Get it on Google Play
Download on the App Store

१० बस स्टेशन २-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी नंदूला जरा थांब म्हणून सांगितले.तू म्हणतोस ते तसेच आहे की तुला भास होत आहेत ते मी पाहतो.तुझे म्हणणे सत्य असेल तर आपण लगेच या स्टॅन्डवरून त्या दुसऱ्या काळोख्या स्टँडकडे जाऊ.

मी बसेसकडे व लोकांकडे पाहू लागलो.

जाणार्‍या व येणार्‍या  बसेसचे नंबर तेच होते.

चढणारे व उतरणारे लोक तेच होते.

हा कांहीतरी विलक्षण भुताटकीचा प्रकार होता.

पहिल्या स्टँडवरच्या हॉटेल मालकाने इथेच थांबा आणखी कुठे जाऊ नका अशी दिलेली चेतावणी आम्हाला आठवली.

आम्ही पहिल्या स्टँडकडे जाण्याचे ठरविले.येथे आणखी थांबल्यास या भुताटकीचा आपल्यावर कांही वाईट परिणाम होईल अशी भीती आम्हाला वाटू लागली होती.या स्टॅण्डवरून निघून पलीकडच्या स्टँडकडे जाण्यासाठी आम्ही उभे राहू लागलो.

आम्हाला बाकावरून उठता येत नव्हते.जणू कांही फेविकॉल लावून आम्हाला बाकाला चिकटवले होते.आम्ही उठण्याचा आटोकाट प्रयत्न केला.आम्हाला त्या जागेवरून तसूभरही हलता येत नव्हते.    

आता आमच्यासमोर जे होत होते ते हताशपणे पाहण्याशिवाय दुसरा कांहीही मार्ग नव्हता.

या वेळी पहाटेचे दोन वाजले होते.काळोख्या स्टँडवर बसलेले असताना अकस्मात हा बस स्टँड विद्युत प्रकाशाने उजळून गेला होता.हे काय असावे असा विचार करण्यात आमचा थोडा वेळ गेला होता.काळोख्या स्टँडवर भीती वाटत होती.या स्टँडवर वेळ चांगला जाईल.कदाचित आम्हाला कालवणला जाण्यासाठी बस मिळेल   अशा आशेने आम्ही या स्टँडवर आलो होतो.सुरुवातीला आम्ही विचारले तेव्हा सकाळपर्यंत बस नाही म्हणून सांगण्यात आले होते.थोड्याचवेळात नंदूच्या लक्षात घोळ आला.मलाही "कुछ तो गडबड है" असे प्रकर्षत्वाने जाणवले. काळोख्या स्टँडवर जाण्यासाठी  आम्ही निघालो पण आम्हाला उठता येत नव्हते.हताशपणे जे चालले होते ते पहाण्याशिवाय दुसरे गत्यंतर नव्हते.

एक बस येऊन उभी राहिली.त्यातून काही पॅसेंजर उतरले.एका उतारूचा वाहकाशी कांहीतरी वाद चालू होता.वाद म्हटला कि भोवती चार लोक जमतातच त्याप्रमाणे बसमधील उतारू त्यांच्याभोवती जमले होते.हळूहळू वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागले.शेवटी तारस्वरात त्यांचे मीमी तूतू सुरू झाले.नेहमीप्रमाणे वाहकाच्या मदतीला चालक आला.काय झाले कुणास माहीत वाहकाच्या तोंडून एखादी शिवी गेली असली पाहिजे.उतारूने वाहकाची कॉलर पकडली आणि त्याच्या कानशिलात एक ठेवून दिली.

एका बाजूला एसटीची मंडळी व दुसऱ्या बाजूला उतारू व त्याचे मित्र असा सामना सुरू झाला.एकाएकी त्यातील एक भांडखोर उतारू बसमध्ये गेला.त्याने हातात एक कॅन घेतला.त्यातील द्रवपदार्थ बसमध्ये सर्वत्र शिंपडण्यास सुरवात केली.ते बहुधा पेट्रोल असावे.बाहेर येऊन त्याने एक पेटती काडी बसमध्ये भिरकावली.बसने पेट घेतली. डिझेल टाकीचा स्फोट झाला. स्फोटाबरोबर  बस आकाशांत उंच उडाली.ती येऊन शेजारी उभ्या असलेल्या बसवर पडली.एकामागून एक स्फोट होऊ लागले.दोन्ही बसचे पेटते तुकडे आम्ही बसलो होतो तिथे येऊन पडू लागले.बस स्टेशनमधील लोक एकामागून एक जळू लागले मृत्युमुखी पडू लागले.सर्व बसस्टँडने पेट घेतला होता.आम्ही आता मरणार याची आम्हाला खात्री पटली होती.अजून आमच्या अंगावर एखादा पेटता तुकडा येऊन पडला   नव्हता.पेटते तुकडे ज्यांच्या ज्यांच्या अंगावर येऊन पडत होते ते तिथल्या तिथे ढेर होत होते.जिकडे तिकडे  लोकांच्या  किंकाळ्या ऐकू येत होत्या.होणारा आतंक,चालणारा विनाश,कानाचा पडदा फाडणार्‍या  भेदक किंकाळय़ा, यांनी  आसमंत भरून गेले होते. 

