Get it on Google Play
Download on the App Store

०९ बस स्टेशन १-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

आम्ही मराठवाड्यात प्रवास करीत होतो.कालवण या गावी जायचे होते.नाशिक जवळ  कळवण म्हणून एक गाव आहे. मराठवाड्यातील या गावाचा उच्चार कालवण म्हणून लोक करीत होते.कदाचित ते कळवण असेही म्हणत असतील.नाहीतरी एकाच नावाची अनेक गावे असतातच.  आम्हाला कालवण म्हणून ऐकू येत होते.अनंतपूरहून कालवण या गावी.आम्ही म्हणजे मी व नंदू जात होतो.आम्हाला  कालवण या गावी जायचे होते.अनंतपूर कालवण अंतर  सुमारे अडीचशे किलोमीटर असावे.आम्ही बसने प्रवास करीत होतो.रात्री आठच्या सुमारास आम्ही बसमध्ये बसलो होतो.आम्हाला पुढे जायचे नाही कालवण गावी जायचे आहे असे वाहकाला  स्पष्ट सांगितले होते.कालवण गांव येताच आम्हाला उठव,तसे सांग असे त्याला निक्षून सांगितले होते.झोपेमध्ये कालवण गाव निघून जावे आणि आम्ही कुठेतरी पोहोचावे असे होऊ नये अशी इच्छा होती.रस्त्यांची परिस्थिती,वाटेतील विविध स्टॉपस् हे लक्षात घेता साधारण दोन पर्यंत आम्ही कालवणला पोहोचू असे आम्हाला सांगण्यात आले होते.

बसच्या गतीबरोबर, तालावर आम्हाला झोप लागली होती.कंडक्टर जोराजोरात कालवण कालवण म्हणून ओरडत होता. आम्ही घाईघाईने बसमधून उतरलो.आम्ही उतरल्याबरोबर कंडक्टरने डबल बेल मारली आणि बस निघून गेली.आम्ही घड्याळात पाहिले तो रात्रीचे साडेअकरा वाजले होते.दोन पर्यंत पोहोचू अशी कल्पना असताना साडेअकराला इतक्या लवकर आपण कसे काय पोहोचलो असे आम्ही आपसात बोलत होतो.मी व माझा मित्र नंदू प्रवास करीत होतो.

बस स्टॅण्डच्या बाहेरच बस उभी करून आम्हाला उतरवून देण्यात आले होते.बस स्टॅन्डमध्ये जावे.चौकशी करावी.गावात जाण्यासाठी एखादे वाहन मिळाले तर पाहावे असा विचार आम्ही केला.स्टँडवर कालवणी स्टँड असे चक्क लिहिलेले होते.

कालवण आणि कालवणी या नावाची दोन निरनिराळी गावे असावीत.वाहकाचा  ऐकण्यात कांहीतरी गोंधळ झाला असावा.त्याने आम्हाला कालवणी या गावी उतरुन दिले होते.किंवा कदाचित आमचा ऐकण्यात गोंधळ उडाला असावा.तो कालवणीचे कुणी उतारू असतील तर त्यांच्यासाठी ओरडला होता.आम्ही कालवण समजून उतरलो होतो.

कालवणी बसस्टँडमधील हॉटेलमालक हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होता.आम्ही त्याला पुन्हा एकदा गावाचे नाव विचारले.त्याने कालवणी म्हणून सांगितले.तेथून कालवण किती अंतर आहे असे विचारता त्याने सुमारे शंभर किलोमीटर असे सांगितले.बस स्टॅण्डवर बसची टायमिंग्ज दिलेली होती.सकाळपर्यंत कालवणला जायला गाडी नव्हती.आम्ही हॉटेल मालकाला विचारून पुन्हा एकदा खात्री करून घेतली.आता सकाळपर्यंत इथेच बाकावर थांबण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग दिसत नव्हता.स्टँडवर आणखी कुणी उतारू दिसत नव्हते.

अनोळखी ठिकाणी स्टँडवर थांबणे आम्हाला धोक्याचे वाटत होते.जवळपास एखादे हॉटेल आहे का म्हणून आम्ही चौकशी केली.गाव लहान आहे गावात हॉटेल नाही तुम्हाला स्टँडवरच थांबावे लागेल असे हॉटेल मालक म्हणाला.हॉटेल मालक पुढे म्हणाला.तुम्हाला घाबरण्याचे कांहीच कारण नाही.इथे कुणीही तुम्हाला कांहीही करणार नाही.स्टँडवर बाकावर तुम्ही खुशाल झोपा.सकाळी कालवणला जाणारी बस येईल.येथे कोपऱ्यात एक मारुतीची छोटी घुमटी आहे.जोपर्यंत तुम्ही स्टँडच्या परिसरात आहात तोपर्यंत तुमच्यावर मारुतीची छाया आहे.स्टँडबाहेर मात्र जाऊ नका. अशी त्याने चेतावणी दिली.आम्हाला ती चेतावणी आहे असे लक्षातच आले नाही.आणि त्यामुळेच आमच्यावर पुढील प्रसंग ओढवला. 

