Get it on Google Play
Download on the App Store

११ बहिणी बहिणी ३-३

(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

स्वतः ते रसायन घेऊन मरावे कि ते रसायन देऊन सुहासला मारावे , तिचा निश्चय होत नव्हता .

मरावे की मारावे या द्वंद्वात कमल सापडली होती.

तसेच पाच सहा दिवस गेले .शेवटी कमलने मनाशी निश्चय केला .जिच्यावर लहानपणापासून प्रेम केले, जी आपली लाडकी आहे, व होती ,तिला मारण्याचा विचार मनात आलाच कसा ?या पापाला क्षमा नाही .मन इतके गुंतागुंतीचे असते का ?मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात ते उगीचच नव्हे .जिचे आपण प्राण पणाला लावून रक्षण केले पाहिजे तिचा गळा घोटायचा छे: अशक्य.

प्रेम हे का ठरवून करता येते ? सुहासचे ज्याच्यावर प्रेम बसले त्याच्यावर माझे प्रेम बसले हा काय माझा गुन्हा झाला?हृदयाच्या गोष्टी हृदयाने केल्या. आता हृदयाचेच ऐकले पाहिजे.हृदय सांगते सुहासला आशिर्वाद दे.ती व दिलीप आनंदाने पुढील आयुष्यात मार्गक्रमणा करू देत .ती सुखी होउं देत. याशिवाय माझ्या हृदयातून दुसरा कोणताही ध्वनी येणार नाही .

परंतु ज्याच्यावर प्रेम केले तो जर मिळत नसेल तर जगण्यात अर्थ काय? खरेच कमलचा हॅम्लेट झाला होता .त्यातून ती आता सावरली .स्वत:चे जीवन संपविण्याचा तिने निश्चय केला.

माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही अशा आशयाचे एक पत्र लिहून ठेवावे असा विचार तिच्या मनात आला .परंतू नंतर तिच्या असे लक्षात  आले की आपण ज्या प्रकारे आत्महत्या करणार आहोत त्यामुळे कुणावरही हत्येचा दोष जाणार नाही .मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मी मृत्यू पावले असेच सर्वांना वाटणार आहे .त्यामुळे तिने तो विचार रद्द केला .

तिने केमिस्टकडे जाऊन अगोदरच विशिष्ट रसायने आणून ठेविली होती.तिच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे तिने त्याचे विशिष्ट मिश्रण तयार करून ठेवले होते.तिने तिला आवडणारे लिंबू सरबत तयार केले . त्यात केशर घातले .केशर घातलेले लिंबू सरबत तिला अतिशय आवडत असे . हॉलमधील टीपॉयवर तिने तो ग्लास ठेवला . तिचे आई वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते .सुहास बाथरूममध्ये स्नानासाठी गेली होती .घरात तशी ती एकटीच होती.ग्लास उचलून सावकाश घोट घोट लिंबू सरबत घ्यावे,त्याचा आस्वाद घ्यावा, आणि हसतहसत मृत्यूला आलिंगन द्यावे, असा तिचा विचार होता.एकदा तिने मिश्रण योग्य केले की नाही त्याचा आढावा घेतला .त्यातील योग्य डोस काढून ग्लासमध्ये ओतला.चमच्याने मिश्रण नीट हलविले.एकदा हा ग्लास तिच्या पोटात गेला की चार पाच तासांमध्ये तिचा सर्व ग्रंथ आटोपणार होता.

तिने पिण्यासाठी ग्लास ओठाला लावला एवढ्यात बेल वाजली .चटकन तिने प्रतिक्षिप्त क्रियेने ग्लास टीपॉयवर ठेवला व ती दरवाजा उघडण्यासाठी गेली.दरवाजा उघडल्यावर पुढ्यात दिलीप उभा होता.त्याने तिच्याकडे बघून मंद स्मित केले .सुहास तयार आहे ना? आम्ही दोघे आता बाहेर खरेदीसाठी जाणार आहोत .असे म्हणत तो सोफ्यावर येऊन बसला सुद्धा . कमलला काय बोलावे ते सुचत नव्हते .एकांतात कुणीतरी पकडल्यावर जसा मनुष्य गांगरतो तशी ती गांगरली होती .त्याने पटकन तिच्या जवळ पिण्यासाठी पाणी मागितले .कमलला विचार करायला वेळ मिळाला नाही .ती तशीच पाणी आणण्यासाठी घरात गेली.

