उपवास
आषाढी एकादशी चातुर्मास सुरुवात उत्सव प्रिय मनुष्याला ही पर्वणीच.. एकादशीचा हा उपवास लहान थोर सगळेच आनंदाने करतात श्रद्धा आनंद आवड हौस सगळ्याच गोष्टी पूर्ण करणारा हा आषाढी एकादशीचा उपवास त्याविषयी आज मनात आले ते मांडण्याचा प्रयत्न....*एकादशीच्या पोटभर शुभेच्छा देत देत.....!!*"
लेख थोडा मोठा होईल खरा पण पोटभर उपवासासाठी पोटभर शब्द ही हवेतच कि... मग शब्दाची त्या विषयाची खिचडी कशी बनेल... ना...!!
*एकादशी दुप्पट खाशी* अशी म्हण आपण ऐकतो यातच उपवास म्हणजे आहारात बदल पदार्थातील वैविध्य असेही म्हणता येईल उद्देश शरीराचा समतोल साधणे.यावरुन कळते कि उपवास उपवास म्हणजे.....
उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया, हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु *उपवास हा माणसे व त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे. उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना. म्हणजे उपवास एक आध्यात्मिक योग उपवास*.
कधीतरी अन्नाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असावे आणि त्यातून धार्मिक उपवासाची कल्पना पुढे आली असावी.त्यामुळे उपवास काळात होणारा शारीरिक व मानसिक त्रास म्हणजे तपच अशी धार्मिकता निर्माण झाली असावी व उपवास ही संकल्पना रुढ झाली असावी
*उपवास म्हणजे उप+वास उप जवळ वास राहणे ईश्वराप्रत जाण्याचा पापक्षालनाचा चित्तशुद्धीचा राजमार्ग म्हणजे उपवास होय विविध धर्मात त्याचे महत्व वेगवेगळे असले तरी भावना उद्देश एकच ईश्वरप्राप्ती पापक्षालन प्रायशित्त*.
अमावास्येनंतरच्या शुक्ल प्रतिपदेला १४ घास, दि्वतीयेला १३ घास, असे प्रती दिवशी एकेक घास कमी कमी करत चतुर्दशीला भोजनास एक घास, पौर्णिमेलाही एक घास व पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेला एक याप्रमाणे दररोज एकेक घास वाढवत अमावास्येच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला चौदा घास भोजनसमयी घेतात व अमावास्येदिवशी उपवास घडतो आसेही म्हणतात उपवास घडणे ही प्रकिया अशीही घडते असे वाचनात आले.जसे रामरक्षेचे प्रतिपदा ते पौर्णिमा आपण रोज एक याप्रमाणे संथा वाढवत नेतो तसेच हे अन्नग्रहणाचे घास कमी कमी करत उपवास घडवून आणणे .असे वाचलेले आठवते.याला आधार माहित नाही.
दक्षिणायनात वर्षा, शरद व हेमंत हे ऋतू येतात. या तीन
ऋतूंमध्ये सणवार जास्त प्रमाणात आहेत. त्यातल्यात्यात वर्षा ऋतूत सणवार सर्वाधिक आहेत. पावसाळा असल्यामुळे रोगराईचे प्रमाण जास्त असते. प्रकृतीस्वास्थ्याकडे लक्ष देण्याची गरज असते. सणवाराच्या निमित्ताने अधूनमधून उपवास घडतो, सात्त्विक अन्न पोटात जाते, तसेच बाहेरचे खाण्यावर काही प्रमाणात तरी मर्यादा येतात.
