Get it on Google Play
Download on the App Store

०७ जादूचे बेट ३-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

जीवधारणेसाठी इथे फळफळावळ आहे.पाणी आहे.पूर्ण शांतता आहे.

आम्हा साधूंना आणखी काय पाहिजे असे ते म्हणाले.

तुम्ही इथे कसे आलात असे मी त्यांना विचारले.त्यावेळी त्यांनी आम्हा साधूंना अनेक विद्या माहीत असतात.आम्ही त्या विद्येचा वापर करून आकाशमार्गे इथे आलो.असे उत्तर दिले

तुमच्या त्या स्वार्थी माणसांनी गजबजलेल्या जगात राहण्यापेक्षा येथे रहाणे अतिउत्तम असे ते म्हणाले.

येथे अनेक नैसर्गिक गुहा आहेत.त्यामध्ये आम्ही आनंदाने राहतो.

प्रत्येकजण शक्यतो स्वतंत्र गुहेत राहतो.नैसर्गिक गुहा मिळाली नाही तर आम्ही अंतर्ज्ञानाने अशी गुहा कोणत्या बेटावर आहे ते जाणतो आणि तिथे जातो.

हे साधू या बेटावरून सुटका करण्यासाठी आपल्याला मदत करतील असे मला वाटू लागले.  

मी त्यांना पाणी कुठे आहे असे विचारले.त्यावर त्यांनी डोंगरात झरे आहेत असे सांगितले.ते पुढे म्हणाले मी आता झर्‍यावरच जात आहे माझ्या बरोबर चल.जवळच एक डोंगर होता तो ते चढू लागले.मीही त्यांच्याबरोबर होतोच.थोडे चढून गेल्यावर त्या डोंगरात एक आरपार गुहा होती.त्या बोगद्यातून चालत डोंगराच्या पलिकडच्या बाजूला आम्ही गेलो.

डोंगराची ही बाजू आम्ही आलो त्या बाजूपेक्षा सर्वस्वी निराळी होती.आम्ही आलो ती डोंगराची बाजू रुक्ष होती. त्यावर फक्त मोठमोठे दगड होते.या बाजूला डोंगरावर सर्वत्र हिरवळ दिसत होती.हिरव्यागार गवताने आच्छादलेला डोंगर एखादी हिरवी शाल पांघरल्यासारखा दिसत होता.डोंगरात अधूनमधून झरे वाहात होते.ते पुढे एकत्र येऊन एक तलाव निर्माण झाला होता.या तलावातून एक छोटीशी नदी उगम पावत होती.ती पुढे अर्थातच समुद्राला मिळत असणार.या बाजूला पाणी होते, हिरवळ होती, परंतु नारळ, पोफळी,आंबा,काजू, फणस,कसलेच वृक्ष नव्हते.डोंगराच्या दोन बाजू दोन जगांसारख्या हाेत्या.एका बाजूला वृक्ष व वनराई होती.दुसऱ्या बाजूला पाणी आणि बारीक गवत सर्वत्र वाढलेले होते.आलो त्या बाजूला मोकळी मोठी मैदाने होती.इथे मी जो कांही पाहिला तो भाग उंच सखल असा होता.  

डोंगराच्या एकाबाजूला अन्न होते दुसर्‍या बाजूला पाणी होते.दोन्ही बाजू एकत्र केल्यावर चित्र पूर्ण होत होते.दोन्ही बाजूंना जोडणारा डोंगरातील बोगदा मजेशीर होता.त्यात गारवा होता.वार्‍याची येणारी मंद झुळूक गार वाटत होती.तो बोगदा नसता तर पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी डोंगर चढून उतरावा लागला असता. या बेटावरील आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट माझ्या लक्षात आली.समुद्रकिनाऱ्यापासून अंतर्भागात डोंगरांच्या या बाजूला किंवा त्या बाजूला कुठेही वारा नव्हता.वाऱ्याची मंद झुळूक फक्त नैसर्गिक बोगद्यामध्ये होती.     