ती पाणी घेऊन येते आणि पाहते तो टीपॉयवरील लिंबू सरबताचा ग्लास दिलीपने रिकामा केला होता.तो म्हणाला लिंबू सरबत असताना पाणी कशाला प्यायचे, म्हणून मी हा तुमचा ग्लास रिकामा केला मला माफ करा. खूप तहान लागली होती .तुम्ही दुसरे लिंबू सरबत तयार करून प्या.

त्याने ग्लास रिकामा केलेला पाहिल्याबरोबर कमलला मोठा धक्का बसला .तिच्या हातातील पाण्याचा ग्लास सुटला आणि फरशीवर पडून चक्काचूर झाला .सर्वत्र पाणी व काचा झाल्या. कमलने सोफ्यावर अंग टाकून दिले .तिला काय बोलावे ते सुचेना .दिलीप आता चार पाच तासांचा सोबती होता.ती काही बोलू शकत नव्हती. सांगू शकत नव्हती. करू शकत नव्हती. 

पुढील घटना भराभर घडल्या .सुहास व दिलीप खरेदीसाठी मॉलमध्ये गेली.खरेदी करून ती तिथल्याच एका सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी गेली .थिएटरमध्येच दिलीपचा हार्टअटॅक येऊन  तत्क्षणीच मृत्यू झाला .कुणालाही काही संशय आला नाही .सुहास तर तत्क्षणीच बेशुद्ध झाली.सर्वांनाच  या धक्क्यातून सावरायला चारसहा महिने लागले.

जग कुणासाठी थांबत नाही.जाणारा जातो. राहणाऱ्यांना आपले आयुष्य जगायचे असते.जीवन धारा वाहात असते . "जन क्षणभर म्हणतील हाय हाय"हा जगाचा नियम आहे .सुहास सावरली. कॉलेजमध्ये व तिच्या क्लिनिकमध्ये जाऊ लागली .त्यानंतर वर्षभराने तिच्या आई वडिलांनी तिला लग्न करण्यासंबंधी विचारले .तिने ठाम नकार दिला . मी आता जन्मभर लग्न करणार नाही असा तिचा निश्चय तिने सांगितला .यानंतर पुन्हा या विषयावर माझ्याशी बोलू नका म्हणूनही तिने निक्षून सांगितले .

कमलने लग्न करावे म्हणून तिच्या आई वडिलांनी प्रयत्न सुरू केले .कमल म्हणाली मी ही अशी आजारी.आज उभी तर उद्या आडवी ,माझे केव्हा काय होईल ते सांगता येत नाही.मला स्वतःचाच नीट सांभाळ करता येत नाही तर मी अख्खे कुटुंब कसे काय सांभाळणार?ज्या दिवशी ती दुःखद घटना घडली त्या दिवसांपासून कमल सतत आजारी पडत होती . कधी सर्दी ,कधी ताप, कधी डोकेदुखी, कधी छातीत दुखणे,कधी पोटदुखी, तर कधी हातापायात वांब येणे,तिचे काही ना काही चालूच असे.आज पर्यंत ठणठणीत असलेली ही कमल एकदम अशी आजारी कशी झाली हे तिच्या आई वडिलांना कळेना.वैद्य डॉक्टर स्पेशालिस्ट सर्व झाले कुणालाच काहीही उलगडा होईना . तिला खाण्यातून काहीतरी विषबाधा झालेली असली पाहिजे असे एक वैद्य म्हणाला .यावर उपाय काय असे विचारता तो म्हणाला काही उपाय सुचत नाही. दिसत नाही .एखादा निष्णात धन्वंतरीच काही उपाय सांगू शकेल.

