०३ दुष्ट व नीच २-३
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
कांहीतरी करून अकस्मात आपल्याला धनलाभ व्हावा अशी तिची इच्छा होती.
तिचा भाऊ अशा कामांमध्ये तरबेज होता.
त्याच्या मदतीने वाट्टेल ते करून प्रसंगी एखाद्या लहान मुलाचा किंवा मुलीचा बळी देऊन आपण आपले ईप्सित साधावे,असा ऊर्मिलेचा विचार होता.
लक्ष्मणचा भाऊ राम याला बळी पडेल अशी कोणाचीच कल्पना नव्हती.
सुरुवातीचा तिचा विचार आपल्या भावाच्या मदतीने धनलाभ करून घ्यावा रामची बरोबरी साधावी असा होता.धनलाभाच्या दिशेने जाणारे तिचे तारू(जहाज) अकस्मात भरकटले आणि भलत्याच दिशेने गेले.
भुताला, सैतानाला, वेताळाला, वश करून घेणे व त्यामार्फत आपली वाईट कामे करून घेणे या गोष्टी कमी जास्त प्रमाणात सर्व प्रदेशात चालतच असतात.अशा गोष्टींमध्ये वाकबगार असलेले लोक असतातच.उर्मिलेचा भाऊच अशा गोष्टी करीत असे.जारण मारण क्रिया,त्यासाठी एक किंवा अनेक बोकडांचा बळी देणे, लहान मुलाचा बळी, लहान मुलीचा बळी,इत्यादी गोष्टी करून देवीला कौल लावून तो वाईट कामे करीत असे.अजून तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडला नव्हता.अशावेळी देवी देव असा शब्द वापरला जातो परंतु प्रत्यक्षात त्या अशुभ शक्ती असतात.त्यांच्या वापराने कदाचित कांही काळ भले होतही असेल परंतु दीर्घकाळ कल्याण होऊ शकत नाही.कडू बीज रुजत घातले तर त्याला मधुर फळे कशी येतील.
राम केंद्र सरकारच्या नोकरीत होता.त्याची सर्व भारतभर कोठेही बदली होत असे.रामची हल्ली मध्यप्रदेशात नेमणूक झाली होती.लक्ष्मण मुंबईत झोपडपट्टीत रहात होता.दोघेही मूळचे कोकणातील मालवण या गावचे होते.राजापूरची गंगा हिचे कोकणपट्टीत खूप कौतुक आहे.कोकणातच काय घाटावरसुद्धा तिला महत्त्व आहे.कौतुकापेक्षा आदराने जास्त पाहिले जाते.साक्षात गंगामाता कोकणात भक्तांसाठी,जे प्रत्यक्ष गंगामातेला जाऊन पाहू शकत नाहीत,त्यात स्नान करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी अधूनमधून कांही काळ अवतरते अशी श्रद्धा आहे.राजापूरजवळ डोंगर उतारावर एक तीर्थस्थान आहे.तिथे डोंगर उतारावर अनेक कुंडे आहेत.गंगामाता एका कुंडात वाहू लागते.ते कुंड भरल्यानंतर उतारावरील इतर कुंडेही भरत जातात.कुंडाना निरनिराळी नावे आहेत. गंगेच्या काठावर जे धर्मविधी केले जातात ते सर्व येथे केले जातात.ज्याप्रमाणे गंगामातेचे पाणी बाटलीत भरून आणले जाते.देवघरात ठेवून तिचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे भाविक येथील पाणी बाटलीत भरून घेऊन जातात. पाण्याने भरलेले सीलबंद गडूही मिळतात.मृत्युसमयी गंगाजल जिभेवर ठेवले जाते.त्याचप्रमाणे याही जलाचा वापर केला जातो. गंगा आली की ती किती दिवस असेल ते सांगता येत नाही.केव्हां केव्हां तीन तीन चार चार महिने ती वाहत असते.तर कधी दोन चार दिवसांत गुप्त होते.ती केव्हां अवतरते त्याचाही कांही ऋतू नाही.भर उन्हाळ्याच्या कडाक्यात सुद्धा ती अवतरते.कित्येक जण गंगामातेला नवसही बोलतात.तिचे आगमन होते त्या वेळी तेथे येऊन नवस फेडले जातात.