मी त्या ऋषितुल्य व्यक्तीला तुम्ही जसे आकाशमार्गे येथे आला तसे तुम्ही मला आकाशमार्गे भारतात पाठवू शकता का असे विचारले.त्यावर त्यांनी कांहीच उत्तर दिले नाही.बहुधा ती शक्ती त्याना असावी.परंतु त्याचा वापर करण्याची त्यांची इच्छा नसावी.माझ्या प्रश्नावर ते एवढेच म्हणाले,तुझी भारतात जाण्याची व्यवस्था होईल.कशी होईल ते अर्थातच त्यांनी सांगितले नाही. मी त्यांना त्यांचे नाव विचारले.त्यांनी दधिची म्हणून नाव सांगितले.आपल्या पुराणातील दधिचीची कथा मला आठवली.

माझा निरोप घेऊन ते क्षणात अदृश्य झाले.त्यांना ज्याप्रमाणे आकाशमार्गे ये जा करता येत होती त्याचप्रमाणे ते हवे तेव्हा अदृश्यही होऊ शकत होते.त्यांची इच्छा होती म्हणून ते मला दिसले होते.नाहीतर तो बोगदा व पलीकडची बाजू माझ्या लक्षात बहुधा आली नसती.पाण्याशिवाय शहाळ्याचे पाणी पीत राहावे लागले असते.

वारा नाही,उकाडा नाही, चल जीवसृष्टी नाही,डोंगराच्या दोन बाजू जवळजवळ परस्परविरोधी, असे हे बेट वैशिष्ट्यपूर्ण दिसत होते.                  

अन्नाचा प्रश्न सुटला होता.पाण्याचा प्रश्नही सुटला.मात्र त्यासाठी रोज बोगद्यातून डोंगराच्या पलीकडे जाणे आवश्यक होते.पाणी नेण्यासाठी कांहीही साधन मला दिसत नव्हते.अर्थात फळफळावळ खाऊन,नारळ पाणी व मलई खाऊन पाण्याशिवाय दिवस मी काढू शकलो असतो.हे ऐकायला बरे वाटले तरी प्रत्यक्षात अनेक दिवस तसे राहणे कठीणच होते.

पाण्यासाठी मी एक युक्ती केली.एका अणकुचीदार दगडाच्या साहाय्याने एका नारळाचा आंतील भाग जमेल तेवढा स्वच्छ केला.असे चार नारळ तयार केले.बोगद्यातून पलीकडे जाऊन ते नारळ जमेल तेवढे पाण्याने स्वच्छ केले.त्यात पाणी भरून त्यांची कावड करून डोंगराच्या फळफळावळ असलेल्या बाजूला घेऊन आलो.आता तहान लागली की पाण्याची सोय झाली होती.           

परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय इलाज नव्हता.जरी रस्ते, रेल्वेगाड्या, मोटारी, नव्हत्या तरी आकाशातून  विमाने जाताना दिसत असत.निदान रोज दोन विमाने तरी जात असत.मला एक कल्पना सुचली.मोकळ्या पटांगणात कशाच्या तरी सहाय्याने जर हेल्प(HELP) अशी इंग्रजी अक्षरे काढली.तर येणार्‍या  जाणार्‍या  विमानातील कुणाचे तरी लक्ष तिकडे कदाचित जाईल.कुणीतरी संकटात आहे असे जगाला कळेल.मोठे वादळ आणि गलबतांची झालेली वाताहत सगळ्या जगाला कळलेली असणारच.कुणीतरी मदतीला येईल.आपली सुटका होईल.

स्वस्थ बसण्यापेक्षा आपल्याला उद्योगही मिळेल.मी लगेच मोठाले दगड व फांद्या यांचा उपयोग करून  HELPअशी  इंग्रजी अक्षरे एका मोठ्या मैदानात काढली. डोंगराच्या या बाजुला बरीच लहान मोठी मैदाने होती.प्रत्येक मैदानात मी HELP अक्षरे निरनिराळय़ा साधनांनी काढण्याचा सपाटा लावला.कधी दगड, कधी फांद्या, कधी पाने, कधी मैदानात खोदाई,असे विविध मार्ग मी वापरत होतो.समुद्रकिनारा लांबलचक होता.त्याची रुंदी चांगली होती.त्यावरही HELPअक्षरे मी काढली.लाटांमुळे,भरतीमुळे तो तेवढासा सफल होत नसे.रोज निदान दोन विमाने आकाशातून जात असत.एखाद्याचे तरी आपल्याकडे लक्ष जाईल आणि आपली सुटका होईल या आशेवर मी दिवस काढत होतो. 