तो निष्णात धन्वंतरी मिळालाच नाही .शेवटी आई वडिलांनी तिच्या लग्नाचा विचार सोडून दिला .इकडे सुहासही मी आजन्म लग्न करणार नाही असा निश्चय करून बसली होती .तिला विचारता ती एवढेच म्हणे,"मला लग्न करणार का म्हणून विचारू नका जर मला वाटले तर मी तसे सांगेन"    

त्यांच्या आई वडिलांना या दोनच जुळ्या मुली, एकीचे ठरलेले लग्न होण्याच्या अगोदरच नियोजित वर मृत्यू पावला,तर दुसरी तेव्हापासूनच सतत आजारी असते .दोघीही लग्न करायचे नाही असे म्हणतात . त्यांच्या आई वडिलांनी हाय खाल्ली .आणि काही वर्षांतच एकामागून एक दोघेही निवर्तली .

एकमेकींना आधार म्हणून आता या दोघी बहिणी उरल्या .

अशीच वर्षे चालली होती .सुहास कॉलेज व क्लिनिक यामध्ये अत्यंत व्यस्त असे.तर कमल तिच्या आजारपणात, त्या दुःखात, त्या व्यथेतच गुंग असे.

दिलीपच्या मृत्यूपासून सतत आजारी पडण्याचे कारण कमलला माहीत होते . लिंबू सरबताचा तो ग्लास दिलीप चुकून प्यायल्या बरोबर कमलाला प्रचंड धक्का बसला होता .चार पाच तासांमध्ये दिलीपच्या मृत्यूची बातमी अाली. कमलला जगण्यात अर्थ वाटत नव्हता .ती जीवन संपवणार होतीच .आता तर तिचा दृढ निश्चय झाला .कमलने घाई घाईने ते सुप्रसिद्ध मिश्रण पाण्यामध्ये टाकले व पिऊन टाकले .उरलेले मिश्रण कुणाच्या हाताला लागू नये म्हणून वॉशबेसिनमध्ये  ओतून टाकले.नंतर ती हार्टअटॅकची वाट पाहात बसली .हृदय विकाराचा तीव्र जीवघेणा झटका आलाच नाही .मात्र तेव्हांपासून ती सतत आजारी पडू लागली . काही महिन्यांनंतर तिला तिच्या आजाराचे कारण लक्षात आले .त्या मिश्रणाचा पूर्ण डोस न घेता घाईघाईत तिने अर्धवट डोस घेतला होता .त्यामुळे मृत्यू न येता ती सतत आजारी पडत होती .आता कशाला कुणाचाच काही इलाज नव्हता .ती रसायने आणून नवीन मिश्रण करून पुन्हा योग्य डोस घेण्याचे अवसान कमलला राहिले नव्हते.बहिणीच्या नियोजित पतीवर प्रेम करण्याची शिक्षा आपल्याला नियतीने दिली आहे ती आपण भोगलीच पाहिजे असे ती समजत होती . 

वर्षे एकामागून एक चालली होती .कमल शेवटी अंथरुणाला खिळली.सुहास तिची मनोभावे शुश्रूषा करीत होती .ताई हा तिचा नेहमी प्रमाणे जीव की प्राण होता .ताई आपल्याला सोडून जाणार .आपण एकटे राहणार, हे तिला कळून चुकले . हा तिच्यावर चौथा मोठा आघात असणार होता .प्रथम दिलीप, नंतर आई,नंतर वडील व आता ताई.ताई गेल्यानंतर आपण कशासाठी जगायचे असे तिला सतत वाटत असे.

