Get it on Google Play
Download on the App Store

०६ शह व मात १-२

( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

योगायोगाने रावसाहेब त्या दिवशी अकस्मात घरी आले होते.कांही कामासाठी ते दिल्लीला जाणार होते. दिल्लीला येऊ नका असा फोन त्याना विमानतळावर मिळाला.ज्यांना भेटायला ते दिल्लीला जाणार होते ते काही कामामुळे कोलकत्याला जाणार होते. त्यांनी दिल्लीला जाणे रद्द केले व ते घरी परत आले.त्यांची पत्नी नलिनीला(पूर्वाश्रमींची कमला काटदरे)याची काहीच कल्पना नव्हती. रावसाहेबांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा स्वतःजवळच्या किल्लीने उघडला. आतून जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते.प्रथम आवाज दिवाणखान्यातून येत आहे असे वाटत होते.आंत गेल्यावर त्यांच्या लक्षात आले हा आवाज बेडरूममधून येत आहे.कांहीही न बोलता ते हॉलमध्ये तसेच बसून राहिले.नलिनीला अर्थातच रावसाहेब घरी आल्याची कल्पना नव्हती. ते दिल्लीला गेले अशी तिची समजूत होती. रावसाहेब दिल्लीला गेले म्हणून तिने आपल्या मित्राला फोन केला होता.तो नेहमीप्रमाणे ताबडतोब हजर झाला होता.रावसाहेब दिल्लीला गेले आहेत अशा कल्पनेने ती निवांत होती. बेडरूमचा दरवाजा उघडावा असे  एकदा त्याना वाटले. परंतु पुनर्विचार करून  काहीही न करता ते स्तब्धपणे बसून राहिले.       

प्रथम त्याना वाटत होते कि त्यांच्या पत्नीने टीव्ही लावला आहे आणि टीव्हीवर एखादा कार्यक्रम चालू आहे .थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की हा टीव्हीवरील कार्यक्रम नाही.शयनगृहात आणखी कुणीतरी आहे आणि हास्य विनोद चालला आहे. रावसाहेब संकुचित मनाचे नव्हते .पत्नीला मित्र असू नये असेही त्यांचे मत नव्हते.परंतु दिवाणखान्यात बसून गप्पा कां मारीत नव्हते असा स्वाभाविक  प्रश्न त्यांना पडला होता. आपल्या शयनगृहात बसून कुण्या परक्याने गप्पा माराव्यात हे त्यांना विचित्र वाटत होते.जरा वेळाने  हास्यविनोदाचे आवाज बंद झाले.दरवाजा उघडून कोणीतरी बाहेर येईल म्हणून ते जरा सावरून बसले.बाहेर कुणीच आले नाही.आता मात्र त्यांचे मन चांगलेच   संशयग्रस्त झाले.

ते आल्याचे कळू नये म्हणून  त्यांनी त्यांची बॅग लपवून ठेवली आणि तडक ते बाहेर पडले.

आपल्या घरात कोण आला आहे,कोणाजवळ शयनगृहात बसून गप्पा मारण्याइतकी पत्नीची जवळीक आहे ,ते त्याना पाहायचे होते.ते खाली येऊन  लिफ्टजवळ थांबले.ती संपूर्ण इमारत त्यांच्या मालकीची होती.त्यातील पाच नंबरचा संपूर्ण मजला त्यांनी आपल्याकडे ठेवला होता.इमारतीला एक सार्वजनिक लिफ्ट वुइथ बॅकअप होता.त्यांच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट होता.स्वतंत्र लिफ्ट बिघडल्यास सार्वजनिक लिफ्ट वापरण्याची सोयही त्यांनी ठेवली होती. जो कुणी आपल्या घरी आला आहे तो  लिफ्टमधून खाली येणार.लिफ्ट  पाचव्या मजल्यावरून आली आणि त्यातून जो कुणी बाहेर येईल तो आपल्या घरी आलेला माणूस म्हणून ते ओळखणार होते.थोडय़ाच वेळात लिफ्ट पाचव्या मजल्यावर बोलावली गेली.त्यातून एक मध्यमवयीन गृहस्थ बाहेर आला.त्यांनी आत्तापर्यंत त्याला पाहिलेला नव्हता. 

त्यांना पाहून तो माणूस दचकला त्याअर्थी तो आपल्याला ओळखत होता हे त्यांच्या लक्षात आले.जर तो शुद्ध हेतूने आपल्याकडे आलेला असेल तर त्याला आपल्याला बघून दचकण्याचे कांहीच कारण नव्हते. उलट त्याने येऊन रावसाहेबांना नमस्कार करणे अभिप्रेत होते. रावसाहेबांची स्थावर व जंगम मालमत्ता फार मोठी होती.  आत्तापर्यंत त्यांनी साठ पावसाळे पाहिले होते.त्यांचा मेंदू जलदगतीने विचार करू लागला.आपली पत्नी विवाहापूर्वी चित्रपट क्षेत्रात होती.तिला अनेक मित्र असणे स्वाभाविक होते.सर्वच आपल्या ओळखीचे असणे शक्यच नव्हते.तरीही तो मित्र आपल्या बेडरूममध्ये काय करीत होता ही विचार करण्याजोगी गोष्ट होती.आपण दिल्लीला गेलो असे पाहून तो आला असावा.

त्यांनी या गोष्टीचा छडा लावण्याचे ठरविले.त्यांनी एका खासगी गुप्तहेराची नेमणूक केली.त्याला त्यांनी रोजच्या रोज अहवाल देण्यास सांगितले होते.त्यांच्या पत्नीकडे कोणीही येत नाही आणि तीही कोणा मित्राकडे  जात नाही असा अहवाल त्याना मिळाला.आपण शहरात असताना पत्नी काळजी घेत असणार हे त्यांच्या लक्षात आले.कामासाठी कलकत्त्याला जात आहे असे त्यांनी घरी सांगितले.त्याप्रमाणे ते कलकत्त्याला खरेच निघून गेले.खासगी गुप्तहेराला जास्त बारीकपणे लक्ष ठेवायला सांगितले होते. थोड्याच दिवसांत त्या गुप्तहेराने सविस्तर अहवाल त्यांना दिला.जेव्हा जेव्हा ते शहरात असत त्यावेळी तो गृहस्थ त्यांच्या पत्नीकडे   जात नसे.ते शहराबाहेर गेले म्हणजे मात्र तो रोज रात्री सुद्धा हजर होत असे. पत्नीचे व त्या व्यक्तीचे गुप्त संबंध असावेत. सर्व गोष्टी त्यांना कळल्या.

प्रथम त्यांना प्रचंड राग आला.शहराबाहेर जाण्याचे नाटक करावे.तिला रंगे हाथ पकडावे आणि घरातून हाकलून लावावे.आपल्या मालमत्तेतून तिला बेदखल करावे.त्या तिच्या मित्राला जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवावी.असा विचार प्रथम त्यांच्या मनात आला .त्यांचे आर्थिक व राजकीय वजन लक्षात घेता त्या व्यक्तीला ठार मारणे सुध्दा त्याना सहज शक्य होते.विचारांती रावसाहेबांनी यातील काहीच केले नाही. रावसाहेबांनी कोणतेही अकांडतांडव केले नाही.त्यांची पत्नी त्यांची बडदास्त व्यवस्थित ठेवीत होती.ती त्यांची काळजीही घेत होती.तिला हाकलून लावून एकाकी जीवन जगण्यापेक्षा आहे ते तसेच चालू ठेवावे असा विचार त्यांनी केला  .मात्र तिला जन्माची अद्दल घडेल अशी  चाल खेळण्याचे त्यांनी ठरविले.नलिनीने त्यांच्याशी विवाह केवळ त्यांच्या मालमत्तेकडे बघून केला होता.कुठे तरी खोलवर त्याना त्याची कल्पना होती.नाहीतरी त्यांचे वय नलिनीशी विवाह केला तेव्हा  साठ होते.आपल्या मागे लोक म्हातारा नवरा गमतीला असे कुत्सितपणे म्हणतात हेही त्याना माहीत होते.

फक्त त्यांनी आपले मृत्युपत्र बदलायचे ठरविले. विवाहानंतर केलेल्या मृत्यूपत्रात त्यांनी आपली बहुतेक सर्व इस्टेट पत्नीच्या नावाने केली होती.त्यांचे आई वडील हयात नव्हते .त्यांना बहीणही नव्हती.भावाचा मृत्यू झाला होता. दोन पुतणे होते.त्याना त्यांनी इस्टेटीतील दहा दहा टक्के ठेवले होते.उरलेली ऐशी टक्के मालमत्ता पत्नीच्या नावाने केली होती.

लग्नाच्या वेळी त्यांची पत्नी पस्तीस वर्षांची होती.रावसाहेब तर साठीचे होते.नलिनी(त्यांची पत्नी कमला काटदरे  हिचे सिनेमातील नाव )काम करीत असलेल्या सिनेमाला रावसाहेबांनी अर्थपुरवठा केला होता.नलिनी त्यांना आवडली.  त्यांची जास्त ओळख होत गेली.नलिनीने त्यांच्या मालमत्तेकडे पाहून जाणीवपूर्वक ओळख वाढविली.शेवटी नलिनीने रावसाहेबांशी विवाह करण्याला अनुमती दिली.त्यांचा विवाह झाला.त्यालाही आता पाच वर्षे झाली होती.आत्तापर्यंत त्याना कमलाच्या चारित्र्यात कुठेही खोट आढळली नव्हती.त्या दिवशीचा प्रकार बघून त्याना धक्का बसला होता.