याचे शास्त्रीय कारण शोधण्याचा प्रयत्न कांहीजणांनी केला असल्याचे ऐकिवात आहे.भूगर्भात पाणी संचय होतो.सायफनच्या तत्त्वाप्रमाणे ते बाहेर येऊ लागते.पाणी संपेपर्यंत ते बाहेत येत राहते असे काहीजण म्हणतात.पाऊस भरपूर पडतो तेव्हां जलसंचय होणार. गंगा त्यावेळी अवतरते असे नाही.पाऊस कमी पडला तरीही ती अवतरते.उन्हाळ्यातही अवतरते.कदाचित कांहीतरी शास्त्रीय स्पष्टीकरण असेलच परंतु कसाही विचार केला तरी हा एक चमत्कारच आहे हे बरेच जण मान्य करतात.
तर अशीच राजापूरला गंगा अवतरली होती.ती बातमी मध्यप्रदेशात सरकारी नोकरीत असलेल्या रामला कळली.त्याच्या पत्नीने राजापूरच्या गंगेबद्दल बरेच ऐकले होते.त्या दोघांनी आपल्या मुलांसह प्रत्यक्ष गंगामाईचे दर्शन अनेकदा अनेक ठिकाणी घेतले होते.त्यात स्नान केले होते.ते आरतीलाही हजर राहिले होते.
उत्तराखंडातील चारधाम यात्रेला गेले असताना गंगाद्वार, उत्तरकाशी, देवप्रयाग,ऋषिकेश, आणि हरिद्वार, याठिकाणी आणि कारणाकारणाने,कामानिमित्ताने प्रवास करताना,तीर्थयात्रेला गेले असताना प्रयागराज, बनारस,पाटणा कलकत्ता आणि गंगासागर या सर्व ठिकाणची गंगा त्यांनी पाहिली होती.गंगासागर, प्रयागराज,बनारस,ऋषीकेश,हरिद्वार अशा कांही ठिकाणी स्नानही केले होते.
तरीही विशेषत: सीतेला राजापूरच्या गंगेचे दर्शन घ्यायचेच होते.राम सीता आणि दोन मुलगे अशी सर्व जण राजापूरच्या गंगेला आली होती. त्यानिमित्ताने त्यांचा कोकण दौरा, कोकण ट्रिप, कोकणदर्शन, झाले असते.
या संदर्भात त्यांनी लक्ष्मणला कांहीही कळवले नव्हते.कोकणातून परत जाताना मुंबईला थांबू,लक्ष्मणला भेटू आणि नंतर परत जाऊ असा त्यांचा विचार होता.
ते विमानाने सिंधुदुर्गला चिपी विमानतळावर उतरले.तेथून स्वतंत्र मोटारीने ते सर्वत्र फिरणार होते.फिरत फिरत शेवटी मुंबईला येऊन लक्ष्मणला भेटून तेथून विमानाने ते भोपाळला जाणार होते.
लक्ष्मण व ऊर्मिला आपला उदरनिर्वाह कसातरी जेमतेम करीत असत.महिन्याच्या अखेरीला जमा व खर्च यांची दोन टोके जुळविताना त्यांची मारामार होत असे.ऊर्मिलेच्या गळ्यात गाठवलेले मंगळसूत्र होते.बाकी ती लंकेची पार्वती होती.तरीही तिची राजापूरच्या गंगेचे दर्शन घेण्याची इच्छा प्रबळ होती.पैशाची तजवीज करून ती चौघे राजापूरला निघाली.एसटीच्या लाल डब्यातून राजापूरला पोहोचली.एवढय़ा लांबच्या प्रवासाने त्यांचे अंग आंबून गेले होते.घामाचा चिकचिकाट झाला होता.
ज्या दिवशी ज्यावेळी राम व सीता आपल्या मुलांसह गंगेवर पोहोचली त्याचवेळी लक्ष्मण व उर्मिला तेथे पोहोचली.त्यांची अकस्मात तेथे भेट घडली.आणि नंतर पुढील रामायण घडले.
