०४ पुरुष २-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
त्यांच्या मनात आणखी काय काय विचार येत असत ते त्यांचे त्यांनाच माहित .एवढा मोठा प्राचार्य त्यांचा वेळ काल्पनिक मनोरंजनात जाऊ लागला होता .
हे सर्व चूक आहे असे कळत असूनही त्यांचे मन तिच्याबरोबर अनेक गोष्टी करीत असे .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा परिणाम त्यांच्या खासगी आयुष्यावर नकारात्मक होण्याऐवजी सकारात्मक होऊ लागला होता.
माधुरीच्या ठिकाणी ते रचनाला पाहू लागले होते. माधुरीत ते जास्त जास्त रस घेऊ लागले होते.एकाएकी आपल्या नवऱ्याला काय झाले ते माधुरीला कळत नव्हते.
एकाएकी नवरा आपल्यात जास्त रस घेत आहे तेही सतरा अठरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर, हे पाहून कोणत्या स्त्रीला आनंद होणार नाही .
आपल्यापासून काही लपविण्यासाठी तर रघुनाथ असा वागत नाही ना असाही एक संशय माधुरीच्या मनात डोकावून गेला .तिचा रघुनाथवर पूर्ण विश्वास होता.ते भलते सलते काही करणार नाहीत याची तिला खात्री होती .
रघुनाथराव पूर्वीही तिच्याबरोबर फिरतच होते परंतू आता त्यांचे फिरणे जास्त वाढले होते . त्यांची माधुरीशी सलगी वाढली होती.तिला त्यांचे तिच्यावरील प्रेम पदोपदी जाणवत होते.प्रेम होतेच परंतु त्याचा उच्चार त्याचे दर्शन वाढले होते.या वयात इतक्या वर्षांच्या संसारानंतर त्यांचे असे वागणे माधुरीला ऑकवर्ड वाटत होते . कॉलेजमधील त्यांचे लक्ष थोडे कमी झालेले काही जणांच्या लक्षातही आले होते. माधुरी बरोबर जास्त तन्मयतेने ते फिरत होते बोलत होते .अापण रचनाबरोबर फिरत आहोत, रचनाच आपल्या घरात आहे, अशी कल्पना त्यांचे मन करीत असे.
त्याची मुलगी दहावीला होती .पुढच्या वर्षी ती ज्युनिअर कॉलेजला आली असती .रचनाही त्यांच्या मुलीसारखीच होती.हे सर्व त्याना कळत होते पण वळत मात्र नव्हते. त्यांचे काल्पनिक मनोरंजन स्वप्नरंजन चालतच असे .
आणि एक दिवस पावसाळा सुरू झाला .जून महिना होता .सुरुवातीचा पाऊस जोरात पडत होता.ढग गडगडत होते विजा चमकत होत्या.पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते .बस तुरळक धावत होत्या.रिक्षा टॅक्सी मिळणे कठीण झाले होते.रचना नेहमी तिच्या स्कूटरवरून येत असे.आज ती बसने आली होती. कॉलेज सुटल्यावर ती आत्ता पाऊस थांबेल नंतर थांबेल, म्हणून वाट पहात कॉमनरूममध्ये थांबली होती .सकाळी छान ऊन असल्यामुळे तिने छत्री रेनकोट काहीही आणले नव्हते.हळू हळू कॉमनरूम रिकामी झाली होती .
शेवटी ती तशीच निघाली. बसस्टॉपवर उभी राहून ती एकीकडे बसची वाट पाहात होती.त्याच वेळी ती रिक्षा टॅक्सी मिळेल म्हणून हात दाखवीत होती. प्रयत्न करीत होती.बस येत नव्हती.ज्या बस येत होत्या त्या तिच्या बाजूला जाणाऱ्या नव्हत्या. रिक्षा टॅक्सी दिसली कि ती हाक मारीत होती, हात हलवत होती, परंतु एकही रिक्षा टॅक्सी थांबत नव्हती. वाऱ्याबरोबर पाउस आडवातिडवा येत होता . ती संपूर्णपणे भिजली होती .ओले कपडे तिच्या अंगाला घट्ट चिकटून बसले होते.त्यामध्ये तिची कमनीय आकृती जास्तच उठावदार दिसत होती.
आजच काही काम संपविणे आवश्यक असल्यामुळे रघुनाथराव काम करीत थांबले होते. कामात गुंग झाल्यामुळे त्यांचे पावसाकडे लक्षही नव्हते . किती वाजले तिकडेही लक्ष नव्हते.काम संपल्यावर त्यानी एक छानपैकी आळस दिला.प्यूनला कँटिनमधून एक कडक कॉफी आणायला सांगितली.
कॉफी पिऊन जरा तरतरी आल्यावर ते आपली गाडी काढून घरी जायला निघाले .बाहेर पडताच बस स्टॅंडवर त्याना रचना उभी असलेली दिसली.ती भिजली आहे,थंडीने कुडकुडत आहे,तिला कोणतेही वाहन मिळाले नाही आणि मिळण्याचा संभवही नाही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली.त्यांनी बसस्टॅण्डजवळ आपली गाडी उभी केली. या म्हणून फ्रंटसीटचा दरवाजा उघडला.
तिचे सरांच्या गाडीकडे लक्ष नव्हते.ती दूरवर बस, टॅक्सी, रिक्षा,एखादे वाहन येत आहे का ते पहात होती .सरांना पाहून रचना एकदम दचकली .तिने एकदा स्वतःकडे पाहिले . कपडे भिजून ओले चिंब झाले होते.ती संकोचली.तिचा चेहरा कसनुसा झाला .ती पुढे वाकून सरांना म्हणाली मी अांत बसले तर सीट ओली होईल .मला कोणते तरी वाहन मिळेल . तुम्ही जा .सरानी दरवाजा तसाच उघडा ठेवला .किंचित हुकमतीच्या आवाजात तिला आंत बसण्यास सांगितले.त्यानी हुकूम सोडला असला तरी त्यातील आर्जवही तिच्या लक्षात आले .ती आंत बसताच सरानी गाडी सुरू केली.पाऊस पखाली भरून ओततच होता.