कमला काटदरे   सिनेमात काम करण्याच्या उद्देशाने घरातून पळून आली होती.त्यावेळी ती फक्त सतरा वर्षांची होती.सिनेमात तिला प्रथम किरकोळ कामे मिळत गेली.~तिला अनेक तडजोडी कराव्या लागल्या.~नामांकित नटी म्हणून ती कधीही प्रसिध्द झाली नाही.एखाद्या दुसर्‍या  सिनेमात तिने नायिकेची भूमिका केली असेल.बाकी तिला साइड रोल मिळाले.तिने लग्नही केले होते.ते अयशस्वी झाले. वर्षभरात तिचा घटस्फोटही झाला होता.

रावसाहेबांना या सर्व गोष्टी माहीत होत्या.त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती.मूलबाळ कुणीही नव्हते.इस्टेट भरपूर होती.कामधंद्याचा पसारा मोठा होता.त्यांना आधाराची गरज होती.नलिनी उर्फ कमलाने ही गोष्ट बरोबर ओळखली.तिलाही विशेष भूमिका मिळत नव्हत्या.आता तर तिला आईच्या भूमिका मिळत  

होत्या.तिलाही आधाराची गरज होती. रावसाहेबांचा पैसा मालमत्ता यावर तिचा डोळा होता.त्यांच्याशी तिने जाणीवपूर्वक घसट वाढविली.ते अर्थपुरवठा करणारे असल्यामुळे वारंवार सेटवर येत असत.नलिनीने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले.कुणी कुणाला जाळ्यात ओढले हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकेल.काहीही असो परंतु ती दोघे विवाहबद्ध झाली.

गेली पाच वर्षे  त्यांची आनंदात गेली होती.पत्नी जरी सिनेमा क्षेत्रातील असली तरी  तिच्या वर्तणुकीत त्यांना कुठेही काहीही खोट आढळली नव्हती.त्यांनी अगोदरच एक मृत्युपत्र केले होते.त्यात त्यांनी पन्नास टक्के मालमत्ता आपल्या दोन पुतण्यांमध्ये समसमान वाटली होती. पन्नास टक्के मालमत्तेचा विश्वस्त निधी स्थापन केला होता.  

विवाहानंतर त्यांनी आपले मृत्युपत्र बदलले होते.पुतण्याना दहा दहा टक्के व ऐशी टक्के पत्नीच्या नावाने केले होते.आता त्यांनी पुन्हा मृत्युपत्र बदलायचे ठरविले.नवीन मृत्युपत्र बाद करून त्यांनी पूर्वीचेच मृत्युपत्र कायम ठेवले.सर्व गोष्टी त्यांनी कायदेशीर केल्या .मात्र पत्नीला याची काहीही दाद लागू दिली नाही.नलिनीला ऐशी टक्के मालमत्ता तिच्या नावाने आहे असे वाटत होते.ते मृत्युपत्र त्यांनी तिला दाखविले होते.त्यामुळे ती खुशीत होती.नवीन मृत्युपत्रात नलिनीला एक कपर्दिकही मिळत नव्हती.  

लग्न झाल्यापासून गेली पाच वर्षे कदाचित तिचे संबंध त्या माणसाबरोबर असावेत. कदाचित अगोदरपासूनही ते संबंध असावेत, परंतु त्यांच्या ते कधीच लक्षात आले नव्हते.कामानिमित्त त्यांना वारंवार हिंदुस्थानात व हिंदुस्थानाबाहेर जावे लागे.ते बाहेरगावी गेले आहेत किंवा परदेशात गेले आहेत असे पाहून तिचे हे संबंध चालू होते.

*त्यांना कधीही पत्नीचा संशय आला नव्हता.*

*ती आपल्याशी प्रामाणिक आहे असे त्याना वाटत होते.*

*आजही ते दिल्लीला गेले असते तर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नसती.*

*दिल्लीचे त्यांचे जाणे रद्द झाले  .ते तडक घरी आले.त्यानी पत्नीला तसे अगोदर कळवलेही नाही.

*त्याना पत्नीला सरप्राइज द्यायचे होते.पत्नीला सरप्राइज देण्याऐवजी त्यांनाच तिच्याकडून हे असे सरप्राइज मिळाले.*

(क्रमशः)

१६/११/२०२०©प्रभाकर  पटवर्धन