आम्ही अजून जिवंत कसे याचेच आम्हाला आश्चर्य वाटत होते.खरे म्हणजे आश्चर्य वाटण्याच्या,घाबरण्याच्या पलीकडे आम्ही गेलो होतो.थोड्याच वेळात सर्वत्र भग्नावशेष आणि  प्रेतांचा खच पडला होता.आम्ही दोघेही सुन्न अवस्थेत बसून होतो.एवढा हाहा:कार उडालेला असतानाही आम्ही जिवंत कसे हा विचारही आमच्या मनात आला नव्हता.   

एवढा आतंक चाललेला असतानाही विद्युतप्रकाश तसाच होता.आम्ही आता थोडे थोडे भानावर येऊ लागलो होतो.पहाटेचे पांच वाजले होते.एकाएकी विद्युत प्रकाश नाहीसा झाला.सर्वत्र काळोख दाटला होता.चांदणी रात्र नव्हती.आकाशात चांदण्या चमचम करीत होत्या.या सर्व आतंकातून बाहेर पडावे आणि काळोख्या स्टँडकडे जावे म्हणून आम्ही उभे राहिलो.एवढ्या विनाशामध्ये आम्ही बसलेले बाक सुरक्षित होते.जणू कांही त्याच्याभोवती अदृश्य सुरक्षा कवच होते.यावेळी आम्हाला उभे राहता आले.कांहीतरी भुताटकी  आहे असा आम्हाला संशय आला होता तेव्हां आम्ही पळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फेविकॉल  लावल्याप्रमाणे आम्ही बाकाला चिकटून गेलो होतो.आता आमची सुटका झाली होती.

आम्ही पहिल्या काळोख्या स्टँडकडे धूम ठोकली.मारुतीच्या घुमटीमध्ये पणती तेवत होती.संकटातून वाचविल्याबद्दल भक्तिभावे मारुतीला नमस्कार करून आम्ही बाकावर येऊन बसलो.हळूहळू झुंजूमुंजू होऊ लागले होते.थोडय़ाच वेळात चांगले उजाडले.स्टँडवर उतारू हळूहळू जमा होऊ लागले होते.तेवढ्यात आमच्या ओळखीचा हॉटेलचा मालक आला. 

त्याने हॉटेल उघडले. आम्ही त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये शिरलो.त्याला कडक डबल चहाची ऑर्डर दिली.स्टँडसमोरच्या जागेत काय आहे अशी विचारणा केली.त्याने आम्हाला असे कां विचारता म्हणून चौकशी केली.रात्री आम्हाला आलेला अनुभव आम्ही त्याला सांगितला.

हॉटेल मालक म्हणाला,मी तुम्हाला या स्टँडच्या बाहेर जाऊ नका इथे तुम्ही सुरक्षित आहात असे सांगितले होते.त्याचवेळी समोर प्रकाश दिसला बसेस येता जाताना दिसल्या तरी जाऊ नका असे सांगायला हवे होते.तुम्ही उगीच घाबराल म्हणून सांगितले नाही.मला वाटले तुम्ही बाकावर झोपून जाल.समोर काय चालले आहे त्याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही.आम्ही त्यावर समोर काय चालले होते म्हणून विचारले.हॉटेल मालकाने असे तिथे गेली दोन वर्षे रोजच चालते असे सांगितले.काल तुम्ही जे बघितले ती घटना प्रत्यक्ष तशीच दोन वर्षांपूर्वी घडली.अगोदर बसस्टँड तिथे होता.सर्व विनाशानंतर तिथे पुन्हा बस स्टँडची उभारणी करण्याचा एसटी कॉर्पोरेशनचा विचार होता.

परंतु कांही दिवसांनंतर तिथे रोजच तो आतंक पुन्हा पुन्हा दर रात्री होऊ लागला.त्या रात्री जे जे घडले ते ते पुन्हा पुन्हा तसेच दर रात्री घडू लागले.

त्या दिवशी रात्री तिथे असलेली सर्व मंडळी बसच्या झालेल्या स्फोटामध्ये मृत्यू पावली.त्यातील कुणालाही पुढील गती मिळाली नाही.त्या जागेत सर्व मंडळी कोंडली गेली आहे.

ती सर्व जागा भारित आहे.ती जागा मुक्त होण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले.प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

सर्वसाधारणपणे सार्वजनिक जागा अशा भुताळलेल्या होत नाहीत.भूत वगैरे सर्व खाजगी व्यक्ती व जागा यांना पछाडते.

परंतु इथे मात्र दर रात्री तोच खेळ पुन्हा पुन्हा होत असतो.त्यामुळे ती जागा सोडून देण्यात आली.

*त्याच्यासमोरची ही जागा घेण्यात आली.आता सर्व बसेस येथून येतात व जातात.* 

*आम्ही कालवणला जाणारी बस केव्हां येणार याची चौकशी केली.*

*नियंत्रकाने बस थोडी उशीरा आहे.आठ वाजता येईल म्हणून सांगितले.*

*तोपर्यंत आम्ही प्रात:कर्मे उरकून घेतली.बस आठ वाजता बरोबर आली.*

*बसमधून जाताना आम्ही त्या वैराण जागेकडे बघत होतो.तिथे फक्त एक मोकळे मैदान होते.*

(समाप्त)

२४/३/२०२२©प्रभाकर  पटवर्धन