असेच पंधरा दिवस गेले.विमाने येत जात होती.एक दोनदा तर एक हेलिकॉप्टर चक्कर मारून गेले. कुणालाही माझी हेल्प अक्षरे दिसली नसावीत.माझी सुटका करायला कुणीही आले नाही.माझी दाढी वाढली होती.केसही अस्ताव्यस्त झाले होते.तेच कपडे वापरल्यामुळे,कपडे खूप मळले होते.एकदा मी धुण्याचा प्रयत्न केला तर ते स्वच्छ करताना जागोजागी फाटू लागले.कपडे धुण्याचा प्रयत्न मी सोडून दिला. मी विचित्र दिसू लागलो होतो.एखाद्या जंगली मनुष्यासारखा मी दिसू लागलो होतो.ते स्वामी एकदाच भेटले.त्यांनी पुन्हा दर्शन दिले नाही.अनेक साधू अनेक गुहातून राहतात असे स्वामी म्हणाले होते.प्रत्यक्षात येता जाताना मला कुणीच दिसले नाही.मीही डोंगरावर चढून गुहांचा शोध घेतला नाही.     

मी येथे बेटावर येऊन किती दिवस झाले असतील ते हळूहळू विसरू लागलो होतो.माझी पत्नी व मुले रत्नागिरीत वाट पाहत असतील. त्यांनीही मी जिवंत असल्याची आशा सोडली असेल असे मला वाटत होते.सारंग तरी मुक्कामाला भाट्ये खाडीत पोचला होता की नाही देव जाणे.जर पोचला असेल तर तो नक्की माझ्या घरी गेला असणार.वैयक्तिक पातळीवर व सरकारी पातळीवरही तो माझा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न  करीत असणार असा विचार माझ्या मनात आला.अर्थात हे बेट सापडणे, त्यावर मी आहे याचा तपास लागणे ही गोष्ट केवळ दैवाधीन होती.

माझे दैव चांगले होते.एके दिवशी मी असाच हेल्प ही अक्षरे काढत होतो.या बेटावर अनेक मैदाने होती.प्रत्येक मैदानात मी हेल्प  ही अक्षरे लिहिण्याचा प्रयत्न करीत होतो.तेवढ्यात माझ्या पुढय़ात एक मुलगी येऊन उभी राहिली.ही मुलगी अकस्मात कुठून आली असा विचार मी करीत होतो. मी तिला खुणेने तसे विचारले.एकदा मराठी इंग्रजी हिंदी या भाषांत ज्या मला येत होत्या त्यात तिला ते विचारावे असे मला वाटले.परंतु यातील एकही भाषा तिला येत असेल असे मला वाटले नाही.   

तिने खुणेनेच मला आकाशाकडे बोट दाखवत तेथून इथे खाली उतरले असे सांगितले.ती अकस्मात मराठी बोलू लागली.तिला मराठी येते हे पाहून मला आश्चर्य वाटले.ती म्हणाली आम्हाला कोणत्याही भाषा बोलता येतात.दुसऱ्याच्या अंतरंगात उतरून आम्ही त्याची भाषा आत्मसात करतो.आम्ही आकाशातून अनेकदा ये जा करीत असतो.पंख नसतानासुद्धा आकाशातून अवगाहन करण्याची विद्या आम्हाला ज्ञात आहे.आठ दहा दिवस मी आकाशातून जाताना तुला पाहात आहे.तू ठिकठिकाणी हेल्प लिहिलेले मी वाचले.तुला मदत करावी म्हणून मी खाली उतरले आहे.