पूर्णपणे भिजलेली असल्यामुळे सरांबरोबर फ्रंट सीटला बसताना रचनाला अतिशय संकोच वाटत होता.गाडीत एसी सुरू होता .रचना भिजलेली आहे तिला थंडी वाजेल ही गोष्ट सरांच्या लक्षातच आली नव्हती.रचना थंडीने कुडकुडू लागली. तिचे दातावर दात आपटू लागले होते.सरांनी मध्येच तिच्याकडे पाहिले .ती सचैल भिजलेली असल्यामुळे तिच्याकडे बघताना सराना थोडा संकोच वाटत होता.तिच्याकडे बघत रहावे असेही वाटत होते. तिला थंडी वाजत आहे. ती भिजलेली आहे. एसी चालू आहे. ही गोष्ट सरांच्या लक्षात आली .त्यांनी सॉरी माझ्या लक्षातच आले नाही असे म्हणत एसी बंद केला.
तुम्ही एसी बंद करा म्हणून का सांगितले नाही ?म्हणून जरा अधिकाराच्या आवाजात त्यांनी रचनाला विचारले . त्यावर ती काहीच न बोलता किंचीत कसनुसे हसली.तिला मोकळे करण्यासाठी, तिचा संकोच जावा म्हणून, सरानी तिच्या घराबद्दल चौकशी करण्याला सुरुवात केली. आई वडील काय करतात ?इथेच आहेत कि आणखी कुठल्या गावी? भाऊ बहिण किती?शिक्षण कुठे झाले ? प्रश्नाला उत्तरे देता देता हळूहळू तिचा संकोच दूर होत होता .ती मोकळेपणाने उत्तरे देऊ लागली होती .आपण भिजलेले आहोत,आपल्या बरोबर कॉलेजचे प्राचार्य आहेत, ही गोष्ट ती हळूहळू विसरत होती .
तिचे वडिलांवर खूप खूप प्रेम होते. वडिलांचा विषय निघाल्यावर तिला किती बोलू आणि किती न बोलू असे झाले.तिचे आईवडील इथेच राहात होते. वडील इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये ऑफिसर होते .पुढे बोलता बोलता ती म्हणाली, त्यांची उंची, चेहऱ्याची ठेवण तुमच्यासारखीच आहे .मला तुमच्याकडे पाहिले की त्यांचीच आठवण येते.त्यांच्यासारखेच तुम्ही करारी व प्रेमळ असावेत. तुमच्यासारखाच त्यांचा ऑफिसमध्ये आदरयुक्त दरारा आहे.
बोलता बोलता रचना त्यांची तुलना तिच्या वडिलांबरोबर करत होती .रघुनाथरावाना त्यांची मुलगी कल्पना आठवली.कल्पना पुढच्या वर्षी ज्युनिअर कॉलेजला आली असती.कल्पना व रचना यांच्यामधील साम्य पाहून ते आश्चर्यचकित झाले.हे साम्य त्यांच्या पहिल्यांदाच लक्षात आले होते.आता रघुनाथराव पूर्णपणे सावरले होते . त्यांच्या मनाने पलटी घेतली होती.नाहीतरी रचनेशी काल्पनिक संवाद, प्रवास,शृंगार करताना त्यांना थोडे ऑकवर्ड वाटतच होते .परंतु त्यांचे मन तसा विचार करायचे थांबत नव्हते.
गेली काही दिवस आपण माधुरीच्या ठिकाणी रचना आहे अशी कल्पना करत होतो.ही गोष्ट अकस्मात त्यांच्या लक्षात आली .त्यामुळे माधुरीशी आपला संवाद जास्त घनिष्ठ होत होता,वेगळ्या पातळीवर होत होता , हेही त्यांच्या लक्षात आले .त्यांना सगळ्या गोष्टींची गंमत वाटत होती.त्यांना त्यामुळे किंचित हसू आले .सर कां हसला असे रचनाने विचारले .त्यावर काही नाही सहज असे सर म्हणाले
आता ते रचनेकडे पित्याच्या भूमिकेतून पाहू लागले होते.त्यांचा दृष्टिकोन बदलला होता.रघुनाथरावांना आता मोकळे मोकळे वाटत होते .त्यांच्या मनात खोलवर दडलेली अपराधी भावना नाहिशी झाली होती.किल्मिष दूर झाले होते .काजळी वाहून गेली होती . गेले काही दिवस त्यांच्या अंतर्यामी चाललेले द्वंद्व संपले होते.
एवढ्यात रघुनाथरावांची मोबाईल रिंग वाजली.फोनवर माधुरी बोलत होती .घरी यायला किती वेळ आहे अशी चौकशी ती करीत होती.
घराच्या वाटेवर आहे. एका मुलीला तिच्या घरी सोडतो आणि आलोच रघुनाथराव म्हणाले.
मुलीला तिच्या घरी सोडतो असे सांगताना त्यांच्या मनात कोणतेही किल्मिष नव्हते.त्यांचे मन स्वच्छ होते.
*पावसाचा भर ओसरला होता .पाऊस थांबला होता.*
*आकाशात दाटलेली अभ्रे दूर होऊ लागली होती.*
*थोड्याच वेळात स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार होता *.
(समाप्त)
१३/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन