०२ अद्भुत श्रीकृष्ण मंदिर २-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
या मंदिराला कडी, कोयंडा, कुलूप,अंगचे कुलूप, साखळदंड, इत्यादी कांहीही नाही.
फक्त दोन दरवाजे आहेत. ते दरवाजे मंत्र म्हणून पुजाऱ्याने बंद केले की कुणालाही उघडता येत नाहीत.फक्त पुजाऱ्याला उघडता येतात.
प्रत्येक दरवाज्याला एक गुंडी(नॉब)आहे.ती गुंडी धरून पुजारी मंत्र म्हणतो.त्यानंतर दरवाजा उघडतो.
गाभाऱ्याचा दरवाजाही तसाच बंद होतो.कडी कुलुपाशिवाय दरवाजे कुलूप लावल्यासारखे बंद असतात.लोहचुंबक वगैरे कुठेही कांहीही नाही.या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे.संपूर्ण भारतात असे मंदिर कुठेही नाही.कृष्णाच्या अंगावर मोजकेच दागिने असतात.मुगुटावर हिरे लावलेले आहेत.त्यांतील कांहीही कुणालाही कितीही प्रयत्न केला तरी काढता येत नाहीत.हिरे सोने इत्यादी शिल्पामध्ये बेमालूम घट्ट बसविलेले आहे.शिल्प संगमरवरी दिसते.परंतु हातोड्याचे प्रहार केले तरीही त्याचा एकही कळपा उडत नाही.यासाठी कोणता संगमरवर वापरला माहीत नाही.कोणत्या हत्याराने संगमरवराची कताई केली ते कळत नाही.त्या संगमरवरामध्ये शिल्प तयार करताना हिरे आणि इतर रत्ने कशी बसविली तेही कळत नाही.ही शिल्पे हे शिल्पकारांना व शास्त्रज्ञांना आव्हान आहे.मंडपातील भिंती शिल्पेही तशीच अभेद्य आहेत.
भोज राजाने जेव्हां मंदिर बांधले तेव्हापासून ही अशीच रचना आहे.त्या बाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते.भोज राजाचे एक गुरू होते.कोणतेही मंदिर चौवीस तास उघडे असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.कुणालाही कोणत्याही प्रहरी देवदर्शनापासून वंचित करता येणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.दरवाजाला कडी कुलूप नसले म्हणजे भक्त केव्हांही दर्शन घेऊ शकेल.जर दरवाजाच ठेवला नाही तर पक्षी वानर माकडे गुरे मंदिरात शिरतील.म्हणून दोन्ही ठिकाणी गर्भगृह व मंदिर याना दरवाजा ठेवण्यात आला होता.भक्तांनी हातात गुंडी धरून कृष्णाचे स्मरण केले की दरवाजा उघडता येईल असा वर त्यांनी दिला होता.हे स्मरण अत्यंत भक्तीपूर्वक करणे आवश्यक होते.नेहमी येणार्या सामान्य भक्तांना गुंडी धरून दरवाजा उघडता येत नसे.कांहीच भक्त दरवाजा उघडू शकत असत. चौवीस तास मंदिर उघडे ठेवणे व्यवहार्य नव्हते.त्यामुळे शेवटी बारा तास मंदिर उघडे ठेवण्याचे ठरविण्यात आले.
त्यानंतर भोज राजाच्या विनंतीवरून त्या गुरूंनी रचनेत बदल केला.फक्त पुजाऱ्याला दरवाजा उघडता व बंद करता येईल अशी व्यवस्था केली.वंशपरंपरागत पुजारीपण चालत आलेले आहे.पुजारी आपल्या मोठ्या मुलाला दरवाजा उघडण्याची व बंद करण्याची शक्ती प्रदान करतो.ही शक्ती कशी प्रदान केली जाते त्याची कुणालाही कांहीही कल्पना नाही. जर एखाद्या पुजाऱ्याला मुलगा नसेल तर तो पुजारी त्याचा वारस कोण ते निश्चित करतो.त्याची अद्भुत शक्ती तो त्या वारसाला प्रदान करतो. जो दरवाजा बंद करतो तोच दरवाजा उघडतो.जो मंत्र दरवाजा बंद करताना म्हणावा लागतो तोच उघडताना म्हणावा लागतो.
हे सर्व ऐकल्यावर मी विचारले प्रत्येकवेळी मंत्र बदलला जातो का?तुमच्या सांगण्यावरून तसे वाटते.त्यावर मंद स्मित करीत रमाकांत म्हणाले बरोबर आहे.मंत्र पुढीलप्रमाणे असतो.विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूची हजार नावे आहेत.दरवाजा बंद करताना त्यातील कोणत्याही दहा नावांचा उच्चार करायचा असतो.जी दहा नावे दरवाजा बंद करताना गुंडीवर हात ठेवून उच्चारली तीच पुन्हा गुंडीवर हात ठेवून उच्चारावी लागतात.आता तुम्ही विचार करा.हजार नावातील कोणतीही दहा नावे घेतली तर क्रमपरिवर्तन आणि संयोजन (permutation and combination) यानुसार असंख्य गट निर्माण होतील.यातील कोणताही गट पुजारी घेऊ शकतो.
आम्ही रमाकांतच्या बोलण्यावर विचार करीत होतो. मी पुढे रमाकांतना विचारले,समजा पुजारी सोडून आणखी कुणी बरोबर तीच दहा नावे उच्चारली, तर दरवाजा उघडेल की नाही?त्यावर रमाकांत म्हणाले बरोबर तीच दहा नावे उच्चारणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही जर ती उच्चारली गेली तर काय होईल माहित नाही. आमची मती गुंग झाली होती.प्रत्यक्ष जाऊन दरवाजा उघडून पाहावे असे आम्ही ठरविले.आम्ही दरवाजाजवळ गेलो.रमाकांतने सांगितल्याप्रमाणे दरवाज्याला कडी कोयंडा कुलूप कांहीही नव्हते.आम्ही दरवाजा ढकलून बघितला .दरवाजा अज्जिबात उघडला नाही.दरवाजा जसा कांही कुलूपबंद होता.रमाकांतच्या सांगण्यावर विश्वास होता आणि नव्हताही.तो खोटे सांगणार नाही याची खात्री वाटत होती.परंतु असे कांही असेल केवळ विष्णूची दहा नावे उच्चारून दरवाजा कुलुप बंद होईल,आणि पुन्हा तीच नावे उच्चारून तो उघडेल,ही गोष्ट कुठेतरी बुद्धीला पटत नव्हती.
जगात अशा अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या नेहमीच्या तर्कशास्त्राला पटत नाहीत.बुद्धीला आकलन होत नाहीत.त्यामागे कांही वेगळेच तर्कशास्त्र असते.ते आपल्याला माहीत नसते.हे सर्व माहीत असूनही रमाकांतच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता.
एवढ्यात संध्याकाळचे चार वाजले होते.जरी भोज राजाच्या गुरूंना मंदिर चौवीस तास उघडे असावे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते सकाळी व रात्री बारा तास उघडे ठेवले जात असे.सकाळी सहा ते बारा व संध्याकाळी चार ते दहा.पुजारी सकाळी सहाच्या अगोदर येऊन पूजा वगैरे सर्व करीत असत.
आम्ही पुजारी पाहून बाजूला झालो.पुजार्यानी गुंडीवर हात ठेवला.तोंडातल्या तोंडात कांहीतरी मंत्र पुटपुटला.रमाकांतच्या सांगण्यानुसार त्यानी विष्णूसहस्रनामातील दहा नावे उच्चारली होती. त्यानी हळूच दरवाजा आंत ढकलला.दरवाजा कोणतीही कुरकुर न करता उघडला.रमाकांतने सांगितलेली गोष्ट खरी होती.पटत नसली तरी मान्य करणे भाग होते.
मंदिराच्या भिंतीवर रामायणातील निरनिराळ्या प्रसंगांची शिल्पे काढलेली होती.एका बाजूला शिल्पा मागून शिल्पामध्ये रामायणातील पूर्ण गोष्ट दाखविलेली होती.रामायणातील सुवर्ण हरिण व सीता हरणाचा प्रसंग शिल्पित केलेला होता.दुसर्या भिंतीवर निसर्ग शिल्पे होती.मंदिराला आंतून व बाहेरून रंगरंगोटी केलेली होती.मंदिर छोटेसे परंतु देखणे होते.
आम्ही श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्याजवळ गेलो.गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता.त्यालाही कुठे कडीकोयंडा अंगचे कुलूप इत्यादी दिसत नव्हते.श्रीकृष्णाची मूर्ती बघण्याच्या बहाण्याने मी दरवाजा ढकलून पाहिला.दरवाजा उघडत नाही असे पाहिल्यावर जोर लावून उघडण्याचा प्रयत्न केला.दरवाजा जागच्या जागी होता.आम्ही आंतील शिल्प बघू लागलो.गाभाऱ्याच्या चारी बाजूंनी कुठूनही शिल्प बघितले तरी गाई कृष्णाकडे व कृष्ण आमच्याकडे म्हणजेच सर्व जण आमच्याकडे पाहात आहेत असे वाटत होते. हजार वर्षांपूर्वीच्या त्या अज्ञात शिल्पकाराला मी मनोमन नमस्कार केला.त्याचे कौतुक करण्याला शब्द अपुरे पडत होते.सर्व शिल्प संगमरवरामध्ये होते.छिन्नी चालविण्यामध्ये पॉलिश करण्यामध्ये किंचित फरक आणि सर्व शिल्प बिघडले असते.इतका अचूकपणा खरोखरच आश्चर्यजनक होता.पुजारी कुठेतरी बाहेर गेला होता.गुंडीवर हात ठेवून मी विष्णुसहस्त्रनामातील कोणते तरी श्लोक म्हटले.विष्णूची दहा नावे घेतली दरवाजा अर्थातच उघडला नाही.आंतील दरवाजा पुजारी सायंआरतीच्या वेळी उघडणार होता.आरतीपर्यंत आम्ही थांबलो असतो तर हॉटेलवर जायला उशीर झाला असता. तरीही आम्ही आरतीपर्यंत थांबण्याचे ठरविले.तोपर्यंत मंदिराच्या विस्तृत प्रांगणात एक चक्कर मारली.