त्यांच्या दुर्दैवाने(अर्थात पुढे जे काही घडले त्यावरून दुर्दैव असे म्हणावे लागते.त्यावेळी ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येणे अर्थातच शक्य नव्हते.) त्यांची तिथे भेट झाली.
राम व लक्ष्मण या दोघांना परस्पराना भेटून अत्यानंद झाला.आकस्मिक भेटीमुळे तो आनंद द्विगुणित झाला होता.लक्ष्मणने तुम्ही कसे आला असे विचारले.त्यावर रामने प्रथम भोपाळहून मुंबई आणि नंतर मुंबईहून चिपी असा विमानाने प्रवास केल्याचे सांगितले.कोकणात फिरण्यासाठी त्याने एक टॅक्सी केली आहे हेही सांगितले.चौघेजण विमानाने इतका लांबचा प्रवास करून येतात नंतर टॅक्सी करतात म्हणजे त्यांच्याजवळ किती पैसा असला पाहिजे याची उर्मिलेला कल्पनाच करता येईना.तिला विमान प्रवासाचे भाडेही माहीत नव्हते. तिने सहज विमानभाडे विचारले.येऊन जाऊन विमानभाडे, टॅक्सीभाडे, हॉटेल निवास, इत्यादी सर्व धरून एक लाखाच्या वर खर्च होणार असा अंदाज तिने केला.सहज बोलता बोलता त्यांनी गंगामाता उगमापासून समुद्राला मिळते तोपर्यंत अनेक ठिकाणी पाहिली आहे हे सांगितले.तिला यांच्याजवळ किती पैसा आहे. ते तो कसा खर्च करतात याचा कांही अंदाजच बांधता येईना.मुलांचे उंची कपडे,तिची उंची साडी, अंगावर घातलेले भरगच्च दागिने, या सर्व गोष्टी पाहून उर्मिलेचा तिच्या स्वभावाप्रमाणे अंगाचा तिळपापड होत होता.ती मनातल्या मनात आपल्या मुलींचे व आपल्या अंगावरील कपडे आणि रामचे व त्यांच्या मुलांच्या अंगावरचे व सीतेचे कपडे यांची तुलना करीत होती.रागाने द्वेषाने असूयेने तिच्या अंगाची लाहीलाही होत होती.त्यांचे वैभव पाहून आनंद होण्याचे तर दूरच राहिले.तिला प्रचंड वैषम्य वाटू लागले. तिच्या स्वभावानुसार या सीतेचे वाटोळे झाले पाहिजे असे उत्कटतेने वाटू लागले.त्यासाठी काय करता येईल असे विचारचक्र तिच्या मनात सुरू झाले.
त्यावेळी तिला कांहीच करता येण्यासारखे नव्हते.मनातल्या कटू दुष्ट भावना मनातच ठेवून ती आपल्या जावेशी वरवर गोडगोड बोलत होती.मनात मात्र तिच्याविरुध्द, राम विरुद्ध, काय कारस्थान रचता घेईल याचा ती विचार करीत होती.एकमेकांचा निरोप घेऊन दोघेही पांगले.राम दक्षिणेकडील सिंधुदुर्ग,मालवण इत्यादी पाहून राजापूरला आला होता.तो उत्तरेला रत्नागिरीला रवाना झाला.तेथून मुंबईपर्यंत मोटारीने प्रवास करीत,ठिकठिकाणी थांबत, प्रेक्षणीय स्थळे बघत, तो जाणार होता.भोपाळला जाण्यापूर्वी मुंबईत तुला भेटेन असे लक्ष्मणला सांगून नंतर त्याला निरोप दिला होता.
*लक्ष्मण, ऊर्मिला व त्याची मुले एसटीच्या लाल डब्यात बसून मुंबईला परत आली.*
*मुंबईत आल्या आल्या उर्मिला तिच्या भावाला भेटली.तिने रामबद्दल सर्व हकिगत त्याला सांगितली.*
*रामचे वाटोळे कसे करता येईल याची युक्ती तिने त्याला विचारली.*
*तिचा भाऊ जारणमारण करण्यात, भूत उठवून ते एखाद्यावर सोडून त्याचे वाटोळे करण्यात वाकबगार होता.*
(क्रमशः)
२३/१२/२०२१©प्रभाकर पटवर्धन