मी तिला माझी सर्व हकिगत सांगितली.उद्या तुझी सुटका करून आम्ही तुला रत्नागिरीला तुझ्या घरात पोचवू असा शब्द तिने दिला.आजच तुला पोचवले असते.परंतु आज मी एकटी आहे.उद्या माझ्या मैत्रिणीसह कांही सुटकेचे सामान घेऊन येईन.असे आश्वासन देऊन ती निघून गेली.पंखाशिवाय आकाशमार्गे जाताना तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो.ते स्वामीही असेच म्हणाले हाेते.अनेक साधू आकाशमार्गे या बेटावर आले आहेत असे त्यांच्या बोलण्यात आले होते.

ही मुलगी आपण तिला परी नाव देऊया.तेजस्वी होती. देखणी होती.तिला अनेक गुप्त विद्या   माहीत असाव्यात.

दुसर्‍या दिवशी ती तिच्या मैत्रिणीला घेऊन आली. तू कुठे राहते असे मी तिला विचारले.येथून जवळच एक बेट आहे त्यावर आम्ही राहतो असे उत्तर तिने दिले. बरोबर त्यांनी एक काठी व खुर्ची आणली होती.त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले. काठी खुर्चीमध्ये अडकवून त्या दोघींनी आकाशात माझ्यासह उड्डाण केले.माझ्या बंगल्याच्या गच्चीवर मला अलगद सोडून त्या दोघी आकाशमार्गे निघून गेल्या.त्यांचे आभारही मी मानू शकलो नाही.

मी गच्चीमधून खाली जाण्याचा प्रयत्न केला.दरवाजा बंद होता.हाका मारून ठोठावूनही कुणी दरवाजा उघडला नाही.शेवटी मी तसाच गच्चीत खुर्चीत बसून राहिलो.   

दुसऱ्या दिवशी गच्चीचा दरवाजा उघडून सौभाग्यवती गच्चीत आली.तिचा चेहरा रडवेला होता.मी परत येण्याची आशा तिने सोडून दिली होती.मला गच्चीत पाहून तिचा आनंद गगनात मावेना.

मी आल्याची बातमी सर्वांना कळली.सारंग मला भेटायला आला.मी कुठे होतो आणि परत कसा आलो याची प्रत्येकजण चौकशी करीत होता.मी सांगितलेल्या हकिगतीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.      

प्रत्येकाला मी ती काठी व वेगळ्याच आकाराची खुर्ची दाखवीत होतो.काठी व खुर्ची कोणत्या धातूपासून बनवली आहे ते कोणाच्याच लक्षात येत नव्हते.तो एक अज्ञात धातू होता.तज्ज्ञानाही तो धातू ओळखता येत नव्हता.   

माझ्या दिवाणखान्यातील  एका कोपऱ्यात ती काठी व खुर्ची ठेवलेली आहे.ज्यांना मी थापा मारतो असे वाटत असेल त्यांनी माझ्याकडे येऊन ती अवश्य पहावी. 

ती काठी,लाकडाची वाटली,तशी दिसली,तरी ती  लाकडाची नाही.पृथ्वीतलावरील नाही.ते लाकूड नसून तोही एक प्रकारचा धातू असावा.खुर्चीही वेगळ्याच आकाराची आणि वेगळ्या धातूपासून बनवलेली आहे.तो धातू कोणालाही ओळखता येत नाही.

*डिसेंबर दोन हजार  अठरा मधील पेपर आपण पाहिले.तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा,परिणामी अरबी समुद्रात आलेले चक्री वादळ, समुद्रात गेलेल्या बोटी व त्यांची झालेली वाताहत, याबद्दल तुम्हाला बातम्या वाचायला मिळतील.*

* एका पेपरच्या वार्ताहराने माझी मुलाखत घेतली होती.तो पेपर मी फ्रेम करून ठेवला आहे.*

*आपल्याला तोही पाहायला मिळेल.सुदैवाने सारंग बचावून परत आला.*

*त्याने विम्याचे पैसे मिळाल्यावर नवीन मच्छीमारी बोट विकत घेतली आहे.तो अधूनमधून बोटीबरोबर समुद्रात जातो.*

*तो तुम्हाला ते वादळ आणि सर्व हकिगत माझ्यापेक्षाही खुलवून सांगेल.* 

(समाप्त)

२७/३/२०२२©प्रभाकर  पटवर्धन