आणि शेवटी कमलची ती वेळ आली .आतापर्यंत हृदयात बंद करून ठेवलेले दिलीपच्या मृत्यूचे रहस्य जर आपण सुहासला सांगितले नाही तर तो मोठा अपराध ठरेल .तिची घडलेल्या घटनेबद्दल क्षमा मागितली पाहिजे .हा विचार कमलला सतत नेहमी पोखरीत असे.आपण सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल असा तिला नेहमी प्रश्न पडे.  चुकून झालेल्या घटनेबद्दल ती आपल्याला क्षमा करील कि करणार नाही हेच तिला कळत नसे. सुहासला सांगावे म्हणून तिने अनेक वेळा ठरविले .प्रत्येक वेळी तिची जीभ रेटत नसे.ओठापर्यंत आलेले शब्द बाहेर पडत नसत . आता मात्र तिने निश्चय केला .आपली अखेरची वेळ आली आहे .आता नाही तर कधीच नाही हे तिला कळून चुकले .

तिने सुहासला जवळ बोलाविले . मरताना तुला सर्व काही सांगून मला जायचे आहे असे ती म्हणाली.ताई तू अभद्र बोलू नकोस म्हणून सुहासने तिच्या ओठावर हात ठेवला.तो हात दूर करत खोल गेलेल्या स्वरात कमल म्हणाली,   

" दिलीपच्या मृत्यूला मी अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहे .दिलीपला बघता क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले होते . त्याला मिळावावा म्हणून काही वेळा मी प्रयत्नही करीत होते.शेवटी माझी चूक मला कळली.मी तुम्हा दोघांपासून कायमचे दूर जाण्याचे ठरविले .त्या उद्देशाने माझे आवडते लिंबू सरबत तयार करून त्यात विष टाकले . ते घेतल्यानंतर चार पाच तासांमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन माझा मृत्यू झाला असता . सर्वच प्रश्न सुटले असते .परंतु दुर्दैवाने तसे व्हायचे नव्हते .मी सरबत पिणार एवढ्यात दिलीप तुला भेटण्यासाठी आला.त्याने माझ्या जवळ पाणी मागितले .मी पाणी आणीपर्यंत त्याने ग्लासातील लिंबू सरबत  पिऊन टाकले.परिणामी माझ्याऐवजी तो हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला .  असफल ठरलेला माझा प्रयत्न मी पुन्हा तडीस नेण्याचा प्रयत्न केला .घाई घाईत पूर्ण डोस न घेता अर्धवट डोस घेतला गेला .तेव्हापासून मी ही अशी अंथरुणाला खिळलेली आहे .कधीही आजारी न पडणारी मी तेव्हापासून सतत आजारी असते . "

"माझ्यामुळे तुझे भविष्य अंध:कारमय झाले.आई वडिलांना मोठा धक्का बसला.त्यामुळेच हाय खाऊन  त्यांचा मृत्यू झाला.जमले तर मला क्षमा कर . मी तुझी सहस्र अपराधी आहे ."

एवढे बोलतानाच कमलला धाप लागली .ती क्लांत झाली .

सुहासने तिचे हात आपल्या हातात घेतले.ती कमलला उद्देशून म्हणाली,

" ताई तू मुद्दाम काही केले नाहीस .तू मुद्दाम काही करणार नाहीस याची मला खात्री आहे.जे झाले तो अपघात होता .माझ्या नशिबातच तसे लिहलेले होते त्याला कोण काय करणार ?नियतीचा अदृश्य हात आकाशाच्या पटलावर प्रत्येकाचे भविष्य रेखीत असतो. तू मनाला लावून घेऊ नकोस.तू क्षमा मागण्यासारखे काहीही केलेले नाही .तरीही तुझे जर समाधान होत असेल तर मी तुला क्षमा करते ."

असे म्हणून तिने ताईंच्या छातीवर डोके ठेवले.

* हे शब्द ऐकण्यासाठी घुटमळत असलेले कमलचे प्राण अनंतात विलीन झाले .*

*सुहासनेही ताईंच्या छातीवर  ठेवलेले डोके उचलले नाही.*

*तीही ताईला भेटण्यासाठी निघून गेली होती .*  

(समाप्त)

२३/१०/२१९©प्रभाकर  पटवर्धन