उपवास आणि उपासना यांचा सहसंबध देता येईल उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय.तर कोणतेही लहान-मोठे व्रत असो, त्यात उपवास बहुतेक सांगितलेलाच असतो. व्रताचे ते अविभाज्य अंग असल्यासारखे असते. ही व्रते पाळण्याच्या कालमर्यादेत इष्ट देवतेची उपासना करावयाची असते. चित्त वा शरीर किंवा दोन्हीही शुद्ध राखण्याकरिता किंवा शुद्ध करण्याकरिता हे व्रत आचरावयाचे असते. ही कालमर्यादा चोवीस तासांपासून सप्ताह, महिना अशी दीर्घकालीनही असते. मात्र त्र्यहा, पंचाह, सप्ताह, मास, वर्ष इ. दीर्घ मुदतीच्या उपवासांमध्ये नियमित वेळी, मर्यादित आहारग्रहणास अनुमती असते. धर्मशास्त्रात अनुक्रमे श्रावण महिना एकादशी, प्रदोष, शिवरात्री, ऋषिपंचमी, गणेशचतुर्थी गोकुळअष्टमी इ. तिथी व शनिवार, रविवार इ. वार उपवासाचे म्हणून सांगितले आहेत.तसेच संतांच्या, प्रेषितांच्या किंवा अवतारांच्या पुण्यतिथी व जयंती यांनिमित्त काही काळ उपवास विहित असतो. विशिष्ट उत्सव, यज्ञ किंवा अन्य धार्मिक समारंभ या प्रसंगीही वैयक्तिक वा सामुदायिक उपवास करावयाचे असतात. सूर्य-चंद्र-ग्रहणकालातही उपवास केले जातात
यात हलकाफुलका आहार घेण्यालाही महत्व यातदेखील काहीतरी विधात्याचे नियोजन सृष्टीतला समतोल साधता यावा हेच असावे उपवासात आपण ज्या धान्याचा वापर करतो ते इतरवेळी कमी प्रमाणात वापरतो नित्याच्या अन्नधान्यावर येणारा ताण कमी करता यावा सर्व धान्यांना समान न्याय मिळावा हा हेतू असावा आसाही विचार उपवास या संकल्पनेमागे असावा हे मनात आले.
अवर्षण व सतत नापिकी यामुळे राज्याच्या कोठारातील अपुरा धान्य-साठा, जनतेस वर्षभर पुरविण्यासाठी शोधण्यात आलेला हा उपाय उपवास या संकल्पनेला वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या भावनेने जोडले असले तरी श्र्द्धा एकच ईशप्राप्ती .कुणी उपवास या संकल्पनेला देवादिकांशी तर कुणी प्रायशित्त म्हणून जोडले.इतकेच.
एक दिवसाचा उपवासही शारीरिक आणि मानसिक सुख देणारी एक दिवसाची तपस्याच म्हणता येईल.
उपवासाचं धार्मिक महत्त्व आहेच. पण यासोबतच उपवास आरोग्यदायक देखील आहे.
काही वेळासाठी उपवास केल्यानं मेटाबॉलिक रेटमध्ये ३ ते १४ टक्क्यांनी वाढ होते. यामुळे पचनक्रिया आणि कॅलरी बर्न होण्यासाठी कमी वेळ लागेल.
उपवास केल्यानं नवीन रोग प्रतिरोधक पेशी तयार होण्यास मदत होते.
उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते.
तणाव वाढला की आपण अधिक खातो. उपवासामुळे तोंडावर नियंत्रण तर राहतंच. याशिवाय तणावही कमी होतो.
उपवास केल्यानं डोकं शांत राहतं. त्याचप्रमाणे डिप्रेशन आणि मेंदूशी जोडलेल्या अनेक समस्यांपासूनही सुटका होते.
मात्र हेही लक्षात असायला हवेच उपवासादरम्यान काही आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळणे गरजेचे असतात. शरीराला आवश्यक पोषक तत्व नाही मिळाली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासामध्ये किंवा उपवास सोडल्यानंतर तुम्ही जे काही खाल ते पौष्टीक असलं पाहिजे. अशावेळी कमी मेद (fats) असलेले पदार्थ खायला हवेत.
मग आता असाही प्रश्न पडेल कि सध्या मधुमेह ब्लडप्रेशर हे सर्वसाधारण आजार यात उपवास करणे वर्ज्य मग यात खंड अहो पण तुम्ही नीट विचार केला तर कळेल या आजारातील खाण्यावार निर्बंध असतात हे देखील एक उपवासाचेच व्रत आहार नियमनात अशावेळी एखाद्या दिवशी बदल म्हणून वर्ज्य असलेला एखाद्या पदार्थ जो उपवासाशी संबधित खाल्ला कि झाला उपवास....असे ही सांगता येते.म्हणजे उपवास ही शरीराला एक दिवस आराम देण्याची प्रकिया म्हणूयात ज्याने मनावर जिभेवर ताबा मिळवता येतो...म्हणून मौन राखणे ही संकल्पना साधनेचाच एक भाग असावी एक व्रतच
*असा हा उपवास अध्यात्मिक शारिरीक उन्नतीचा आधार*.
*उपवास शारिरीक मानसिक अध्यात्मिक योग असे म्हणता येईल शरीर आत्मा मन याचे शुद्धीकरण करणारी एक साधना जी व्रतांद्वारे सिद्ध करता येते शरीराला एक शिस्त लावणारी परीक्षा म्हणजे उपवास होय*.
*आषाढी एकादशीच्या पोटभर शुभेच्छा!!*
©मधुरा धायगुडे