आम्ही त्याला चहा करून द्यायला सांगितला.त्याने आम्हाला चहा करू दिला.खरे म्हणजे आम्ही स्टँडवर आलो तेव्हां तो कुलुप लावून घरी जाण्याच्या तयारीत होता.तरीही त्याने आमच्यासाठी पुन्हा हॉटेल उघडले व चहा केला.हॉटेल मालक निघून गेल्यावर सर्वत्र भयाण शांतता पसरली.एकही माणूस आसपास  दिसत नव्हता.कुठे चिटपाखरुही दिसत नव्हते.रातकिडय़ांची किरकिर ऐकू येत होती.स्टँडवरील दिवे मंद प्रकाशाचे होते.मंद प्रकाशामुळे जास्त भीतीचे वातावरण निर्माण होत होते.काळोखाची जास्त तीव्रता जाणवत होती.विजेचे दिवे बरेच दिवसांत पुसले नसावेत.त्यावर खूप धूळ बसली होती. दिवे चोरीला जावू नये म्हणून त्यावर जाळ्या बसवलेल्या होत्या.त्यावर कोळ्यानी कोळिष्टकांचे धागे विणले होते.कशाचीच सफाई झालेली दिसत नव्हती.आधीच दिवे कमी प्रकाशाचे होते.त्यात त्यावर बसलेली धूळ,लोखंडी जाळी,त्यावर कोळीष्टके यामुळे काळोख कमी होत होता कि वाढत होता ते कळत नव्हते.

मालक भले आम्हाला शांतपणे  सकाळपर्यंत खुशाल झोपा असे म्हणाला असला तरी या वातावरणात आम्हाला झोप लागणे शक्य नव्हते.तरी बरे आम्ही एकाला दोघे होतो.गप्पा मारत रात्र घालवण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.या विचित्र वातावरणात झोप येणे शक्य नव्हते.मऊ गादीवर उशी घेऊन झोपण्याची सवय असलेल्या आम्हाला कठीण बाकावर झोप लागणे शक्य नव्हते. तोही भाग वेगळाच.

बसमधून उतरण्याअगोदर वाहकाजवळ हे गाव कालवणच आहेना अशी खात्री करून घेणे जरुरीचे होते.कालवण आणि कालवणी अशा नावाची दोन गावे असतील याची आम्हाला  कल्पना नव्हती.आम्ही झोपेत होतो.कालवण शब्द ऐकल्याबरोबर लगबगीने उठून खाली उतरलो होतो.असे करायला पाहिजे होते आणि तसे करायला पाहिजे होते या बोलण्याला आता कांही अर्थ नव्हता.सकाळपर्यंत इथे थांबण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता.सकाळपर्यंत एकही बस या मार्गाने आता जाणार नव्हती.

आम्ही बाकावर बसून गप्पा मारत असताना एकाएकी रस्त्याच्या पलीकडे एक मोठी जागा प्रकाशाने उजळली.तिथून माणसांचा कोलाहल ऐकू येऊ लागला. मगाचपर्यंत शांत असलेल्या जागी एकाएकी गडबड,गर्दी,आवाज, गोंधळ,सुरू झाला होता.  रस्त्यापलीकडे एखादा बसस्टॅण्ड असावा असे वाटत होते.बस उभी राहिलेली दिसत होती.त्यात माणसे चढताना दिसत होती.थोडय़ाच वेळात ती बस आगराबाहेर (स्टँडबाहेर) गेली.आम्ही बस स्टँडवर होतो. त्यावर कालवणी बस स्टँड असे स्पष्ट लिहिलेले होते.बोर्डवर निरनिराळ्या गावी जाणार्‍या  बसच्या वेळा लिहिलेल्या होत्या.मग समोर हा स्टँड कोणता होता?आमचा स्टँड एसटीचा असावा.समोरचा स्टँड खाजगी असावा.खाजगी बसेस तेथून ये जा करीत असाव्यात असे आम्हाला वाटले.तरीही मग आतापर्यंत जिथे घनदाट काळोख होता तिथे एकाएकी एवढ्या प्रकाशाने जागा चमकू कशी लागली ते कळत नव्हते.वीज गेली असावी आणि ती आता आली असे पटणारे उत्तर त्यावर होते.समोरच्या स्टॅण्डवर जावे.कालवणला जाणारी बस मिळाली तर पाहावी.न मिळाली तरी भरपूर प्रकाशात,येणार्‍या जाणार्‍या उतारूंच्या घोळक्यात थांबावे. येणार्‍या जाणार्‍या बसेस पाहाव्यात.एवढा प्रकाश,एवढी गर्दी, म्हणजे हॉटेल असणारच.तेथे काहीतरी च्याऊम्याऊ करावे, कॉफी प्यावी,असा विचार करून आम्ही स्टँडवरून निघालो.रस्ता ओलांडला की लगेच पलीकडे तो दुसरा स्टँड होता.