तिन्हीसांजा झाल्या होत्या. पुजार्यानी गुंडीवर हात ठेवून मंत्र पुटपुटला.दरवाजा अल्लद उघडला.सायंआरती झाली प्रसाद वाटण्यात आला.पुजारी अर्थातच रमाकांतच्या ओळखीचे होते. रमाकांतने पुजार्याशी आमची ओळख करून दिली.आम्ही त्यांच्याजवळ गप्पा मारू लागलो. त्यानीही रमाकांतने सांगितलेल्या दरवाजा बंद करण्याच्या व उघडण्याच्या गोष्टीला दुजोरा दिला.
ते म्हणाले हे मंदिर भोज राजाच्या गुरूने सांगितल्यावरून येथे बांधण्यात आले.त्या गुरूंना दृष्टांत झाला होता.त्या काळात सुमारे हजार वर्षांपूर्वी भोज राजा व गुरू येथे आले.त्यांनी परिसराची पाहणी केली.गुरूंना दृष्टांतानुसार येथे कृष्णाची मुरली वाजवीत असलेली, कदंब वृक्षाखाली पारावर बसलेली, लहान मूर्ती मिळाली.येथे मंदिर बांधून त्यांत ती मूर्ती ठेवण्यात आली.यमुना गाय इत्यादी शिल्पे नंतर त्यावेळी तयार करण्यात आली.
गुरूंची इच्छा चौवीस तास मंदिर उघडे ठेवावे अशी होती.प्रत्यक्षात त्या काळीही ते व्यवहार्य नव्हते.शेवटी बारा तास मंदिर उघडे ठेवण्याचे ठरविले.गुरूंनी त्या वेळी मंदिर अभिमंत्रित केले होते.त्यामुळे अजूनही सहस्रनामातील विष्णूच्या कोणत्याही दहा नावांनी मंदिराचे दरवाजे बंद होतात व उघडतात.
या मंदिराची पुढील खास वैशिष्ट्ये सांगता येतील.
१)संगमरवरी शिल्प अभेद्य आहे. अभेद्य संगमरवर कुठून पैदा केला? का संगमरवरावर शिल्प तयार झाल्यावर कांही रासायनिक प्रक्रिया करून तो अभेद्य बनवण्यात आला.याचा उलगडा संशोधकच करू शकतील.
२)संगमरवर अभेद्य असेल तर त्यातून शिल्प कसे तयार केले?त्यासाठी कोणती हत्यारे वापरली?
३)शिल्प तयार करून रासायनिक प्रक्रिया केली असेल तर ती रासायनिक प्रक्रिया कोणती? जर ती माहीत झाली तर आपल्याला शिल्पे अभेद्य करता येतील.(समाजकंटकांकडून शिल्पाची, पुतळ्याची, मोडतोड केल्याचे जे पाहायला,ऐकायला मिळते तसे समाजकंटकांना करता येणार नाही.)
४)तीन बाजूनी पाहिले तर शिल्पातील सर्व आपल्याकडे पाहतात असे कदाचित दिसू शकेल.परंतु पाठीमागील खिडकीतून पाहिल्यावरही तसेच कसे दिसते?अशी शिल्पकला कुठेही आढळत नाही.या शिल्पकलेचे मर्म कुणी शोधून काढील काय?
५)केवळ विष्णूची कोणतीही दहा नावे उच्चारून दरवाजा कुलूपबंद कसा होतो? हे गूढ काय आहे?हे गूढ उकलते तर अनेक दरवाजांची कुलपे काढून टाकता येतील.केवळ मंत्रोच्चाराने दरवाजे कुलुप बंद होतील व उघडतील.
*आम्ही आश्चर्याने पुजारी सांगत होते ते ऐकत होतो.*
*रमाकांत सांगत होते तेव्हां आम्हाला त्यांत कुठेतरी अफवा आहे असे वाटत होते.परंतु रमाकांत सत्यस्थितीचे वर्णन करीत होते.*
*आम्ही पुन्हा एकदा कृष्ण दर्शन घेतले.बाहेरून एकदा मंदिराला व भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला.*
*टॅक्सीत बसून हॉटेलकडे निघालो.खरेच ते मंदिर, अद्भुत कृष्णमंदिर होते.*
*आम्ही रमाकांतचे बोलणे डावलले असते, तिकडे लक्ष दिले नसते, तर खरेच एका मोठय़ा अनुभवाला मुकलो असतो.*
(समाप्त)
२७/९/२०२१©प्रभाकर पटवर्धन