Get it on Google Play
Download on the App Store

०७ सविताचे लग्न १-२

(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आज काळे यांच्या मुलीला सविताला पाहायला एक मुलगा येणार होता .काळे यांचे नाव जरी काळे असले तरी ते चक्क गोरे होते.त्यांची बायको जरी काळे या आडनावाला  शोभणारी नसली तरी तिला सावळे हे आडनाव  शोभून दिसले असते.सविता बऱ्यापैकी देखणी आणि गुलाबी वर्णाची मुलगी होती .

चहा पोहे या स्टॅंडर्ड मेनू ऐवजी इडली, मेदूवडे चटणी, व अननस सरबत असा वेगळाच मेनू होता .हल्ली सुशिक्षित लोकांमध्ये प्रेम विवाह होण्याचे प्रमाण जरी वाढले असले तरी अजूनही बरेच विवाह मुलगी दाखवूनच होतात.विवाहोत्तर प्रेम कि प्रेमोत्तर विवाह हा नेहमीच वादाचा चर्चेचा विषय राहिला आहे.दोन्ही  प्रकारचे विवाह यशस्वी किंवा अयशस्वी होऊ शकतात.जे विवाह टिकतात तेही यशस्वी असतातच असे नाही.असो.

तर आज काळे यांच्याकडे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होता .सविता दाखविण्याच्या कार्यक्रमाच्या विरुद्ध होती .तिने तिचा निषेधही नोंदविला होता .त्यावर तिचे आई व बाबा दोघेही म्हणाले होते. तू जर एखादा मुलगा घेऊन आमच्या पुढ्यात उभी राहतीस आणि हा तुम्हाला पसंत आहे का म्हणून विचारतीस आणि जर तो आम्हाला पसंत पडला असता तर हा प्रश्नच उद्भवला नसता.त्यावर सविताने मानेला एक लहानसा झटका दिला होता.

तिचा हा मानेचा झटका मोठा पाहण्यासारखा वाखाणण्यासारखा होता .कौतुक निषेध लज्जा सर्व काही त्यात उमटत असे.परिस्थितीनुसार त्याचे अर्थ निरनिराळे होत असत .मान्यता अमान्यता होकार नकार आनंद विषाद कधी कधी विकारही त्यातून नेमका पाहणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचत असे.

ठरल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता अतुल,काळे यांच्या घरी आला .त्याचे आई वडील त्याच्या बरोबर आले नव्हते .ही गोष्ट सविताच्या आई वडिलांना जरा खटकली.त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अतुल म्हणाला  आईबाबा येणार होते परंतु त्यांना अकस्मात जावे लागल्यामुळे ते आले नाहीत.नंतर थोडे थांबून तो म्हणाला माझ्या बाबांच्या स्नेह्यांचे वडील वारले तिकडे ते गेले आहेत म्हणून त्यांना येता आले नाही. त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे .हा शकुन काही सविताच्या आई बाबांना ठीक वाटला नाही.त्यावर आपली उदासी लपवीत हसून ते म्हणाले हरकत नाही ठीक आहे ते पुन्हा केव्हा तरी येतील.

अतुलने आपल्या बरोबर एखादा मित्र तरी आणायला पाहिजे होता असे सविताच्या बाबांना वाटले.नंतर त्यांच्या मनात विचार आला की झाले ते बरेच झाले सर्वांना मोकळेपणाने बोलता येईल.

सविता ही आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती .सविताचा मोठा भाऊ अमेरिकेत होता.तो तिकडेच स्थायिक झाला होता .मधून मधून तो मी भारतात येणार असे म्हणत असे परंतु त्यात काही विशेष तथ्य नव्हते.जो एकदा अमेरिकेत गेला तो गेला तो परत येणे कठीण असा सार्वत्रिक अनुभव होता .त्याला तेथील नागरिकत्वही मिळाले होते 

खाण्यापिण्याचा कार्यक्रम झाल्यावर सविताचे बाबा म्हणाले .सविता जा आपले घर त्यांना दाखव.त्यावर हसून अतुल म्हणाला मी तुमचे घर तर पाहणार आहेच, परंतु तुम्ही आता घर दाखविण्याचा बहाणा करून आम्हा दोघांना परस्परांशी काही विशेष बोलायचे असेल तर त्यासाठी मोकळीक देत आहात .मला तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत अगोदर काही महत्त्वाचे बोलायचे आहे .मी जे काही बोलणार आहे ते जसे सविताला माहित पाहिजे त्याप्रमाणेच तुम्हालाही माहित पाहिजे .

त्यावर सविताचे बाबा म्हणाले,  जे काही तुम्हाला बोलायचे असेल ते नि:संकोचपणे बोला.

त्यावर अतुलने बोलण्यास सुरुवात केली . मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या आई वडिलांची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे .आर्थिक दृष्ट्याही  ते तेवढे भक्कम  नाहीत.लग्नानंतरही ते माझ्याच घरी राहणार आहेत.तुमची सविता कशी आहे ते मला माहीत नाही .परंतु बऱ्याच मुलींना लग्नानंतर एकटेच रहायला आवडते.त्या अर्थातच मुलाला स्वीकारतात परंतु मोकळ्या मनाने त्याच्या कुटुंबीयांना स्वीकारीत नाहीत.अगोदर कल्पना असली म्हणजे मागून चिडचिड होत नाही.लग्न म्हणजे  दोन व्यक्तींचा संबंध असे नसून तो दोन कुटुंबे घराणी यांचा संबंध असतो.बऱ्याच वेळा मुली हे विसरून जातात आणि त्यामुळे संसारात  तंटे निर्माण होतात .

* त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याला सविता पसंत आहे असे दिसत होते.*

*आपणही तिला पसंत असूच असा त्याला विश्वास दिसत होता.*

*फक्त लग्नानंतर तिचा दृष्टिकोन कसा असावा तिच्यावर जबाबदाऱ्या कोणत्या असतील ते तो स्पष्ट करीत होता.*

* त्याचे बोलणे तर्कशुद्ध सुस्पष्ट व कोणत्याही समंजस व सुजाण माणसाला पटण्यासारखे होते.* 

*त्याचे बोलणे त्याची वैचारिक पातळी व विचारांची स्पष्टता, शांत स्वभाव व सौजन्य अधोरेखित करत होते.*

* त्याच्या बोलण्यामुळे सविता मोहित होउन त्याच्याकडे  एकटक पाहात होती .*

(क्रमशः)

१२/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन