१० बहिणी बहिणी २-३
(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आपण नकळत दिलीपवर प्रेम करू लागलो आहोत हे सुहासच्या लक्षात आले .गेले सहा महिने आपण हळूहळू त्याच्याकडे खेचले जात आहोत आणि ते आपल्या लक्षात कसे आले नाही याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटू लागले.
आपण प्रेमात पडलो आहोत असा साक्षात्कार तिला झाला .
एकदा प्रेमात पडल्यावर आपल्या माणसांशी बोलण्यासाठी, त्याला आपलासा करण्यासाठी,त्याच्यावर आपले इम्प्रेशन जमविण्यासाठी , नाना युक्त्या सुचतात.दिलीप व सुहास यांचा कॉलेजला जाण्याचा रस्ता एकच होता. सुहास नेहमी स्कूटरने कॉलेजला जात असे.तर दिलीप कारने जात असे. सुहासला प्रेमाचा साक्षात्कार झाल्यानंतर चार दिवसांनी तिने दिलीपची ओळख वाढविण्यासाठी एक युक्ती केली . रस्त्यात तिची स्कूटर बंद पडल्याचे नाटक केले आणि ती दिलीपची वाट पाहू लागली .थोड्याच वेळात दिलीप त्याच्या कारने आला. तिला रस्त्यात स्कूटर शेजारी उभी पाहून त्याने कार थांबविली .तिने गाडी बंद पडली सुरू होत नाही,रिक्षाही थांबत नाही,म्हणून सांगितले .दिलीप कदाचित स्कूटर सुरू करण्याचा प्रयत्न करील म्हणून तिने अगोदरच स्कूटर नादुरुस्त करून ठेवली होती .तो खाली उतरून दोष दूर करून स्कूटर चालू करील, अशी तिला भीती वाटत होती. तिने मी मेकॅनिकला फोन केला आहे, तो स्कूटर घेऊन जाईल म्हणून सांगितले.सुदैवाने दिलीपने स्कूटर सुरू करण्याचा प्रयत्न न करता कॉलेजला जायला उशीर होत आहे पटकन गाडीत बसा म्हणून तिला सांगितले.तिने सुटकेचा निश्वास सोडला .तीही पडत्या फळाची आज्ञा समजून गाडीत चढली .कॉलेजपर्यंत जाताना स्वाभाविकच दोघांच्या गप्पा झाल्या .
सुरुवात तर मनाप्रमाणे झाली होती . परत जाताना दिलीप बरोबर चला म्हणून सुचवितो की विसरून जातो, दुर्लक्ष करतो ,ते तिला पाहायचे होते .त्याने कॉलेज सुटल्यावर तिला आता तुम्ही कशा जाणार म्हणून विचारले.तिने बस किंवा रिक्षा म्हणून सांगितले .त्यावर त्याने असे कसे आपली कार आहे ना? चला म्हणून तिला आग्रह केला.त्याच्या बोलण्यातील आपली कार हा शब्द तिला फारच भावला. त्याचे आपल्याकडे लक्ष आहे हे तिच्या लक्षात आले.
अश्या प्रकारे गाडी व्यवस्थित पटरीवर धावू लागली .परत जाताना दिलीपने सुचविले की आपण एकाच वेळी एकाच रस्त्याने कॉलेजला जातो तेव्हा तुम्ही माझ्या कारमधून यायला हरकत नाही .देशाचे जगाचे पेट्रोल वाचेल. तेवढेच पर्यावरण रक्षण. पर्यावरण रक्षणापेक्षा त्याला आपल्या सहवासाची ओढ आहे हे तिला जाणवले. त्यावर तिने हसून संमती दर्शविली.मात्र मी खर्च शेअर करणार म्हणून सांगितले.त्यावर त्याने हसत हसत पुढचे पुढे बघू म्हणून उत्तर दिले .