हॉटेल मालकांने आम्हाला याच स्टँडवर सकाळपर्यंत थांबा.जोपर्यंत तुम्ही मारुतीच्या संरक्षणाखाली आहात तोपर्यंत तुम्हाला कांहीही भीती नाही असे सांगितले होते.ते सर्व आम्ही विसरून गेलो होतो.रस्ता ओलांडून  प्रकाशाकडे,दुसऱ्या स्टँडकडे, माणसांच्या गर्दीकडे, बसेसकडे जात होतो.म्हटले तर आम्ही एका संकटाकडे जात होतो.एका विलक्षण अनुभवाकडे जात होतो.  

मी व नंदू त्या दुसऱ्या बस स्टँडवर गेलो.दोन तीन बसेस उभ्या होत्या.बसमध्ये कांही लोक चढत होते. कांही उतरत होते.बसेस सुटत होत्या.नवीन बसेस येत होत्या.हाही एसटीचा स्टँड होता.येथे  छानपैकी हॉटेल होते.बाकावर लोक बसले होते.आम्हाला माणसांच्या गर्दीत आल्यावर बरे वाटले.आम्ही उतरलो तेव्हां येथे प्रकाश नव्हता. बसेस नव्हत्या.सर्वत्र शुकशुकाट होता.सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेले होते.ही गोष्ट आम्ही विसरून गेलो होतो.वीज गायब झाली असली,तरी कांहीतरी आवाज गडबडगोंधळ ऐकायला यायला पाहिजे होती.आम्ही अगोदर बसलो होतो त्याच्या समोरच्या स्टँडवर स्मशान शांतता होती.समोरासमोर एसटीचे दोन स्टँड कसे असा विचारही आमच्या मनात आला नाही.  

हॉटेलमध्ये जाऊन आम्ही थोडासा अल्पोपहार केला.कडक कॉफी घेतली.त्या अगोदर नियंत्रकाकडे कालवणला जाणारी बस आता आहे का? असे विचारले.त्यावर त्याने सकाळशिवाय बस नाही असे स्टँडर्ड उत्तर दिले.आम्ही एका बाकावर जाऊन निवांत बसलो.सर्व हालचाली पाहात होतो.बसेस येत होत्या जात होत्या.लोक उतरत होते चढत होते.एवढी गर्दी कुठून येते आणि कुठे जाते आम्हाला पत्ता लागत नव्हता.

तेवढ्यात नंदूने मला बारीक चिमटा काढला.तो म्हणाला तुझ्या एक गोष्ट लक्षात येत आहे का?मी नाही म्हटल्यावर तो म्हणाला ,बसवरील नंबर पाहा.त्याच नंबरच्या बसेस पुन्हा पुन्हा जात आहेत येत आहेत.एका बाजूने त्या बाहेर पडतात नाहीश्या होतात आणि थोड्याच वेळाने दुसर्‍या  बाजूने आत येतात.चढणारे व उतरणारे लोक तेच आहेत.तेच तेच लोक पुन्हा चढत व उतरत आहेत.येत व जात आहेत.मला कांहीतरी घोळ वाटतो.आपण आलो तेव्हां येथे कांहीही नव्हते.रात्री बारा वाजल्याबरोबर आसमंत प्रकाशाने उजळून निघाला.एका एसटीच्या  स्टॅण्डसमोर दुसरा एसटीचा  स्टँड.त्याच बसेस व तेच लोक येतात जातात.सारखी पुनरावृत्ती चालली आहे.हा कांहीतरी विचित्र प्रकार आहे.आपण समोरच्या बिनगर्दीच्या, बिन प्रकाशाच्या,स्टॅँडवर जाऊन मारुतीच्या संरक्षणाखाली बसूया.   

मी नंदूला जरा थांब म्हणून सांगितले.तू म्हणतोस ते तसेच आहे की तुला भास होत आहेत ते मी पाहतो.तुझे म्हणणे सत्य असेल तर आपण लगेच या स्टॅन्डवरून त्या दुसऱ्या काळोख्या स्टँडकडे जाऊ.

* मी बसेसकडे व लोकांकडे पाहू लागलो.*

*जाणार्‍या व येणार्‍या  बसेसचे नंबर तेच होते.*

*चढणारे व उतरणारे लोक तेच होते.*

*हा कांहीतरी विलक्षण भुताटकीचा प्रकार होता.*

*पहिल्या स्टँडवरच्या हॉटेल मालकाने इथेच थांबा आणखी कुठे जाऊ नका अशी   दिलेली चेतावणी आम्हाला आठवली.* 

*आम्ही स्टॅण्डवरून निघून पलीकडच्या स्टँडकडे जाऊ लागलो.*

*आम्हाला बाकावरून उठता येत नव्हते.जणू कांही फेविकॉल लावून आम्हाला बाकाला चिकटवले होते.*

*जे होत होते ते हताशपणे पाहण्याशिवाय दुसरा कांहीही मार्ग नव्हता.*

(क्रमशः)

२३/३)२०२२©प्रभाकर पटवर्धन