.एकेकाचे भोग असतात, एकेकाचे दैव असते हेच खरे

इकडे महामृत्युंजय मंत्र व सीतेची कठोर साधना यामुळे राम वाचला.सीतेने रजा काढली होती.सकाळीच शुचिर्भूत होऊन ती शंकरच्या पिंडीसमोर बसत असे.सातत्याने महामृत्युंजय मंत्राचा जप करीत असे.जेव्हां ती पिंडीसमोर नसे त्या वेळीही तिच्या तोंडाने महामृत्युंजय मंत्राचा जप चालू असे.

कुणी म्हणेल उर्मिला तिचे वचन पूर्ण करू शकली नाही म्हणून राम वाचला.कुणी म्हणेल सीतेच्या महामृत्युंजय मंत्राच्या प्रभावामुळे आणि कठोर तपश्चर्येमुळे राम वाचला.कुणी म्हणेल डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे राम वाचला.कुणी म्हणेल या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून राम वाचला.तर एखादा म्हणेल रामचे दैव बळकट होते. त्याच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून तो वाचला.कांहीही असो राम वाचला एवढे खरे.  

उर्मिलेच्या बाबतीतही विविध मते असू शकतील.

ऊर्मिलेच्या दुष्टपणाचे व नीच मनोवृत्तीचे तिला पुरेपूर फळ मिळाले.

उर्मिलाने तिच्या भावाचा उपयोग धनलाभासाठी न करता तिच्या दुर्दैवाने रामच्या सर्वनाशासाठी केला.बळी वगैरे  देवून धनलाभ किती प्रमाणात झाला असता याबद्दल शंकाच आहे.

सुदैवाने राम सर्वनाश होता होता वाचला.आणि उर्मिलेलाच सर्वनाशाला तोंड द्यावे लागले.

*जो दुसर्‍याचा सर्वनाश करायला जातो त्याचाच कधीकधी सर्वनाश होतो तो असा.*

*कोकणात एक म्हण आहे "केले तुका झाले माका".तसे झाले.*

*दुसऱ्याच्या  पायावर धोंडा पाडता पाडता तो निसटून आपल्याच पायावर पडतो तो असा.*

*दुसऱ्याच्या पायावर कुऱ्हाड मारता मारता ती आपल्याच पायावर बसते ती अशी.*

*उर्मिलेचे भरकटलेले तारू शेवटी खडकावर आपटून फुटले.*    

(समाप्त)

२३/१२/२०२१©प्रभाकर  पटवर्धन