रोज दोघेही एकत्र गाडीतून येऊ जाऊ लागली .गप्पा होत राहिल्या .ओळख वाढत गेली .स्वभाव जुळतात असे आढळले .एकतर्फी प्रेम होते ते आता दुतर्फी झाले .दोघेही सिनेमा नाटक इत्यादीला बरोबर जाऊ लागली . प्राध्यापकाना, विद्यार्थ्यांना दोघांचीही जवळीक लक्षात आली.स्नेहसंमेलनात त्यांना तसा फिशपाँडही दिला गेला .तो घेताना दोघांनाही अर्थातच गुदगुल्या झाल्या .दोघांनीही आपल्या कुटुंबांशी परस्परांची ओळख करून देण्याचे ठरविले .त्याप्रमाणे सुहासने आपल्या आई वडिलांशी सुतोवाच केले .तिची ताईही अर्थातच त्यावेळी तिथे होती. ताईनेही सुहासला थोडे चिडवून घेतले.त्यावर सुहास लाजून लाल झाली .
ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारी चार वाजता दिलीप सुहासच्या घरी आला .आई वडील ताई यांच्याबरोबर गप्पा झाल्या. दिलीपमध्ये नाव ठेवण्यासारखे काहीही नव्हते .हल्ली मुलानी परस्पर लग्न ठरविले तर आईवडील सर्वसाधारणपणे त्याला संमती दर्शवितात.त्याप्रमाणे आई वडिलांनी संमती दर्शविली .
पुढच्या रविवारी दिलीप सुहासला घेऊन त्याच्या घरी गेला .तिथेही सुहास सर्वांना पसंत पडली .
नंतर दोघांच्याही आई वडिलांची एकत्र बैठक झाली .परस्पर संमतीने लग्न करण्याचे निश्चित झाले .कुठेही काहीही अडथळा न येता सर्व काही सुरळीत चालले होते .व्यवस्थित धूमधडाक्याने लग्न पार पडणार याबद्दल सर्वांची खात्री होती.
परंतु नियती त्यांच्याकडे बघून हसत होती.तिच्या मनात काय होते ते भविष्यात दिसणारच होते.
दिलीपला बघितल्याक्षणी कमलच्या मनात त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते.लहानपणी कमलच्या सर्व गोष्टी सुहासला आवडत असत.ती प्रत्येक गोष्टीत कमलची कॉपी करीत असे .त्यावर लहानपणी विनोदाने एकच नवरा दोघींना कसा काय चालणार असे त्यांचे आई वडील म्हणत असत.त्या सर्व गोष्टी कमलला आठवल्या. आता नियतीने उलटा टर्न घेतला होता .कमल स्वतःला बजावीत होती. हे चूक आहे.तू ताई आहेस. दिलीपबद्दल असा विचार मनात आणणे चूक आहे .तर दुसर्या बाजूने तिला वाटे दिलीप साठी आपणच जास्त योग्य आहोत.
दिलीप जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे येई त्यावेळी कमल त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करीत असे .अतिशय चातुर्याने कुणाच्याही लक्षात न येता कमलहून आपण सर्वार्थाने जास्त योग्य कसे आहोत ते दाखविण्याचा प्रयत्न करीत असे .दिलीपही हुषार चतुर व चाणाक्ष होता .कमलच्या मनातील विचार त्याच्या लक्षात आले . सुहासहून कमल सरस आहे असेही काही क्षणी त्याला वाटले .एकवेळ तो कमलकडे आकर्षित झालाही होता.परंतु स्वतःच्या बहिणीशी लग्न ठरलेल्या मुलाबरोबर , आपण फ्लर्ट करणे योग्य नाही, हे जिच्या लक्षात येत नाही,तिच्यात कुठे तरी न्यून आहे हे त्याच्या लक्षात आले.
सुहास आपल्यासाठी जास्त योग्य आहे .आपण तिच्यावर प्रेम केले आहे .दोघांनी आणाभाका घेतल्या आहेत .कमल कितीही फ्लर्ट करीत असली,काहीही सुचवीत असली, तरी आपण वाहावत जाणे योग्य नाही,हे त्याच्या वेळीच लक्षात आले .त्याने वेळीच आपल्याला सावरले . दोघेही कमल व दिलीप काही काळ वाहवत गेली होती .परंतु दिलीप वेळीच सावरला . कमल स्वतःला सावरू शकली नाही.ती अंतर्यामी वाहवतच गेली. दोन तीन महिन्यात काय झाले ते इतर कुणाच्याही लक्षात आले नाही .
कमल दिलीपच्या प्रेमात एकतर्फी इतकी आकंठ बुडाली की तिला आता त्यातून बाहेर येणे अशक्य झाले .दिलीप आपल्याला होकार देईल असे वाटत असतानाच त्याने एकदम यू टर्न घेतला.त्याचा कमलच्या मनावर खोल परिणाम झाला .कुणाच्या मनात केव्हां काय येईल, कुणाला काय वाटेल, ते सांगता येणे कठीण आहे . कमल एका अर्थी थोडी वेडीपिशी झाली .तीही लवकरच सावरली परंतु आता तिला जीवनात अर्थ वाटत नाहीसा झाला .अश्या वाटण्याला दोन बाजू होत्या. आपल्या बहिणीच्या प्रियकराला मिळविण्याचा प्रयत्न करण्यात पाप आहे आणि ते पाप आपण केले आहे ही एक व्यथा,तर दुसरी आपल्याला हवे असलेले प्रेम मिळणार नाही हवी असलेली व्यक्ती मिळणार नाही ही व्यथा .
कमल या सगळ्या विचारात डिप्रेशनमध्ये गेली.योग्य काय अयोग्य काय याचे तिचे भान काही काळ सुटले. तिचे मानसिक संतुलन ढळले .
ती इतक्या एका टोकाला गेली की तिने स्वतःचे जीवन संपविण्याचे ठरविले. तिची एक मैत्रीण रसायनशास्त्रातील पोस्ट ग्रॅज्युएट होती.तिने केव्हा तरी बोलताना तिला एका रसायनाचे नाव सांगितले होते.ते रसायन पाण्यात किंवा कुठल्याही पेयात टाकून घेता येत होते .ते रसायन रंग व चवहीन होते .पाणी पिणाऱ्याला,पेय पिणाऱ्याला , त्याचा कसलाही सुगावा लागत नव्हता.ते घेतल्यानंतर चार तासांनी हृदयविकाराचा तीव्र झटका येत असे .आणि त्यात व्यक्तीचा मृत्यू होत असे .
अश्या मृत्यूनंतर सहसा पोस्टमार्टेम केले जात नाही.कोणताही संशय न आल्यामुळे डॉक्टर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू असे सर्टिफिकेट देतो .यदाकदाचित काही कारणाने पोस्टमार्टेम झाले तरी या विशिष्ट रसायनाचा सुगावा लागत नसे .कुणाचाही खून करण्याला हे रसायन अत्यंत योग्य आहे असे तिचे त्या मैत्रिणीबरोबर झालेले बोलणे तिला आठवले .
तिचे मानसिक संतुलन ढळलेले असल्यामुळे तिच्या मनात उलटसुलट विचार येऊ लागले.एकदा तिला वाटे की सुहासचे जीवन संपवावे.अापण व सुहास सारखेच दिसत असल्यामुळे दिलीप नंतर आपल्याकडे आकर्षित होईल.आपले प्रेम सफल होईल .तर दुसऱ्या बाजूने तिला आपल्या लहान बहिणीचा खून, आपण जिच्यावर जिवापाड प्रेम केले तिचा खून, यासारखे पाप नाही, यासारखे अयोग्य कृत्य नाही, असे मनात येणे हेच चूक आहे, असे तिला वाटे .
*थोडक्यात तिचा हॅम्लेट झाला होता .*
*मरावे की मारावे हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता.*
*स्वतः ते रसायन घेऊन मरावे कि ते रसायन देऊन सुहासला मारावे , तिचा निश्चय होत नव्हता .*
*मरावे की मारावे या द्वंद्वात ती सापडली होती.*
(क्रमशः)
२२/१०/२०१९©प्रभाकर पटवर्धन